रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रसायने आणि खते विभागाचे मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत व्यापारी मेळाव्यातील जन औषधी स्टॉलला दिली भेट

Posted On: 20 NOV 2023 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2023

नवी दिल्ली येथे भरलेल्या व्यापारी मेळाव्यातील जन औषधी स्टॉलच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय रसायने आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी या स्टॉलला भेट दिली. संपूर्ण देशभरात सहजगत्या आणि किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेल्या या कल्याणकारी प्रकल्पाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी या स्टॉलची प्रशंसा केली.

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे 14 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत 42 व्या भारतीय आंतरराष्टीय व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्टीय व्यापारी मेळाव्याचा भाग म्हणून प्रधानमंत्री  भारतीय जनौषधी परियोजनेतर्फे (पीएमबीजेपी) या परिसरातील पाचव्या क्रमांकाच्या दालनात (स्टॉल क्र.8-बी) हा स्टॉल उभारण्यात आला असून येथे भेट देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या या कल्याणकारी प्रकल्पाच्या ठळक वैशिष्ट्यांची माहिती देण्यात येत आहे. जन औषधी केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या किफायतशीर दरातील उच्च दर्जाच्या औषधांची माहिती  या स्टॉलच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

परवडण्याजोग्या दरातील दर्जेदार जेनेरिक औषधे सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयातील औषधनिर्मिती विभागातर्फे पंतप्रधान भारतीय जनौषधी परियोजनेची सुरुवात करण्यात आल्याचे सर्वाना परिचित आहेच. या योजनेअंतर्गत, देशभरात जेनेरिक औषधांचा पुरवठा करण्यासाठी जन औषधी केंद्र ही समर्पित दुकाने उघडण्यात आली.दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी प्राप्त माहितीनुसार, सध्या देशभरात 9998 जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत. पीएमबीजेपीच्या उत्पादनांच्या यादीमध्ये अशा 1965 औषधे आणि 293 वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे ज्यांची विक्री या किरकोळ दुकानांमध्ये ब्रांडेड औषधांपेक्षा 50% ते 90% स्वस्त दरात होत आहे. पीएमबीजेपीमुळे 1965 हून अधिक प्रकारच्या दर्जेदार औषधांच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असून आता ही औषधे देशातील मोठ्या वर्गाला विशेषतः गरीब आणि जुनाट आजार असलेल्या रुग्णांना सहजतेने उपलब्ध होऊ शकली आहेत.

 गेल्या 9 वर्षांच्या काळात, या केंद्रांची संख्या 100 पटीने वाढली असून या दुकानांतील विक्री देखील 170 पटीने वाढली आहे. थोडक्यात, गेल्या 9 वर्षांत या कल्याणकारी योजनेमुळे, देशातील नागरिकांच्या औषधांवर होणाऱ्या खर्चात  सुमारे 23,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1978237) Visitor Counter : 80


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati