माहिती आणि प्रसारण मंत्रालय
यावर्षीच्या इफ्फीमध्ये ‘मास्टरक्लासेस’ आणि ‘इन-कन्व्हर्सेशन’ या सत्रांची उत्सुकता
मायकेल डग्लस यांच्या 'इज इट टाइम फॉर वन वर्ल्ड सिनेमा?' यावर विशेष इन-कन्व्हर्सेशन सत्र
चित्रपट निर्मितीमागील सर्जनशील प्रक्रियेचा, चित्रपट रसिकांना सखोल माहिती देणारा अनुभव
गोवा/मुंबई, 19 नोव्हेंबर 2023
मायकेल डग्लस, पंकज त्रिपाठी, झोया अख्तर, यामध्ये काही साम्य आढळले का ? हे सगळे जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते/अभिनेते आहेत, ज्यांनी चित्रपट निर्मिती/अभिनयातील त्यांच्या सर्जनशील कौशल्याने अनेकांची मने जिंकली आहेत आणि ते 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इन-कन्व्हर्सेशन सत्र घेणार आहेत. या उत्कंठावर्धक महोत्सवात चित्रपट निर्मितीची कला आणि कौशल्यावर मास्टरक्लासेस आणि इन-कन्व्हर्सेशन सत्रासाठी सज्जता झाली आहे.
या वर्षीच्या इफ्फीमध्ये प्रख्यात चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर आणि कलाकारांबरोबर 20 हून अधिक मास्टरक्लास आणि इन-कन्व्हर्सेशन सत्रे रंगणार आहेत. गोव्यातील पणजी येथील फेस्टिव्हल माईल येथे नूतनीकरण केलेल्या कला अकादमीमध्ये सत्रे होतील. ब्रेंडन गॅल्विन, ब्रिलेंट मेंडोझा, सनी देओल, राणी मुखर्जी, विद्या बालन, जॉन गोल्डवॉटर, विजय सेतुपती, सारा अली खान, नवाजुद्दीन सिद्धीकी, केके मेनन, करण जोहर, मधुर भांडारकर, मनोज बाजपेयी, कार्तिकी गोन्साल्विस, बोनी कपूर, अल्लू अरविंद, थिओडोर ग्लक, गुलशन ग्रोव्हर आणि अन्य यावर्षीच्या सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत.
हॉलीवूडचे महान अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस 'इज इट टाइम फॉर वन वर्ल्ड सिनेमा?' या विषयावर विशेष इन-कन्व्हर्सेशन सत्रात सहभागी होणार असून सखोल अंतर्दृष्टी आणि अर्थपूर्ण व्याख्यानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही पर्वणी असेल. या जगविख्यात अभिनेत्याला इफ्फीमध्ये या वर्षीचा प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
मास्टरक्लासेस चित्रपट निर्मिती प्रक्रियेची केवळ एक दुर्मिळ झलकच सादर करत नाही, तर तो एक सखोल अनुभव असतो, जो सहभागी झालेल्यांना कथाकथन, सिनेमॅटोग्राफी आणि चित्रपट निर्मितीच्या उद्योगामागील सर्जनशील प्रक्रियेची सर्वांगीण ओळख करून देतो. 'चित्रपट दिग्दर्शन' बाबत या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ब्रिलॅंट मेंडोझा यांच्याकडून शिकण्याची एक नामी संधी देत, हे सत्र नवोदित चित्रपट रसिकांना मोलाचे मार्गदर्शन पुरवते.
'मास्टरक्लासेस' आणि 'इन-कन्व्हर्सेशन ' सत्रांची ही अभिनव पद्धत चित्रपट रसिकांना जागतिक दर्जाच्या दिग्दर्शक/तज्ज्ञांद्वारे आत्म-चिंतन, स्मृती आणि संकल्पनाच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीच्या विविध विषयांचा धांडोळा घेण्याची अनोखी संधी देते.
या वर्षी, आणखी एक चांगली बातमी तुमच्या प्रतीक्षेत आहे, मास्टरक्लासेससाठी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि नोंदणी विनामूल्य आहे. अधिक तपशीलांसाठी https://www.iffigoa.org/mcic.php ला भेट द्या.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1978058)
Visitor Counter : 134