राष्ट्रपती कार्यालय
भारतीय आयुध निर्माणी सेवेचे अधिकारी आणि भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
17 NOV 2023 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023
भारतीय आयुध निर्माणी सेवा आणि भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (17 नोव्हेंबर 2023) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
देश स्थानिक तसेच जागतिक पातळीवर व्यापक परिवर्तन प्रक्रियेतून जात आहे अशा वेळी तुम्ही सेवेत रुजू झाला आहात असे अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या. नवीन तंत्रज्ञानाच्या उदयासह, अद्ययावत तंत्रे आणि माहिती जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वेगाने पसरत असल्याने, विकसित राष्ट्राच्या निर्मितीमध्ये आणि भारताला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्यात तुमची भूमिका आणखी महत्त्वाची ठरेल. तरुण अधिकाऱ्यांचे विचार, निर्णय आणि कृती हे संरक्षण प्रणाली तसेच देशाचे भविष्य घडवण्यात मोठ्या प्रमाणात योगदान देईल, असेही त्या म्हणाल्या.
भारताने सर्वसमावेशक आणि विकसित देशाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. स्वावलंबी, स्पर्धात्मक आणि मजबूत अर्थव्यवस्था बनवण्यात स्वदेशी उद्योगांची मोठी भूमिका आहे, असे भारतीय आयुध निर्माणी सेवेतील अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्या काही वर्षांत सरकारने अनेक धोरणात्मक उपक्रम हाती घेतले आहेत. स्वदेशी संरचना, विकास तसेच संरक्षण उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुधारणा केल्या आहेत. आय. ओ. एफ. एस. चे अधिकारी संरक्षण प्रणालींमध्ये स्वदेशीकरणाचे वाहक आणि सहाय्यक असतील आणि ते भारताची संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम करतील अशी अपेक्षा आहे, यावर त्यांनी भर दिला.
भारताच्या संरक्षण निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मधे सुमारे 686 कोटी असणारी ही निर्यात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुमारे 16,000 कोटी रुपयांवर पोहचली असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. आय. ओ. एफ. एस. अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये पार पाडताना, विकास कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेणे आणि भारताला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याची प्रक्रिया सुलभ करणे अत्यावश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.
देशाच्या सशस्त्र दलांच्या आर्थिक बाजूचे व्यवस्थापन करण्यात भारतीय संरक्षण लेखा सेवेचे अधिकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील; संरक्षण क्षेत्रात, कार्यक्षम आर्थिक व्यवस्थापन आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी ते जबाबदार असतील असे त्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या. व्यावसायिक सचोटी आणि सक्षम प्रशिक्षण प्रारुपाच्या आधारे, आय. डी. ए. एस. अधिकारी संरक्षण दलांमध्ये आर्थिक विवेक वाढवू शकतील आणि राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षण यंत्रणेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी लेखापरीक्षण आणि लेखांकनासाठी अद्ययावत तंत्रे आणि पद्धती स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा -
Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1977678)
Visitor Counter : 119