आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी गौरव दिनी महाराष्ट्रातील विकसित भारत संकल्प यात्रेची राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथून झाली सुरुवात
पालघर, नाशिक ,गडचिरोली आणि नांदेड या आदिवासीबहुल जिल्ह्यातही विकसित भारत संकल्प यात्रेचा झाला शुभारंभ
प्रमुख सरकारी योजनांचे संपूर्ण लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे या विशाल अभियानाचे उद्दिष्ट
Posted On:
15 NOV 2023 4:14PM by PIB Mumbai
मुंबई, 15 नोव्हेंबर 2023
महाराष्ट्रातील नंदुरबार येथे राज्यपाल रमेश बैस यांनी केंद्र सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या आयईसी व्हॅनला झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, खासदार डॉ. हिना गावित, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते .
राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला स्वातंत्र लढ्यातील आदिवासी योध्यांना नमन केले. महाराष्ट्रात 1 कोटींहून अधिक आदिवासी समाज असून भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी बांधवांचा विकास आवश्यक असल्याचे सांगत राज्यपालांनी महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभाग या अनुषंगाने चांगलं काम करत आहे असे सांगितले.
आज विकसित भारत संकल्प यात्रेला हिरव झेंडा दाखवुन् आनंद होत आहे असे सांगत राज्यपाल बैस पुढे म्हणाले कि राज्यातले आदिवासी खेळाडू चांगले नैपुण्य मिळवत आहेत. आज आदिवासी लोककलेला मागणी वाढत आहे त्यामुळे तरुणांनी आपली कला आणि संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज आहे असे सांगत त्यांनी नव्या पिढीला आपली बोलीभाषा बोलण्याचे आणि टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले कि बिरसा मुंडा लोकनायक होते त्यांनी स्वातंत्र संग्रामात केलेलं योगदान अविस्मरणीय आहे. शिंदे पुढे म्हणाले कि राज्य सरकार आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असून भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड प्रकल्पाद्वारे राज्यातल्या आदिवासी वाड्या पाड्या पर्यंत रस्ते बनविण्याच्या प्रयत्न करत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे आहे असे सांगत शिंदे यांनी तापी बुराई आणि नंदुरबार शहर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात आज नंदुरबार बरोबरच पालघर, नाशिक ,गडचिरोली आणि नांदेड या आदिवासीबहुल जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील धनसार, येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या आयईसी व्हॅनला झेंडा दाखवून या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे उपस्थित होते .
यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले कि येत्या 2047 मध्ये भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. देशाच्या संपूर्ण विकासासाठी जनजातीय समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यासाठी गेल्या 9 वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन दैनंदिन जीवनातील 'रोटी, कपडा और मकान'शी संबंधित कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून या सर्व योजना आणि विकास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.
विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभ निमित्त नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन आणि मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करुन आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या आयईसी व्हॅनला झेंडा दाखवून या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले कि आपल्या आदिवासी बांधवांच्या आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत एक मोठा पल्ला आपण विकास योजनांच्या माध्यमातून गाठला आहे. कोणत्याही वाड्या-पाड्यावरील एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही यादृष्टिने तालुकापातळीपर्यंत निवासी आश्रमशाळांपासून विविध सेवासुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सेवा सुविधांपासून जे लाभार्थी वंचित राहिलेले आहेत अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी “विकसीत भारत संकल्प यात्रा” अत्यंत लाभ मोलाची आहे.
ही यात्रा विकसीत भारताच्या संकल्पाची आहे. आजवर जे संकल्प केले त्या संकल्पाच्या पूर्तीसह नवे परिघ निर्माण करणारी ही संकल्प यात्रा आहे. राज्याच्या आदिवासी भागातील तांड्यावरील, पाड्यावरील प्रत्येक घरात ज्ञानाच्या ज्योतीसह प्रकाश उजळावा यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून “संकल्प ज्योती” गावा-गावातून आज सुरू करत आहोत.
विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभ निमित्त नाशिक जिल्ह्यातील येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी केंद्र सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या आयईसी व्हॅनला झेंडा दाखवला.यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्र शासनाचे उपसचिव सुभाष कुमारबँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर तांबट, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना डॉ. भारती पवार यांनी बिरसा मुंडा यांच्या बलिदानाची प्रेरणेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या अनेक योजना असतात मात्र त्या सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत त्या थेट लाभार्थींपर्यंत पोहोचाव्या अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे त्यामुळेच या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे आणि या रथाच्या माध्यमातून गावागावात योजनांची माहिती दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
आयुष्यमान कार्ड, जन आरोग्य कार्ड अशा अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ कसा मिळतो ते यावेळी सांगण्यात येणार आहे. शासनाने गरीब रुग्णांसाठी पाच लाख रुपयापर्यंतची मदत देण्याची योजना आखली आहे मात्र नागरिकांना ती माहितीच नाही असे होऊ नये यासाठी गावोगावी हा रथ फिरणार आहे असे त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. ग्रामपंचायतींसाठी देखील अनेक योजना आहेत मात्र कागदपत्रांच्या पूर्तते अभावी त्यांना पुरेसे निधी मिळत नाही त्यामुळे यासंदर्भातील अभ्यास देखील ग्रामस्तरावर करण्यात यावा असे आवाहन डॉ. पवार यांनी यावेळी केले.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे आज विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांनी केंद्र सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या आयईसी व्हॅनला झेंडा दाखवून केला. याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, माजी आमदार आनंदराव गेडाम उपस्थित होते .
आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी योजना राबवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी यावेळी बोलताना केले.
विकसित भारत संकल्प यात्रेविषयी:
सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत 100 टक्के पोहोचवण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने एक प्रमुख पाऊल म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे.
या यात्रेमध्ये प्रसिद्धी करण्यात येत असलेल्या योजनांमध्ये आयुष्मान भारत, पीएमजेएवाय, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय रुरल लाईव्हलीहूड मिशन, पीएम आवास योजना(ग्रामीण), पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा, पीएम किसान सन्मान, किसान क्रेडीट कार्ड(केसीसी), पीएम पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, गावांचे सर्वेक्षण आणि ग्रामीण भागात सुधारित तंत्रज्ञानाने मॅपिंग( स्वामित्व), जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम, नॅनो फर्टिलायझर इ. योजनांचा समावेश आहे.
याशिवाय या यात्रेत सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन मिशन, एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये नावनोंदणी; शिष्यवृत्ती योजना; वन हक्क नियम: वैयक्तिक आणि सामुदायिक जमीन ; वन धन विकास केंद्र: बचत गटांचे आयोजन यांसारख्या आदिवासी भागाच्या विशिष्ट समस्यांकडे देखील लक्ष दिले जात आहे.
राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रमुख योजना, ठळक मुद्दे आणि कामगिरी दर्शवणाऱ्या हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रफिती , माहितीपत्रके, पुस्तिका, पत्रके आणि फ्लॅगशिप स्टँडीच्या माध्यमातून माहितीचा प्रसार करण्यासाठी या आयईसी व्हॅन्स अर्थात प्रसार रथ सुसज्ज केले आहेत.
योजनांच्या लाभार्थ्यांद्वारे अनुभवांचे आदानप्रदान, प्रगतीशील शेतकऱ्यांशी संवाद, आयुष्मान कार्ड, जल जीवन मिशन, जन धन योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना, ओडीएफ प्लस यासारख्या योजनांची 100% अंमलबजावणीचे उद्दिष्ट साध्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव , प्रश्नमंजुषा स्पर्धा, ड्रोन प्रात्यक्षिक, आरोग्य शिबिरे, मेरा युवा भारत स्वयंसेवक नावनोंदणी यासारखे लोकसहभाग असलेले विविध कार्यक्रम या यात्रेदरम्यान आयोजित केले जाणार आहेत.
JPS/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977091)
Visitor Counter : 297