पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 14-15 नोव्हेंबर रोजी झारखंडला भेट देणार


भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या उलिहातू गावाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरणार पहिले पंतप्रधान

आदिवासी गौरव दिवसाच्या निमित्ताने, प्रमुख सरकारी योजनांचा पुरेपूर फायदा सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान करणार विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

सुमारे 24,000 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या ‘पंतप्रधान विशेषतः वंचित आदिवासी समूह विकास मिशन’चा देखील पंतप्रधान करणार शुभारंभ

पीएम-किसान अंतर्गत पंतप्रधान जारी करणार सुमारे 18,000 कोटी रुपयांचा 15वा हप्ता

झारखंडमध्ये सुमारे 7200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधान करणार लोकार्पण आणि पायाभरणी

Posted On: 13 NOV 2023 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 नोव्हेंबरला झारखंडचा दौरा करणार आहेत. 15 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 च्या सुमाराला पंतप्रधान रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान  आणि स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाला भेट देतील. त्यानंतर ते भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या उलिहातू गावामध्ये दाखल होतील आणि तेथील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या उलिहातू या गावाला भेट देणारे पहिले पंतप्रधान असतील.  खुंटी येथे सकाळी 11.30 च्या सुमाराला ते आदिवासी गौरव दिवस साजरा करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आणि  ‘पंतप्रधान विशेषतः वंचित  आदिवासी समूह विकास मिशन’चा शुभारंभ करतील. पीएम-किसान अंतर्गत पंतप्रधान  सुमारे 18,000 कोटी रुपयांचा 15वा हप्ता देखील जारी करतील आणि झारखंडमध्ये विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.

विकसित भारत संकल्प यात्रा

प्रमुख सरकारी योजनांचे लाभ कालबद्ध पद्धतीने सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत संपूर्णपणे पोहोचत आहेत हे सुनिश्चित करून या योजनांचे लाभ पुरेपूर अपेक्षित परिणाम साध्य करतील यासाठी पंतप्रधान सातत्याने प्रयत्नशील असतात. हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून पंतप्रधान आदिवासी गौरव दिवसाच्या निमित्ताने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’सुरू करतील.

लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे आणि  स्वच्छता सुविधा, अत्यावश्यक वित्तीय सेवा, वीज जोडण्या, एलपीजी सिलेंडरची उपलब्धता, गरिबांसाठी घरे, अन्न सुरक्षा, योग्य पोषण, विश्वासार्ह आरोग्य सुविधा, स्वच्छ पेयजल इ. कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणे यावर या यात्रेचा भर असेल. पात्र लाभार्थ्यांची सविस्तर माहिती घेऊन तिची पुष्टी करून त्यांची नोंदणी या यात्रेदरम्यान केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमधील खुंटी येथून विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ झाल्याचे दर्शवण्यासाठी  आयईसी(इन्फर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन) व्हॅन्सना झेंडा दाखवून रवाना करतील. सुरुवातीला आदिवासी बहुल जिल्ह्यांमधून या यात्रेचा प्राऱंभ होईल आणि 25 जानेवारी 2024 पर्यंत देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये या यात्रेची व्याप्ती पसरेल.

पीएम पीव्हीटीजी मिशन

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पहिल्यांदाच एका आगळ्या वेगळ्या म्हणजे ‘पंतप्रधान विशेषतः वंचित  आदिवासी समूह विकास मिशन(पीव्हीटीजी)’ या योजनेचा देखील शुभारंभ करतील. 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 22,524 गावांमध्ये(220 जिल्हे) 75 पीव्हीटीजीअसून  28 लाख लोकसंख्या आहे.

हे आदिवासी समूह बहुतेकदा वनक्षेत्रात विखुरलेल्या, दुर्गम आणि सुविधांपासून वंचित वस्त्यांमध्ये  राहात असतात आणि म्हणूनच या मिशनसाठी पीव्हीटीजी कुटुंबांना  आणि वस्त्यांना पुरेपूर लाभ आणि रस्ते आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटी, वीज, सुरक्षित घरे, स्वच्छ पेयजल आणि स्वच्छता, चांगल्या शिक्षण सुविधा, आरोग्य आणि पोषण आणि शाश्वत उपजीविका संधी यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी 24,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

9 मंत्रालयांच्या 11 उपक्रमांच्या एकत्रिकरणाद्वारे या मिशनची अंमलबजावणी केली जाईल. याचे उदाहरण म्हणजे पीएमजीएसवाय, पीएमजेएवाय, जल जीवन मिशन इ. या दुर्गम भागांपर्यंत पोहोचता यावे म्हणून काही योजनांचे निकष शिथिल केले जातील.

त्याशिवाय पीएमजेएवाय, सिकल सेल आजार निर्मूलन, क्षयरोग निर्मूलन, 100% लसीकरण, पीएम सुरक्षित मातृत्व योजना, पीएम मातृ वंदना योजना, पीएम पोषण, पीएम जन धन योजना इ. साठी त्यांचे लाभ पुरेपूर पोहोचवण्याची सुनिश्चिती  केली जाईल.

पीएम किसान निधीचा 15 वा हप्ता आणि इतर विकास उपक्रम

शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण दर्शवणाऱ्या, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम –किसान ) योजने अंतर्गत सुमारे 18,000 कोटी रुपयांची 15 व्या हप्त्याची रक्कम 8 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत  2.62 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम 14 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 7200 कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे, रस्ते, शिक्षण, कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या अनेक क्षेत्रातल्या प्रकल्पांचे उद्घाटन,पायाभरणी  तसेच काही प्रकल्प ते यावेळी राष्ट्राला समर्पित करतील.

पंतप्रधानांच्या हस्ते ज्या प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे  त्यात राष्ट्रीय महामार्ग 133 वरील महागमा-हंसदिहा विभागाच्या 52 किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग 114 Aवरील  बासुकीनाथ- देवघर विभागाच्या 45 किमी लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण; केडीएच-पूर्णाडीह कोळसा हाताळणी प्रकल्प; रांची येथील आयआयआयटी (IIIT)  नवीन शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारत इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल आणि जे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले जातील त्यात रांची येथील आयआयएम संस्थेच्या नवीन कॅम्पसचा समावेश आहे; धनबाद येथील आयआयटी आयएसएमचे नवीन वसतिगृह; बोकारो मधील पेट्रोलियम तेल आणि वंगण (पीओएल) डेपो; हातिया-पाकरा विभागाचे दुहेरीकरण, तलगारिया-बोकारो विभाग आणि जरंगडीह-पत्रातु विभागाचे रेल्वे प्रकल्प, त्याचबरोबर झारखंड राज्यातील 100% रेल्वे विद्युतीकरण यांचा समावेश आहे.  

N.Chitale/S.Patil/V.Yadav/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976763) Visitor Counter : 116