निती आयोग
azadi ka amrit mahotsav

नीति आयोगाने आयोजित केली 'नारी शक्ती: महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने' ही जी 20 संकल्पनात्मक कार्यशाळा

Posted On: 09 NOV 2023 5:15PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली नेत्यांचे घोषणापत्र 2023 (NDLD 2023) मध्ये संकल्पित 'नारी शक्ती: महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे' या विषयावरील कार्यशाळा 8 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. नीति आयोगाने इन्स्टिट्यूट ऑफ व्हाट वर्क्स टू ॲडव्हान्स जेंडर इक्वॅलिटी यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा नवी दिल्ली नेत्यांचे घोषणापत्र 2023 मधील कृतीपूर्तीसाठी नीति आयोगाद्वारे चालवलेल्या आणि आयोजित केलेल्या संकल्पनात्मक कार्यशाळांच्या मालिकेचा एक भाग होती.

आर्थिक आणि सामाजिक सबलीकरणाद्वारे अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका वाढवण्यासाठी या कार्यशाळेत विशिष्ट संकल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. स्वयं-सहायता गट (SHG), शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), कौशल्यांमधील लैंगिक तफावत दूर करणे आणि महिला नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे तसेच महिला सशक्तीकरणासाठी कायदेशीर सुरक्षा बळकट करणे यांसारख्या महिलांचे समूह मजबूत करण्याच्या विषयांवर चर्चा झाली.

कार्यशाळेची सुरुवात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांच्या उद्‌घाटनपर भाषणाने झाली. गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर आपल्या पंतप्रधानांनी भर दिला आहे, हे डॉ. व्ही.के. पॉल यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. जी 20 प्राधान्यक्रम आणि राष्ट्रीय अजेंडाचे मार्ग एकत्रित करण्याचे आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कृतीयोग्य धोरणे तयार करण्याचे आवाहन डॉ. पॉल यांनी केले.

या कार्यशाळेने सर्वसमावेशक लैंगिक समानता आणि सशक्तीकरणासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी लैंगिक सशक्तीकरणावर काम करणाऱ्या तज्ञ, शैक्षणिक तज्ञ आणि नागरी समाज तसेच विचारवंत प्रतिनिधींना एक व्यासपीठ प्रदान केले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1976023) Visitor Counter : 118


Read this release in: Kannada , English , Urdu , Hindi