आयुष मंत्रालय

'आयुर्वेद फॉर वन हेल्थ ' या जागतिक संदेशासह देशव्यापी बाइकर्स रॅलीचे यशस्वी आयोजन


दिव्यांग आणि महिला दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभागी होऊन मोहिमेची शान केली द्विगुणित

देशभरातील 11 शहरांमध्ये तरुणांची 'बाईकर्स रॅली' यशस्वीरित्या संपन्न

Posted On: 05 NOV 2023 6:44PM by PIB Mumbai

 

'आयुर्वेद फॉर वन हेल्थ ' या जागतिक संदेशासह देशभरातील 11 शहरांमध्ये बाईकर्स रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. देशभरातील तरुणांनी या मोहिमेत सहभागी होत आयुर्वेदाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन सर्व देशवासियांना केले. देशभरातील तरुणांना आयुर्वेद दिनाच्या ' आयुर्वेद फॉर वन हेल्थ ' या जागतिक संदेशाशी जोडणे तसेच समृद्ध वारसा आणि लोककल्याणकारी तत्त्वज्ञान असलेल्या आयुर्वेदाच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा प्रचार करणे हा या रॅलींचा मुख्य उद्देश होता.

दिल्ली आणि पटियाला येथील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था (CARI), लखनौ, नागपूर, जयपूर, विजयवाडा (विशाखापट्टणम), तिरुवनंतपुरम आणि अहमदाबाद येथील राष्ट्रीय आयुर्वेद संशोधन संस्था (RARI), डॉ. ए. लक्ष्मीपती राष्ट्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था आणि कॅप्टन श्रीनिवास मूर्ती केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था, चेन्नई आणि एनआयएमएच (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हेरिटेज) हैदराबाद यांच्या सहयोगाने  देशभरातील बाईकर्सनी  रॅलीत सहभागी होत  या मोहिमेला पाठिंबा दिला. आयुष मंत्रालयाच्या या उपक्रमात देशभरातील बाईकर्स सहभागी होत  वेगवेगळ्या अकरा शहरांमध्ये त्यांनी ' आयुर्वेद फॉर वन हेल्थ ' हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला.

केंद्रीय आयुष आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सर्व बाईकर्स आणि आयोजकांना संदेश देताना सांगितले की, आयुर्वेद दिनापूर्वी देशव्यापी बाइकर्स रॅली मोहिमेमुळे तरुणांच्या मनात आयुर्वेदाबद्दल सकारात्मक भाव निर्माण होईल आणि यामुळे भविष्यात एक निरोगी आणि संघटित भारत बनवण्याचे स्वप्न साकार होईल. आयुर्वेद दिनाच्या माध्यमातून भारताची हजारो वर्षे जुनी आयुर्वेदिक वैद्यकीय संस्कृती जागतिक व्यासपीठावर घेऊन जाणे हे आपले कर्तव्य असून आयुर्वेदाला जगभरातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनवणे आपले उद्दिष्ट आहे, असेही सोनोवाल म्हणाले.

आयुष मंत्रालयाकडून हरियाणातील पंचकुला येथे 9 आणि 10 नोव्हेंबर 2023 रोजी आयुर्वेद दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम 10 नोव्हेंबरला धन्वंतरी जयंती दिनी आयोजित करण्यात आला आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974902) Visitor Counter : 98


Read this release in: Hindi , Urdu , English , Tamil