कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी सेवांचे 'लोकशाहीकरण' आणि पूर्वतयारी साहित्याची  तंत्रज्ञानाधारित  उपलब्धतेमुळे मिळणारे मार्ग, यामुळे देशाच्या  दुर्गम भागातील इच्छुकांना देखील आयएएस आणि इतर अखिल भारतीय सेवांमध्ये भाग घेण्यास सक्षम बनवले आहे


गुजरातमधील केवडिया येथे एलबीएसएनएए च्या 98 व्या फाउंडेशन कोर्सच्या भारतीय प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षणार्थीना डॉ जितेंद्र सिंह यांनी केले संबोधित

Posted On: 03 NOV 2023 1:52PM by PIB Mumbai

 

नागरी सेवांचे 'लोकशाहीकरण' आणि पूर्वतयारी साहित्याची  तंत्रज्ञानाधारित  उपलब्धतेमुळे मिळणारे मार्ग, यामुळे देशाच्या  दुर्गम भागातील इच्छुकांना देखील आयएएस आणि इतर अखिल भारतीय सेवांमध्ये भाग घेण्यास सक्षम बनवले आहे, असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. 

हा जो नवीन कल आहे त्याचा आपल्या भविष्यावरही परिणाम होईल, असे  ते म्हणाले.  मोबाइल फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून तंत्रज्ञान हा ग्रामीण भागात प्रवेशाचा सर्वात मोठा दुवा आहे आणि प्रत्येकाला ज्ञान प्राप्तीची संधी उपलब्ध होत आहे.

"संपूर्ण नागरी सेवांमधील विभागवार लोकसंख्येची टक्केवारी बदलली आहे.  उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा मधील मुलांनी सर्वोच्च गुण प्राप्त केले आहेत ज्यात या वर्षी तीन मुली देखील आहेत. यापूर्वी यात मूठभर राज्यांचाच वरचष्मा होता," असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन मंत्री हे गुजरातमधील केवडिया येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (एलबीएसएनएए) च्या 98 व्या फाउंडेशन कोर्समध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षणार्थीना संबोधित करत होते. यात  भारताच्या 16 नागरी सेवा आणि भूतानच्या 3 नागरी सेवांमधील 560 अधिकारी प्रशिक्षणार्थी उपस्थित  होते.

गेल्या 9-10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासन आणि नागरी सेवकांच्या जडणघडणीत जाणीवपूर्वक मूलभूत बदल केले आहेत, असे सिंह यांनी यावेळी सांगितले.

नवीन आयएएस अधिकार्‍यांचा केंद्रीय मंत्रालये/विभागांसोबत तीन महिन्यांचा अनिवार्य कार्यकाळ म्हणजे त्यांच्या प्रशिक्षणाच्या प्रारंभी त्यांना सरकारच्या सर्वोच्च पदांची ओळख करून देणे असून वर्ष  2015 मध्ये  पंतप्रधान  मोदी यांनी ही  दूरदर्शी संकल्पना आणली, असे सिंह यांनी नमूद केले.

सहाय्यक सचिवांनी भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमधील विविध पथदर्शी कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचे विचार मांडणे अपेक्षित आहे. यामुळे त्यांना केवळ त्यांचे कौशल्य आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत नाही तर  पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्याची संधी देखील मिळते, जी कदाचित त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाभली नसेल,” असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिवांची नियुक्ती प्रामुख्याने दोन उद्देशांसह सुरू करण्यात आली. त्यातील एक म्हणजे , तरुण अधिकाऱ्यांना थेट राज्य सरकारकडे जाण्याऐवजी केंद्र सरकारमधील कामकाजाची माहिती मिळू शकेल. दुसरे म्हणजे, नवनियुक्त आयएएस अधिकार्‍यांना केंद्र सरकारमधील त्यांच्या वरिष्ठांमध्ये गरजेच्या वेळी संपर्क साधता येणारे त्यांचे मार्गदर्शक  शोधण्यास मदत मिळू शकेल.

आयएएस अधिकाऱ्यांची ही पिढी पंतप्रधान मोदी यांची  दृष्टिकोनाची पथदर्शक असून   देश जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा  या पिढीला Viksit Bharat@2047 चे शिल्पकार होण्याचा बहुमान मिळेल, असे सिंह यांनी सांगितले.

***

S.Kakade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1974495) Visitor Counter : 76


Read this release in: English , Urdu , Hindi