संरक्षण मंत्रालय

कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांचा सत्कार

Posted On: 30 OCT 2023 8:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023

गोल्डन ग्लोब रेस (जीजीआर) 2022 ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय नागरिक, कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आज, 30 ऑक्टोबर 2023 रोजी गोवा येथे आयोजित कार्यक्रमात नौदलप्रमुख ॲडमिरल आर.हरी कुमार यांच्या हस्ते अभिलाष यांचा सत्कार करण्यात आला. दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी कमांडर अभिलाष टॉमी यांनी इतिहास रचत जीजीआर 2022 ही शर्यत दुसऱ्या क्रमांकासह जिंकली. तसेच ही शर्यत पूर्ण करणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले. दिनांक 04 सप्टेंबर 2022 रोजी किनाऱ्यावरून प्रयाण केल्यापासून  236 दिवस, 14 तास आणि 46 मिनिटांचा जलप्रवास पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेच्या कस्टर्न  न्यूशॉफर  पाठोपाठ फ्रान्सच्या लेस सेबल्स-डी’ओलोनच्या किनाऱ्यावर परतत  कमांडर अभिलाष टॉमी यांनी दुसऱ्या क्रमांकाने ही शर्यत पूर्ण केली.

यापूर्वी, वर्ष 2013 मध्ये, कमांडर टॉमी आयएनएसव्ही म्हादेई या बोटीवरून एकटे, विना थांबा, जग प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले. त्यांनी जीजीआर 18 मध्ये देखील भाग घेतला होता मात्र, जलप्रवासादरम्यान त्यांची बोट वादळामध्ये अडकली आणि त्यावेळी पाठीला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना या स्पर्धेतून माघार घावी लागली होती.

पाच वर्षानंतर, कण्यातील टायटॅनियम रॉड आणि पाच एकमेकांशी जोडले गेलेले मणके यांच्यासह त्यांनी मानवी विजीगिषु वृत्तीची परीक्षा घेतली आणि जीजीआर 22 मध्ये दुर्मिळ सहनशक्ती धैर्य आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडवले. वर्ष 1968 मध्ये एकट्याने बोटीने जगप्रदक्षिणा करणारे पहिले नाविक, सर रॉबिन नॉक्स जॉन्सन यांच्या सन्मानार्थ जीजीआर या शर्यतीचे आयोजन करण्यात येते.

जीजीआर 22 मध्ये भाग घेण्यासाठी 16 जणांनी नोंदणी केली आणि स्पर्धेच्या नियमानुसार त्या सर्वांनी वर्ष 1968 मध्ये उपलब्ध असलेली साधने तसेच तंत्रज्ञान वापरुन एकट्याने जगप्रदक्षिणा पूर्ण करणे अपेक्षित होते. कमांडर टॉमी यांच्यासह केवळ तीन जण ही शर्यत पूर्ण करू शकले. उर्वरित स्पर्धकांना तांत्रिक अडचणी किंवा अपघातामुळे ही शर्यत अर्धवट सोडून द्यावी लागली.

भारतीय नौदलातर्फे आयोजित सागर परिक्रमेच्या पुढील शर्यतीत एकट्याने जगप्रदक्षिणा करण्यासाठी तयारी करत असलेल्या दोन महिला नौदल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य कमांडर अभिलाष टॉमी यांनी नुकतेच स्वीकारले आहे.

 

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1973195) Visitor Counter : 71


Read this release in: English , Urdu , Hindi