दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

“5जी परिसंस्थेच्या माध्यमातून डिजिटल परिवर्तन” या विषयावरील ट्रायच्या सल्लामसलत मसुद्यावर टिप्पण्या तसेच विरोधी टिप्पण्या स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली

Posted On: 30 OCT 2023 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा(ट्राय )ने 29 सप्टेंबर 2023 रोजी जारी केलेल्या 5 जी परिसंस्थेच्या माध्यमातून डिजिटल परिवर्तन या विषयावरील  सल्लामसलत मसुद्यावर भागधारकांकडून सूचना तसेच विरोधी सूचना मागवण्यात आल्या होत्या.  भागधारकांच्या सूचना स्वीकारण्यासाठी 30 ऑक्टोबर 2023 आणि विरोधी सूचना स्वीकारण्यासाठी 13 नोव्हेंबर 2023 पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती.

सणासुदीमुळे अत्यावश्यक माहिती गोळा करण्यात येणारे अडथळे आणि इतर तत्सम विविध कारणांमुळे उपरोल्लेखित मसुद्यावरील सूचना सादर करण्याची मुदत वाढवून देण्यासंदर्भात उद्योग संघटनांनी ट्रायकडे विनंत्या सादर केल्या होत्या. या संघटनांनी असे देखील म्हटले होते की, या मसुद्यात धोरणविषयक आव्हानांशी संबंधित अनेक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांचा तसेच नव्या तंत्रज्ञानांचा जलदगतीने स्वीकार आणि परिणामकारक वापर यांसाठी योग्य धोरणात्मक आराखड्याचा  समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सल्लामसलत मसुद्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी या सर्व मुद्द्यांविषयी तपशीलवार चर्चा तसेच विचारविनिमय होणे आवश्यक आहे असे मत या संघटनांनी मांडले.

भागधारकांनी केलेल्या विनंत्या लक्षात घेऊन आता सदर सल्लामसलत मसुद्यावरील सूचना पाठवण्याची अंतिम मुदत 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत तर विरोधी सूचना पाठवण्याची मुदत 11 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

भागधारकांनी त्यांच्या टिप्पण्या प्राधान्याने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advadmn[at]trai[dot]gov[dot]in  या ईमेल आयडी वर तसेच  vibhatomar[at]trai[dot]gov[dot]in या ईमेल आयडी वर पाठवाव्यात. अधिक तपशील किंवा माहितीसाठी सल्लागार (प्रशासन आणि आयआर) वंदना सेठी यांच्याशी  +91-11-23221509 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1973188) Visitor Counter : 67


Read this release in: Tamil , Hindi , Urdu , Telugu , English