पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मध्य प्रदेशात चित्रकूट येथे दिवंगत अरविंदभाई मफतलाल जन्मशताब्दी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 27 OCT 2023 7:19PM by PIB Mumbai

 

जय गुरुदेव! मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीयुत मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री भाई शिवराज जी, सद्गुरु सेवा संघ ट्रस्टचे सर्व सदस्यगण, स्त्री-पुरुषहो!

आज चित्रकूटच्या या पवित्र पुण्यभूमीवर मला पुन्हा येण्याची संधी मिळाली आहे. हे ते अलौकिक क्षेत्र आहे, ज्याविषयी आपल्या संतांनी सांगितले आहे-चित्रकूट सब दिन बसत, प्रभु सिय लखन समेत!

अर्थात्, चित्रकूटमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या सोबत  नित्य निवास करत असतात. येथे येण्यापूर्वी आता मला श्री रघुवीर मंदिर  आणि श्रीराम जानकी मंदिरात दर्शन घेण्याचे भाग्य देखील लाभले आणि मी हेलीकॉप्टरमधूनच कामदगिरि पर्वताला देखील नमस्कार केला. मी पूज्य रणछोड़दास जी आणि अरविंदभाई  यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पित करण्यासाठी गेलो होतो. प्रभू श्रीराम जानकीचे दर्शन, संतांचे मार्गदर्शन आणि संस्कृत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वेदमंत्रांचे हे अद्भुत गायन, या अनुभवाचे, या अनुभूतीचे तोंडाने वर्णन करणे कठीण आहे. मानव सेवेच्या महान यज्ञाचा भाग बनवण्याचे आणि त्यासाठी श्री सद्गुरु सेवासंघाचे देखील  आज मी सर्व पीड़ित, शोषित, गरीब, आदिवासींच्या वतीने आभार व्यक्त करतो. जानकीकुंड चिकित्सालयाच्या ज्या नव्या विंगचे आज लोकार्पण झाले आहे, यामुळे लाखों रुग्णांना नवीन जीवन मिळेल. आगामी काळात, सद्गुरु मेडिसिटी मध्ये गरीबांच्या सेवेच्या या अनुष्ठानाला नवा विस्तार मिळेल. आज या प्रसंगी अरविंद भाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकार ने विशेष टपाल तिकिट देखील प्रकाशित केले आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद क्षण आहे, समाधानाचा क्षण आहे, मी तुम्हा सर्वांना याबद्दल शुभेच्छा देतो.

 

मित्रहो,

कोणतीही व्यक्ती जी आपल्या आयुष्यात उत्तम काम करते, त्या व्यक्तीची प्रशंसा होते.  समकालीन लोक देखील कौतुक करतात, पण ज्यावेळी साधना असाधारण असते, त्यावेळी त्यांच्या हयातीनंतर देखील त्या कार्याचा विस्तार होत राहतो. अरविंद भाई यांचे कुटुंब त्यांच्या परमार्थिक पूंजीला सातत्याने समृद्ध करत आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. विशेषतः, बंधू विशदभगिनी रूपलज्या प्रकारे त्यांच्या सेवा अनुष्ठानांना नव्या ऊर्जेने उंची देत राहिले आहे, मी यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेषत्वाने शुभेच्छा देतो. आता अरविंद भाई तर उद्योग जगतातील व्यक्ती होते. मुंबईचे असो, गुजरातचे असो, संपूर्ण मोठे असलेल्या औद्योगिक कॉर्पोरेट विश्वात त्यांची खूप मोठी प्रतिमा होती, प्रतिष्ठ होती आणि विशद यांना वाटले असते तर त्यांना हा जन्मशताब्दी कार्यक्रम मुंबईत आयोजित करता आला असता. अतिशय मान, सन्मान, अभिमानाने झाला असता. पण, सदगुरुंप्रति समर्पण पहा की जसे अरविंद भाईंनी आपल्या जीवनाचा याच ठिकाणी  त्याग केला होता. शताब्दीसाठी देखील हीच जागा निवडण्यात आली आणि यासाठीच संस्कार देखील असतात, विचारही असतात, समर्पण देखील असते, तेव्हा कोठे हे होऊ शकते. पूज्य संतगण येथे खूप मोठ्या संख्येने आले आहेत. या ठिकाणी  अनेक कुटुंबे देखील बसली आहेत. चित्रकूटविषयी सांगण्यात आले आहे, कामद भे गिरि राम प्रसादा। अवलोकत अपहरत विषादा॥ अर्थात्, चित्रकूट  पर्वत, कामदगिरि, भगवान रामाच्या आशीर्वादाने सर्व अडचणी आणि समस्यांचे निवारण करणार आहे. चित्रकूट पर्वताचा हा महिमा येथील संत आणि ऋषींच्या माध्यमातून चिरंतन बनला आहे. आणि, पूज्य श्री रणछोड़दास जी असेच महान संत होते. त्यांच्या निष्काम कर्मयोगामुळे माझ्यासारख्या लक्षावधी लोकांना नेहमी प्रेरित केले आहे आणि जसा सर्वांनी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांचे ध्येय आणि अतिशय सोप्या शब्दात भुकेल्याला भोजन, वस्त्र नसलेल्याला वस्त्र, दृष्टीहिनाला दृष्टी. याच सेवा मंत्राने पूज्य गुरुदेव पहिल्यांदाच 1945 मध्ये चित्रकूटला आले होते, आणि 1950 मध्ये त्यांनी या ठिकाणी पहिल्या नेत्र यज्ञाचे आयोजन केले होते. यामध्ये शेकडो रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यांना नवा प्रकाश मिळाला होता.

आजच्या काळात आपल्याला या गोष्टी सामान्य वाटत असतील. पण, 7 दशकांपूर्वी, हे स्थान जवळजवळ पूर्णपणे वनक्षेत्र होते. येथे ना रस्त्यांची सोय होती, ना वीज होती, ना आवश्यक संसाधने होती. त्या वेळी या वनक्षेत्रात इतका मोठा संकल्प घेण्यासाठी किती साहस, किती आत्मबळ आणि सेवाभावाची पराकाष्ठा झाली असेल त्या वेळी हे शक्य झाले असेल. पण जिथे  पूज्य रणछोड़दास जींसारख्या संतांची साधना असते, तिथे संकल्पांचे सृजनच सिद्धीसाठी असते. आज या तपोभूमिवर आपल्याला सेवेचे हे जितके मोठ-मोठे प्रकल्प दिसत आहेत, ते याच ऋषींच्या संकल्पांचा परिणाम आहेत. त्यांनी या ठिकाणी श्रीराम संस्कृत विद्यालयाची स्थापना केली. काही वर्षांनी श्रीसद्गुरु सेवासंघ ट्रस्टची स्थापना केली. जिथे कुठे आपत्ती येत असतपूज्य गुरुदेव त्यांच्या समोर ढाल बनून उभे राहायचे. भूकंप असो, पूर असो, दुष्काळग्रस्त भागांमध्ये त्यांच्या प्रयत्नांनी, त्यांच्या आशीर्वादांनी कित्येक गरिबांना नवे जीवन मिळाले. हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे, जे स्व पासून वर उंचावून समष्टीसाठी समर्पित राहणाऱ्या महात्म्यांना जन्म देते.

 

माझ्या कुटुंबियांनो,

संतांचे है वैशिष्ट्य असते की जो त्यांच्या सहवासात येतो, मार्गदर्शन प्राप्त करतो, तो स्वतः देखील संत बनतो. अरविंद भाईंचे संपूर्ण जीवन या गोष्टीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. अरविंद जी वेशभूषेने अतिशय सामान्य जीवन जगत होते, सामान्य व्यक्ती दिसत होते. पण आतून त्यांचे जीवन एका परिपूर्ण संताप्रमाणे होते. पूज्य रणछोड़दास जींची अरविंद भाईंसोबत, बिहारमध्ये आलेल्या भीषण दुष्काळाच्या काळात भेट झाली. संतांचे संकल्प आणि  सेवेचे सामर्थ्य कशा प्रकारे या संगमाचे, त्यामध्ये सिद्धीचे कोणकोणते आयाम प्रस्थापित झाले, ते आज आपल्या समोर आहे.

आज जेव्हा आपण अरविंद भाई यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत, तेव्हा त्यांच्या प्रेरणा आपण आत्मसात करणे अतिशय गरजेचे आहे.  त्यांनी ज्या कोणत्या जबाबदारी स्वीकारल्या, त्या शंभर टक्के निष्ठेने पूर्ण केल्या. त्यांनी इतके मोठे औद्योगिक साम्राज्या उभे केले. मफतलाल समूहाला एक नवी उंची मिळवून दिली. ते अरविंद भाईच होते ज्यांनी देशातील पहिले पेट्रोकेमिकल संकुल स्थापित केले होते. आज देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि  सामान्य मानवाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक कंपन्यांच्या पायामध्ये त्यांचीच दृष्टी, त्यांची विचारसरणी, त्यांचे कष्ट आहेत. अगदी कृषी क्षेत्रातील त्यांच्या कामाची देखील मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जाते. भारतीय एग्रो-इंडस्ट्रीज़ फ़ाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाची आज देखील लोक आठवण काढतात. भारतच्या टेक्सटाइल सारख्या पारंपरिक उद्योगाला त्याचा सन्मान पुन्हा मिळवून देण्यामध्येही त्यांची खूप मोठी भूमिका होती. देशातील मोठ-मोठ्या बँकांचे, बड्या संस्थांचे देखील त्यांनी नेतृत्व केले. त्यांच्या कामाने, त्यांचे कष्ट आणि प्रतिभेने औद्योगिक विश्वाबरोबरच समाजावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. देश आणि जगातील कित्येक मोठे पुरस्कार आणि सन्मान अरविंद भाईंना मिळाले. द लायंस ह्युमेनीटेरियन अवार्ड, सिटिज़न ऑफ बॉम्बे अवार्ड, सर जहाँगीर गांधी गोल्ड मेडल फॉर इंडस्ट्रियल पीसअसे अनेक सन्मान देशासाठी अरविंद भाईच्या योगदानाचे प्रतीक आहेत. 

 

माझ्या कुटुंबीयांनो,

उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणम्॥ असे आपल्याकडे म्हटले जाते म्हणजेच आपल्या यशाचे आपण कमावलेल्या धनाचे सर्वाधिक प्रभावी संरक्षण होते ते त्यागाने. अरविंद भाईंनी हाच विचार मिशन म्हणून स्वीकारून आजीवन काम केले. आज आपल्या समूहाच्या माध्यमातून श्री सद्गुरु सेवा ट्रस्ट, मफतलाल फाउंडेशन, रघुवीर मंदिर ट्रस्ट, श्री रामदास हनुमान जी ट्रस्ट अशा कितीतरी संस्था काम करत आहेत. जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, ब्लाइंड पीपल असोसिएशन, चारुतर आरोग्य मंडळ, असे समूह आणि संस्था सेवेचे अनुष्ठान पुढे नेत आहेत. आपण पहातोच की रघुवीर मंदिर अन्नछत्रात लाखो लोकांची अन्नसेवा, लाखो संतांसाठी मासिक रेशन किटची इथून होणारी व्यवस्था, गुरुकुलमध्ये हजारो मुलांची शिक्षण-दीक्षा, जानकी कुंडाच्या चिकित्सालयात लाखो रुग्णांवर होणारे इलाज या काही सामान्य गोष्टी नाहीत. हे सगळे म्हणजेच आपल्याला निष्काम कर्म करण्याची ऊर्जा देणाऱी , सेवेलाच साधना मानून त्याच्या सिद्धीसाठी अनुपम अनुष्ठान करणारी अशी जी भारताची आत्मशक्ती आहे तिचा पुरावा आहे. आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून इथे ग्रामीण महिलांना ग्रामोद्योगाचे प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे. हा महिला-प्रणित  विकास देशाच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी मदत करत आहे.

 

मित्रहो,

सद्गुरु नेत्र चिकित्सालयने  आज देशातील जगातील उत्तमोत्तम नेत्र रुग्णालयांच्या पंक्तीत आपले स्थान निर्माण केले आहे, हे कळल्यावर मला आनंद झाला. हे रुग्णालय एके काळी बारा खाटांसह सुरू झाले होते. आज इथे प्रत्येक वर्षी जवळपास 15 लाख रुग्णांवर उपचार होतात. सद्गुरु नेत्र चिकित्सालयच्या कामाशी मी जवळून परिचित आहे. कारण माझ्या काशीला सुद्धा याचा लाभ मिळाला आहे. काशीमध्ये आपल्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या 'स्वस्थ दृष्टी समृद्ध काशी' या अभियानामुळे कितीतरी वयोवृद्धांची सेवा केली जात आहे. सद्गुरु नेत्र चिकित्सालयामार्फत आत्तापर्यंत बनारस आणि त्याच्या आजूबाजूच्या जवळपास साडेसहा लाख लोकांची त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली गेली. 90000 होऊन जास्त रुग्णांना या तपासणीनंतर शिबिरात  जाण्यास सांगितले गेले. बऱ्याच मोठ्या संख्येने रुग्णांच्या  शस्त्रक्रियासुद्धा झाल्या. काही काळापूर्वी मला मोहिमेच्या लाभार्थ्यांना काशीत भेटण्याची संधी मिळाली. मी माझ्या काशीच्या त्या सर्व लोकांच्या  वतीने ट्रस्ट आणि सद्गुरु नेत्र चिकित्सालय आणि सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा , आज तुमच्यात असताना खास करून आपल्या सर्वांचा आभारी आहे.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

संसाधने ही सेवेसाठी आवश्यक आहेत परंतु त्यासाठी समर्पण ही प्राथमिकता आहे .‍वाईटातल्या वाईट परिस्थितीत सुद्धा स्वतः प्रत्यक्ष काम करणे ही अरविंद भाईंची सर्वात खास बाब होती. राजकोट असो अहमदाबाद असो गुजरातच्या कानाकोपऱ्यात त्यांचं काम मी बघितले आहे. मी खूप छोटा होतो तेव्हाची आठवण आहे, सद्गुरुजींचे दर्शन होण्याचे भाग्य माझ्या नशिबात नव्हते पण अरविंद भाईंशी माझी  ओळख होती. मी पहिल्यांदा अरविंद भाईंना कुठे भेटलो तर गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र म्हणजे भिलवडा तिथे मोठा भयंकर दुष्काळ पडला होता आणि आमचे एक डॉक्टर मनीकर म्हणून होते. त्यांची अरविंद भाईंशी चांगली ओळख होती.आणि मी तिथे त्या आदिवासी बंधू भगिनीचे दुष्काळ पीडितांची सेवा करण्याचे काम करत होतो तेवढ्या भयंकर उष्मा असलेल्या अरविंद भाई आले, पूर्ण दिवस राहिले. स्वतः जाऊन सेवा यज्ञात भाग घेतला आणि काम पुढे नेण्यासाठी जे आवश्यक होते त्याची जबाबदारी सुद्धा घेतली. मी स्वतः त्यांची गरिबांसाठी असलेली तळमळ, काम करण्याचा त्यांचा निर्धार हे मी स्वतः पाहिले आहे , अनुभवले आहे आमच्या गुजरातमध्ये सुद्धा आदिवासी क्षेत्रात मध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी जे काम त्यांनी केले  आहे त्याची लोक अजूनही आठवण काढतात. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आमच्याकडे साधारणपणे गुजरातमध्ये आणि बाकी जिथे कुठे शेती करण्याची जागा असते त्याला शेत म्हणतात. पण दाहोद मधील लोक त्याला फुलवाडी असं संबोधतात. कारण सद्गुरु ट्रस्टच्या माध्यमातून तिथे शेतकऱ्यांना शेतीचेशा नवा प्रकार शिकवला गेला. ते फुलांची शेती करू लागले आणि फुलवाडी म्हणून ओळखले जातात आज त्यांची फुले  मुंबईत जातात आणि या सगळ्यांमध्ये अरविंद भाईंनी केलेल्या कष्टांची मोठी भूमिका आहे. सेवा करण्याच्या बाबतीत त्यांची एक वेगळीच तळमळ होती हे मी पाहिले आहे. त्यांना स्वतःला कधीही दाता म्हणून घेणं आवडलं नाही आणि ते दुसऱ्यांसाठी काही करत आहेत याचा सुद्धा उल्लेख ते करू देत नसत. कधी कोणी त्यांच्याबरोबर मिळून त्यांच्या कामात हातभार लावायची इच्छा व्यक्त केली तर ते म्हणतात आपल्याला आधी काम पाहण्यासाठी तिथे स्वतः यावं लागेल. त्या प्रकल्पासाठी कितीही कष्ट झाले तरी आपल्याला यावं लागेल आणि तेव्हाच कुठे आपल्या सहकार्याबद्दल विचार करा त्याच्या आधी नाही. त्यांचे काम त्यांचे व्यक्तिमत्व हे मी जेवढे जाणून घेतले आहे त्यामुळे माझ्या मनात त्यांच्या कामा बद्दल एक भावनिक बंध तयार झाला आहे. म्हणूनच मी स्वतःला या सेवा अभियानाचा एक समर्थक एक पुरस्कृत करणारा आणि एक प्रकारे आपला सहप्रवासी अशा स्वरूपात स्वतःला बघू शकतो.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

चित्रकूटची धरा आमच्या नानाजी देशमुख यांचीही कर्मभूमी आहे. अरविंद भाई प्रमाणेच सर्व आदिवासी  समाजाच्या सेवेसाठी त्यांनी घेतलेले कष्ट सुद्धा आमच्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे‌. आज त्यांचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवून  देश आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पहिल्यांदाच इतके व्यापक प्रयत्न करत आहे. भगवान बिरसा मुंडाच्या जन्मदिनी देशाने आदिवासी गौरव दिवसाची परंपरा सुरू केली आहे आदिवासी समाजाचे योगदान त्यांची परंपरा यांच्या गौरवासाठी देशभरात आदिवासी वस्तू संग्रहालये उभारली जात आहेत. आदिवासी मुलांनी चांगले शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे म्हणून एकलव्य निवासी विद्यालय उघडले जात आहे. वनसंपदा कायद्यासारखे धोरणात्मक निर्णय देखील आदिवासी समाजाच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचे माध्यम बनले आहेत. आमच्या या प्रयत्नांमुळे आदिवासी समाजाला जवळ घेण्यासाठी  प्रभू श्रीराम यांचा  आशीर्वाद ही आपल्यासाठी प्रेरणा आहे. हाच आशीर्वाद समरस आणि विकसित भारताच्या उद्दिष्टापर्यंत आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मी पुन्हा एकदा या शताब्दीच्या पावन प्रसंगी अरविंद भाईंच्या या महान तपस्येला श्रद्धापूर्वक वंदन करतो. त्यांचे कार्य, त्यांचे जीवन आम्हाला सर्वांना प्रेरणा देत राहो, सद्गुरूंचे आशीर्वाद आम्हाला सदैव मिळत राहो याच एका भावनेने आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद जय सियाराम

***

S.Kane/S.Patil/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1972506) Visitor Counter : 135