माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुजिब: द मेकिंग ऑफ ए नेशन' चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंग प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना उपस्थितांची उभे राहून मानवंदना


बांगलादेशाच्या पंतप्रधान आणि मुजिबूर रेहमान यांच्या कन्या शेख हसीना यांनी चित्रपटाला दिलेली पसंती माझ्यासाठी गौरव - श्याम बेनेगल

Posted On: 25 OCT 2023 10:36PM by PIB Mumbai

मुंबई, 25 ऑक्टोबर 2023
 

ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ तसेच बांगलादेश चित्रपट महामंडळ यांची सहनिर्मिती असलेल्या ' मुजिब : द मेकिंग ऑफ ए नेशन ' या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग आज मुंबईत राष्ट्रीय चित्रपट वस्तू संग्रहालयाच्या परिसरात झाले.

हा चित्रपट मूळ बांगला आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये दाखवण्यात आला. यावेळी दिग्दर्शक श्याम बेनेगल, प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते आरिफिन शुवू, इतर कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. त्याशिवाय चित्रपट सृष्टीतील दिग्गज आणि नामवंत मंडळीही यावेळी उपस्थित होते.

चित्रपट विभागाचे सह सचिव आणि एन एफ डी सी चे महासंचालक प्रिथुल कुमार देखील यावेळी उपस्थित होते. चित्रपटाचा ‘ शो’ संपल्यानंतर संपूर्ण थिएटरने उभे राहून टाळ्या वाजवत ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना मानवंदना दिली.


बहुचर्चित चरित्रपट मुजिब, बांगलादेशचे जनक आणि उत्तुंग राजकीय नेते शेख मुजिबुर रेहमान यांच्या जीवन कार्यावर आधारित आहे.


 

अत्यंत सकस कथावस्तू,  उत्तम तंत्रज्ञानाचा वापर यासाठी रसिकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. बांगलादेश मुक्ती युद्धात शेख मुजीबुर रेहमान यांनी केलेला संघर्ष या चित्रपटातून प्रामुख्याने मांडला असला तरी, त्याचवेळी त्यांच्या कुटुंबावरचे त्यांचे प्रेम आणि बांधिलकी देखील अत्यंत तरल पद्धतीने दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाच्या कथानकात मूजिबुर रेहमान यांच्या कुटुंबातील, आनंद, प्रेम आणि आपलेपणाचा भावना उत्कटपणे सादर करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी बाहेर सुरू असलेला स्वातंत्र्यलढा, अस्थिरता, तणाव या पार्श्वभूीवर रेहमान कुटुंबीयांमधला स्नेहाचा ओलावा,   चित्रपटाला उत्कट असा मानवी रंग देणारा आहे.

यावेळी श्याम बेनेगल म्हणाले, " चित्रपट बनवणे हा माझ्यासाठी निश्चितच एक आनंददायी अनुभव होता. बांगलादेशाच्या पंतप्रधान आणि शेख मूजीबुर रेहमान यांच्या कन्या शेख हसीना यांनी या चित्रपटाला दिलेली पसंतीची दाद माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता" असेही त्यांनी सांगितले.

13 ऑक्टोबर , 2023 रोजी हा चित्रपट  बांगलादेश मधे प्रदर्शित झाला आणि त्याला तिथे प्रेक्षकांचा विक्रमी प्रतिसाद मिळतो आहे, या चित्रपटाने आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत.भारतात आणि परदेशात, पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल द्वारे येत्या शुक्रवारी म्हणजे 27 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल.

चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे आफिरीन शुवू आणि नुसरत इमरोज तिशा या दोघांनीही मुजीबूर रेहमान आणि त्यांच्या देशावरच्या प्रेमापोटी, ह्या चित्रपटात नि:शुल्क अभिनय केला असून त्यांनी मानधन म्हणून केवळ एक टक्का घेतला.

अफिरीन शूवू यांनी शेख रेहमान यांची भूमिका पार पाडली असून यात त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे दिवस ते नवनिर्मित बांगलादेश घडवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. नुसरत इमरोज तिशा यांनी शेख फैजीलातुंनिसा (रेणू,) या शेख मुजीब यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात, तिचे कुटुंब, संघर्ष, तिची ताकद आणि मूजिबूर यांचे  नेतृत्व घडण्यात त्यांचे योगदान अशा सर्वांचे प्रत्ययकारी चित्रण आले आहे.

"बंगबंधू" या चित्रपटाच्या सहनिर्मितीसाठीच्या करारावर 14 जानेवारी 2020 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. एन एफ डी सी आणि बांगलादेश चे चित्रपट विकास महामंडळ यांच्यात हा करार झाला होता.

दोन्ही देशांची माहिती आणि प्रसारण मंत्रालये या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट म्हणजे शेख मुजिबूर रेहमान यांना त्यांच्या जनशताब्दीच्या तसेच बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाहिलेली श्रद्धांजली आहे.

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1971430) Visitor Counter : 146


Read this release in: English , Urdu , Hindi