शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चांद्रयान 3 च्या विशेष मॉडयूल बद्दल आलेल्या वृत्तासंदर्भात शिक्षण मंत्रालयाने दिलेले स्पष्टीकरण


या मोड्यूलमधील आशयाची रचना हेतूपूर्वक संवादात्मक आणि मनोवेधक ठेवण्यात आली

Posted On: 25 OCT 2023 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023

चांद्रयान 3 विशेष मॉडयूल  च्या संदर्भात काही प्रसारमाध्यमांनी ‘विज्ञान आणि पुराणकथा’ यांची सरमिसळ केल्याचे वृत्त दिल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.  राष्ट्रीय पातळीवर आपण अत्यंत वेगाने केलेली प्रगती आणि गाठलेले उल्लेखनीय टप्पे लक्षात घेता, आपले शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही, पारंपरिक पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणाऱ्या ज्ञानाची ओळख करून देणे महत्वाचे ठरते, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताचे चांद्रयान 3, 23 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वीपणे चंद्रभूमीवर उतरले, ही भारतासाठी खूप मोठी उद्दिष्टप्राप्ती आहे.  भारताच्या या अद्वितीय, विलक्षण अंतराळ मोहिमेची माहिती देशातील 26 कोटी विद्यार्थ्यांना व्हावी, या दृष्टीने, एनसीईआरटी ने स्वत:हून या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

या विशेष मॉड्यूल्सच्या विकासासाठी निवडलेली प्रारंभिक संकल्पना, चांद्रयान-3  अशी आहे. एनसीईआरटीने चांद्रयान-3 वर दहा विशेष मॉड्यूल तयार केले आहेत. हे मॉड्यूल या मिशनशी संबंधित सर्व  पैलूंची सर्वंकष ओळख करून देतात. यामध्‍ये  वैज्ञानिक, तांत्रिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूंचा समावेश आहे.

मॉड्यूल्स साठीचा आशय मुद्दामच, संवादात्मक आणि मनोवेधक ठेवण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यात रुचि वाटेल. यात ग्राफिक्स,छायाचित्रे, चित्रे, इतर उपक्रम, आव्हानात्मक प्रश्नोत्तरे आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे मॉड्यूल्स सर्व स्तरातील शालेय शिक्षणाच्या गरजा पूर्ण करणारे आहेत. ज्यात इयत्ता पहिली ते 12 पर्यंतचा समावेश होतो. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, वेगवेगळ्या स्तरावरच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा संदर्भ लक्षात घेऊन, त्यानुसार त्यांचा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. मॉडयूल मध्ये कथा, काही घटना, प्रश्नमंजूषा स्पर्धा आणि इतर उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना स्वयं-प्रेरणेने शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या सुचविलेल्या अध्यापनशास्त्रा नुसार, मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने त्यांची संरचना करण्यात आली आहे.

या मोहिमेत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी एनसीईआरटी ने काही विशेष पावले उचलली आहेत. चांद्रयान-3 वरील या मॉड्यूल्समध्ये त्यांना यथोचित श्रेय आणि सन्मान देण्यात आला आहे. डॉ. विक्रम साराभाई, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. एस. सोमनाथ, डॉ. के. सिवन, नंदिनी हरिनाथ आणि इतर अनेक शास्त्रज्ञांचे योगदान वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या मॉड्यूल्समध्ये ठळकपणे मांडण्यात आले आहे.

एनसीईआरटी वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या या मॉड्यूलचा शुभारंभ, शिक्षणमंत्र्यांनी इस्रोच्या अध्यक्षांच्या उपस्थितीतच केला आहे . या ऐतिहासिक कामगिरीला व्यापक प्रसिद्धी मिळावी, त्याचे कौतुक व्हावे आणि त्याचे महत्त्व  समजावे, या उद्देशाने हे मॉड्यूल विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना उपलब्ध करून दिले जातात. या उपक्रमाद्वारे, एनसीईआरटीने केवळ वैज्ञानिक वृत्तीला चालना दिलेली नाही तर शैक्षणिक समुदाय आणि सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्या देशाच्या कामगिरीबद्दल अभिमान, प्रेरणा आणि जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

 S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1971090) Visitor Counter : 120


Read this release in: Hindi , English , Urdu