इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

‘नवोन्मेषाची पुढची लाट गुजरात सारख्या राज्यांतून आणि देशातील छोटी शहरे-गावांतून येईल’ – केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

Posted On: 21 OCT 2023 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज वडोदरा इथल्या टायकॉन कार्यक्रमात झालेल्या एका चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी, स्थानिक गुंतवणूकदारांनी गुजरातमधल्या नवीन स्टार्ट अप कंपन्यांना 100 कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ देण्याची हमी दिली. राजीव चंद्रशेखर यांनी गेल्या वर्षी, प्रस्थापित उद्योजकांकडून, तसेच अतिश्रीमंत व्यावसायिकांकडून, स्टार्ट अप कंपन्यांना आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, गुजरातमधील स्टार्ट अप कंपन्यांना 1,500 कोटी रुपयांचे पाठबळ मिळाले होते. त्याच प्रयत्नांचा पाठपुरावा ह्या उपक्रमातून केला जात आहे.

या कार्यक्रमात, चंद्रशेखर यांनी, स्टार्ट अप कंपन्यांसाठी पोषक वातावरण निर्माण केल्याबद्दल तसेच, पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा अनेक संधी निर्माण करून दिल्याबद्दल, गुजरात सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळेच, स्टार्ट अप व्यवस्थेतील घडामोडींना चालना मिळाली आहे, यावर त्यांनी भर दिला. “आज आपण अत्यंत रोमांचक काळात जगत आहोत. भारतीयांमध्ये, विशेषतः  युवा  भारतीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्य केले आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. आपण काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये का जात नाही, जसे की आपले तरुण भारतीय अंतराळ रॉकेट का तयार करत नाहीत, असा प्रश्न ते अनेकदा विचारतात, यापूर्वी इतर कोणत्याही राजकारण्याने असे प्रश्न विचारले नव्हते. जेव्हा तुम्ही युवा भारतीयांवर आणि आपल्या देशावर विश्वास दाखवता, तेव्हा जग जे करू शकते ते काहीही साध्य करण्यास आपण सक्षम होत असतो. हे उत्पादनाच्या बाबतीत खरे आहे आणि सेमीकंडक्टर्सच्या बाबतीतही खरे आहे", असे चंद्रशेखर म्हणाले.

भूतकाळाविषयी बोलतांना राजीव चंद्रशेखर म्हणाले की पूर्वीची बिगर-भाजप सरकारे आणि राजकीय नेतृत्व अनेकदा भारताच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून देण्यात अपयशी ठरले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने तरुण भारतीयांमध्ये 'करू शकतो' आणि 'तुम्ही हे करू शकता'  ही सकारात्मक वृत्ती निर्माण केली आहे. आता समाजात नकारात्मकता नाही, उलट युवा काहीही असाध्य साध्य करू शकतात, अशी भावना आहे. आणि ह्या भावनेनेच, नवोन्मेष आणि स्वयं उद्यमशीलतेला नवी ऊर्जा दिली आहे, असे त्यांनी सांगितलं

“युवा भारतीयांनी हे समजून घेतले पाहिजे की पदवी महत्त्वाची आहे, परंतु त्याहूनही महत्त्वाचे आहे कौशल्ये प्राप्त करणे. जर तुम्ही कौशल्याशिवाय महाविद्यालयातून पदवीधर झालात, तर तुम्हाला स्टार्टअपच्या संधी आणि नोकरी मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. युवा भारतीयांना उपयुक्त ठरतील, अशी विविध कौशल्ये आणि उद्योजकता कार्यक्रम सरकारने उपलब्ध केले आहेत. आणि हा दृष्टीकोन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संलग्न केला आहे. त्याशिवाय, शाळा सोडणाऱ्या मुलांनाही आवश्यक कौशल्ये प्राप्त करता येतील, हे ही आम्ही सुनिश्चित केले आहे.  मी परदेशात काम करणाऱ्या अनेक उद्योजक आणि नोकरदारांशी चर्चा करत असतो, आज ते भारतात परतण्यास उत्सुक आहेत कारण त्यांना त्याची अफाट क्षमता दिसते आहे ", असे राजीव चंद्रशेखर म्हणाले.

 

* * *

M.Pange/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969837) Visitor Counter : 75