संरक्षण मंत्रालय
लष्करी कमांडर्स परिषदेची आज झाली सांगता
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2023 8:36PM by PIB Mumbai
लष्करी कमांडर्स परिषद 2023 चा दुसरा टप्पा 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आभासी आणि प्रत्यक्ष अशा हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आला. चालू घडामोडींच्या संदर्भात सुरक्षा संबंधित पैलूंवर विस्तृत चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 18 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित केले. चीफ ऑफ डिफेन्स (सीडीएस)स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनीही परिषदेला संबोधित केले.
मध्य पूर्वेतील चालू भू-राजकीय संकट आणि संघर्षातून धडे घेत अनपेक्षित बाबींचा विचार करून सज्जता ठेवण्याची गरज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. ताकदीच्या विषमतेचा चुकीचा अर्थ लावण्याची आणि प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती ही कोणत्याही संघर्षातील विजय किंवा पराभव यांच्यातील रेषा परिभाषित करत असते, असे त्यांनी नमूद केले.
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी राष्ट्रीय सुरक्षा आरेखन आणि बदलत्या प्रतिमानाशी जुळवून घेण्यासाठी लष्करी बाबींमध्ये क्रांतीची गरज स्पष्ट केली. तर लष्करप्रमुखांनी सध्या सुरू असलेल्या बदलांमध्ये उत्साही सहभागासाठी आणि ते आत्मसात करण्यासाठी लष्कराचे कौतुक केले. परिवर्तनाच्या प्रक्रियेचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला केले. हवाई दल प्रमुखांनी कार्यान्वयन पैलूंचा समावेश केला आणि इष्टतम कार्यान्वयन परिणामांसाठी सेवांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तमान/उभरत्या सुरक्षा परिस्थितींवर विचारमंथन केले आणि भारतीय सैन्याच्या कार्यान्वयन सज्जतेचा आढावा घेतला. त्यांनी संघटनात्मक संरचना आणि विकसित होत असलेल्या प्रशिक्षण पद्धतींच्या मूलभूत पैलूंचाही अभ्यास केला.
रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्ष यासह भौगोलिक-सामरिक मुद्द्यांवर लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्यासाठी बोध घेण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
***
G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969591)
आगंतुक पटल : 124