आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लिंगाधारित असमानता दूर करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केंद्रीय पर्यवेक्षक मंडळाची 29 वी बैठक बोलावली


लिंग गुणोत्तरात 2017-19 मधील 904 वरून 2018-20 मध्ये 907 इतकी तीन आकड्यांची सुधारणा झाल्याची डॉ. मनसुख मांडवीय यांची माहिती

Posted On: 20 OCT 2023 1:28PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी 18 ऑक्टोबर 2023 रोजी केंद्रीय पर्यवेक्षक मंडळाची (सीएसबी) 29 वी बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या माध्यमातून मुली आणि महिलां विरोधातील लिंगभेद दूर करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. देशातील घटते लिंग गुणोत्तर (सीएसआर) आणि जन्मलेल्या बालकांचे लिंग गुणोत्तर (एसआरबी), यावर या बैठकीत चर्चा झाली. लिंग आधारित भेदभाव, आणि त्यामुळे  भ्रूण हत्येला कारणीभूत ठरणारी गर्भ लिंग निवड या मुद्द्यांवर यावेळी भर देण्यात आला. 

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लैंगिक समानतेच्या दिशेने सुरु असलेल्या  देशाच्या वाटचालीबद्दल आशावाद व्यक्त केला. 2020 च्या नवीन नमुना नोंदणी सर्वेक्षण (एसआरएस) अहवालाचा दाखला देत त्यांनी, जन्मलेल्या बालकांच्या लिंग गुणोत्तरामध्ये (एसआरबी) लक्षणीय प्रगती झाल्याचे घोषित केले.

सर्वेक्षण डेटा 2017-19 मधील 904 वरून 2018-20 मध्ये 907 इतकी तीन आकड्यांची प्रगती दर्शवतो, आणि ती प्रशंसनीय आहे. महत्त्वाचे म्हणजे, सर्वेक्षण केलेल्या 22 पैकी 12 राज्यांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. यामधून या राज्यांनी गर्भधारणा पूर्व आणि प्रसूती पूर्व गर्भ लिंग निदान तंत्रज्ञान (गैरवापर नियमन आणि प्रतिबंध) कायदा 1994 (PC&PNDT कायदा) आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेले एकत्रित प्रयत्न दिसून येतात.आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले. 

त्यानंतर, त्यांनी माहिती दिली की नवीन एसआरएस अहवालाने सूचित केले आहे की लिंग गुणोत्तरामध्ये 2015 मधील पाच अंकांच्या फरकाच्या तुलनेत 2020 मध्ये दोन अंक इतकी घट झाली आहे. ते म्हणाले, "दहा राज्यांनी लिंग दरामधील फरक प्रभावीपणे बदलला आहे, ज्यामुळे मुलींच्या जन्मदरावर  सकारात्मक परिणाम झाला आहे".

डॉ. मांडवीय यांनी IVF प्रक्रिया, नॉन-इनवेसिव्ह प्रीनेटल टेस्ट (NIPT), आणि कॉम्पॅक्ट डायग्नोस्टिक उपकरणे यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवरही भर दिला, ज्याच्या मदतीने कुटुंब नियोजनाच्या नावाखाली गर्भ लिंग निवड करता येते. " सकारात्मक वैद्यकीय उपयुक्तता असूनही, या तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जाऊ शकतो आणि त्यामुळे लिंग असंतुलन वाढते”, ते म्हणाले.

या संदर्भात, हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांनी केलेल्या सक्रीय  उपाययोजनांची डॉ. मांडवीय यांनी प्रशंसा केली. लिंग आधारित गर्भ लिंग निवडीला अटकाव घालण्यासाठी या राज्यांनी राबवलेल्या स्टिंग ऑपरेशन आणि खबरीयोजनेसारख्या नाविन्यपूर्ण धोरणांची त्यांनी प्रशंसा केली.  

या प्रयत्नांची प्रशंसा करून, इतर राज्यांनीही हा मार्ग अनुसरावा आणि या लोकसंख्या शास्त्रीय दृष्ट्‍या गंभीर समस्येचे निराकरण करण्यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्र्‍यांनी केले.  

बैठकीचा समारोप करताना, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक कृतीचे आवाहन केले. वैद्यकीय समुदायानेही  आपल्या व्यवसायातील गैरप्रकार ओळखावेत आणि घटते बाल लिंग गुणोत्तर आणि जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर या समस्यांना तोंड देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावावी असे आवाहन त्यांनी केले. सीएसबी बैठकीत लिंग-आधारित भेदभाव दूर करण्याची आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याची सामुहिक वचनबद्धता दिसून आली.  

***

G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1969383) Visitor Counter : 138