शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे जीएमआयएसच्या विशेष सत्रात मार्गदर्शन
नाविक कर्मचारी जागतिक अर्थव्यवस्थेचे अनाम वीर आहेत- धर्मेंद्र प्रधान
राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून आपल्या नाविकांमध्ये कौशल्य निर्मिती, कौशल्य सुधारणा आणि कौशल्य अद्ययावतीकरण करण्यासाठी आणि उद्योग-सज्ज बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत- धर्मेंद्र प्रधान
Posted On:
19 OCT 2023 6:42PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने मुंबईत आयोजित केलेल्या ग्लोबल मेरिटाईम इंडिया समिट (GMIS)ला संबोधित केले. जगातील सर्वात मोठ्या सागरी परिषदांपैकी एक असलेल्या या तीन दिवसीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी 2.37 लाख कोटी रुपये इतक्या मोठ्या गुंतवणुकीची नोंद झाली.
सागरी उद्योगाला पाठबळ देणाऱ्या नाविकांकडून मिळत असलेल्या सेवेची प्रधान यांनी प्रशंसा केली. हे कर्मचारी जागतिक अर्थव्यवस्थेचे अनाम वीर आहेत, असे ते म्हणाले. हे कर्मचारी जागतिक पुरवठा साखळीला पाठबळ देतात, व्यापाराला सुविधा पुरवतात, पर्यटनाला पाठबळ देतात, देशाच्या जलमार्गाद्वारे होणाऱ्या उपक्रमांशी संबंधित हितसंबंधांचे रक्षण करतात आणि देशाच्या विकासात योगदान देतात, असे प्रधान यांनी अधोरेखित केले.
जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत हे एक तेजस्वी स्थान आहे आणि लोकशाही, लोकसंख्येची कार्यप्रवणता आणि विविधता यांसारख्या स्तंभांचे पाठबळ असलेला देश आहे, असे प्रधान म्हणाले. 2.5 लाख नाविकांसह जागतिक पातळीवर नाविकांच्या पुरवठ्यामध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे. ही संख्या जागतिक नाविक समुदायाच्या 12 टक्के आहे आणि ती 20 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
मानव संसाधन आणि क्षमता विकासाशी संबंधित मुद्यांची हाताळणी करणारी ही पहिली तांत्रिक-आर्थिक शिखर परिषद आहे यावर त्यांनी भर दिला. सागरी प्रशिक्षणाचे प्रमाणीकरण करण्यासाठी, ऑन-बोर्ड प्रशिक्षणात वाढ करण्यासाठी आणि परीक्षा आणि प्रमाणपत्र आणि व्यवसाय सुलभतेच्या सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे एक दशकभर सरकारकडून होत असलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले.
प्राचीन काळात भारताच्या वैभवशाली सागरी व्यापारामध्ये ओदिशा कशा प्रकारे एक मध्यवर्ती स्थान बनले होते याची आठवण प्रधान यांनी करून दिली. आपल्या सागरी वारशाचे जतन करणे महत्त्वाचे असताना नव्या भारताचा पाया घालण्यासाठी सागरी सामर्थ्यात वाढ करणे देखील महत्त्वाचे असल्यावर त्यांनी भर दिला.
देशाला वैभवशाली सागरी परंपरा होती, जहाज बांधणीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान यात देश आघाडीवर होता ज्याचे चित्र बाली जत्रेच्या वैभवशाली परंपरेत दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यापूर्वी झालेल्या इंडोनेशियातील जी20 शिखर परिषदेत याचा उल्लेख केला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
एक भक्कम कौशल्य केंद्रित आणि उद्योग सज्ज परिसंस्था विकसित करण्यासाठी आवश्यक असलेलं नेतृत्व दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि सर्वांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण आणि
कौशल्य उपलब्ध करून ज्ञानाच्या परिसंस्थेत खूप मोठे परिवर्तन घडवण्यामध्ये एनईपी 2020 चे महत्त्व सांगितले. परिवर्तनकारक शिक्षण प्रणालीमध्ये अतिशय सुलभतेने कौशल्याचा समावेश करणाऱ्या या प्रणालीच्या मदतीने विविध आव्हानांचा सामना करणाऱ्या युवा वर्गामध्ये कौशल्य निर्माण करता येईल, असे त्यांनी सांगितले. नाविकांमध्ये कौशल्य निर्मिती, कौशल्य सुधारणा आणि कौशल्य अद्ययावतीकरण करण्यासाठी ही प्रणाली मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
***
SonalT/SHaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969349)
Visitor Counter : 125