शिक्षण मंत्रालय

सर ज जी कला महाविद्यालय या संस्थेला डी नोव्हो अभिमत विद्यापीठाचा दर्जा घोषित


जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ही केवळ एक संस्था नसून नवोन्मेषाची प्रयोगशाळा आहे : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

या संस्थेने विश्वकर्मा योजनेवर आधारित अभ्यासक्रम निर्माण करावा अशी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची सूचना

Posted On: 19 OCT 2023 10:13PM by PIB Mumbai

मुंबई, 19 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबईतील 166 वर्ष जुन्या सर ज जी स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी सर ज जी कला महाविद्यालय या संस्थेला दे नोव्हो म्हणजेच अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा केली, यामुळे ही संस्था नव्याने कोणताही स्वायत्त अभ्यासक्रम सुरू करु शकेल, तसेच प्रधान यांच्या हस्ते नव्या विद्यापीठाचा कोनशिला समारंभ देखील करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

  

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की ज जी कला महाविद्यालय ही केवळ एक संस्था नसून ती नवोन्मेषाची प्रयोगशाळा आहे. ते म्हणाले की या संस्थेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यात येईल आणि ही संस्था जागतिक दर्जाचे उत्कृष्टता केंद्र होईल. नव्या क्रमिक पाठ्यपुस्तकांसाठी चित्रे तयार करण्याची तसेच विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्याची मागणी त्यांनी ज जी कला महाविद्यालय या संस्थेच्या संचालकांकडे केली.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री प्रधान म्हणाले की, भारतीय व्यवस्थेमध्ये गेल्या अनेक शतकांपासून सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा चालत आलेली आहे आणि सर ज जी कला महाविद्यालय हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. समस्त भारतीयांमध्ये मुंबईची हुशारी, संघटीत दृष्टीकोन, संस्कृती आणि ‘मुंबई पॅटर्न’ बद्दल मोठे आकर्षण आहे आणि सर ज जी स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्याचे दर्शन घडते. ही संस्था येत्या अनेक शतकांमध्ये ही परंपरा अशीच सुरु ठेवेल यावर केंद्रीय मंत्र्यांनी अधिक भर दिला.

याप्रसंगी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या दीडशे वर्षांच्या काळात सर ज जी कला महाविद्यालय या संस्थेने कला, उपयोजित कला आणि वास्तुरचनाशास्त्र या क्षेत्रांमध्ये अत्यंत कुशल मनुष्यबळ निर्माण केले आहे. मुंबईतील अनेक प्रसिध्द वास्तूंच्या निर्मितीमध्ये या संस्थेने योगदान दिले आहे. या संस्थेची नवी शाखा देखील समाजाला अनेक नव्या कलाकृतींची निमिती करून देईल अशी आशा देखील फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

माहितीच्या क्षेत्रातील अभिनव आणि उदयोन्मुख घटकांमध्ये शिक्षण आणि संशोधनाच्या बाबतीत नवोन्मेष करण्याप्रती समर्पित संस्थांना दे नोव्हो श्रेणी देऊन गौरवण्यात येते. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ‘सर ज जी कला, वास्तुरचनाशास्त्र आणि रचना महाविद्यालय’ हे आता महाराष्ट्रातील एकमेव सरकारी अभिमत विद्यापीठ असेल आणि देशभरात ‘डी नोव्हो’ शीर्षकाने सन्मानित मोजक्या संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होईल.

 

* * *

PIB Mumbai | R.Aghor/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969236) Visitor Counter : 99


Read this release in: English , Urdu , Hindi