कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
चंद्रयान-3 मोहिमेवरील ‘अपना चंद्रयान’ या कृती-आधारित मदत साहित्य असलेल्या वेब पोर्टलचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या ह्स्ते उद्घाटन
Posted On:
17 OCT 2023 5:34PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे, चंद्रयान-3 मोहिमेवर आधारित अपना चंद्रयान’ या नव्या वेब पोर्टलचे उद्घाटन केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अधिपत्याखाली एनसीईआरटीने विकासीत केलेल्या या पोर्टलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, कोडी इत्यादी प्रत्यक्ष कृतींवर आधारित मदत साहित्याचा समावेश आहे.केंद्रीय मंत्री प्रधान यांनी यावेळी ‘चंद्रयान-3’ वर आधारित 10 विशेष मोड्यूल्स देखील जारी केली.या मोड्यूल्सद्वारे चंद्रयान-3 मोहिमेच्या शास्त्रीय, तांत्रिक आणि सामाजिक बाजूंचा व्यापक आढावा घेता येईल तसेच या मोहिमेत सहभागी असलेल्या वैज्ञानिकांचा भावनिक प्रवास आणि संघभावना यांची देखील माहिती मिळेल.
या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून इस्रोचे अध्यक्ष आणि अंतराळ संशोधन विभागाचे सचिव डॉ.श्रीधर पणीकर सोमनाथ उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, केंद्रीय मंत्री प्रधान यांनी सांगितले की चंद्रयान-3 मोहिमेला मिळालेले यश हे 21 व्या शतकात आपण केलेल्या सर्वात लक्षणीय कामगिरीपैकी एक असून त्यातून देशातील मुलांना सर्वाधिक प्रेरित केले आहे. मुलांना सुलभतेने स्वयंशिक्षण घेता यावे या दृष्टीने हे वेब पोर्टल अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी या पोर्टलचे अॅप विकसित केले जावे अशी सूचना त्यांनी यावेळी मांडली. चंद्रयान-3 मोहिमेने देशातील मुलांमध्ये आत्मविश्वासाची ठिणगी पेटवली असून त्यांना तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी प्रेरणा दिली आहे. यामुळे मुलांना स्वतःमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यात मदत होईल असे त्यांनी नमूद केले.
चंद्रयान-3 बाबतच्या गोष्टी देशातील मुलांपर्यंत पोहोचवा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.सोमनाथ यांना केली आहे अशी माहिती देखील केंद्रीय मंत्री प्रधान यांनी उपस्थितांना दिली. पंतप्रधानांनी डॉ.सोमनाथ यांच्यावर सोपवलेल्या, कक्षीय अवकाश स्थानकाची उभारणी, अत्याधुनिक प्रक्षेपक यांचे विकसन इत्यादी जबाबदाऱ्यांची विस्तृत माहिती देखील प्रधान यांनी दिली. मुलांसाठी विज्ञान म्हणजे गमतीची बाब व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची विनंती देखील केंद्रीय मंत्र्यांनी डॉ.सोमनाथ यांना केली.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चंद्रयान मोहिमेबाबतच्या गोष्टी देशातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी असा विशेष उपक्रम सुरु केल्याबद्दल डॉ.सोमनाथ यांनी भाषणादरम्यान त्यांचे आभार मानले. याप्रसंगी उपस्थित मुलांना संबोधित करताना, भारताने चंद्रयान-3 मोहिमेसाठी संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला यावर त्यांनी अधिक भर दिला.
येत्या 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता होणारे गगनयानाचे प्रक्षेपण आवर्जून पाहण्याची सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना केली. स्वतःमध्ये महत्वपूर्ण विचारसरणी रुजवून घेऊन संशोधक होण्याची प्रेरणा त्यांनी युवा वर्गाला दिली.
या पोर्टलची तपशीलवार माहिती घेण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा :
https://bharatonthemoon.ncert.gov.in
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1968600)
Visitor Counter : 161