आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक आरोग्य शिखर परिषद 2023
डॉ. भारती प्रवीण पवार यांनी "प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये असंसर्गजन्य रोगांच्या एकात्मीकरणात वृद्धी करणे" या विषयावरील उच्चस्तरीय पॅनल चर्चेत केले बीजभाषण
आपल्या नागरिकांच्या निरामयतेसाठी असंसर्गजन्य रोगांचा प्रसार आणि प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय, तात्काळ चर्चा आणि कार्यक्षम व्यवस्थापन यांचा समावेश असलेल्या व्यापक धोरणाच्या आवश्यकतेवर भारत दृढतापूर्वक भर देतो: डॉ. भारती प्रवीण पवार
Posted On:
15 OCT 2023 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2023
"भारताने 75/25 उपक्रम सुरू केला आहे, ज्याचे उद्दिष्ट 2025 पर्यंत उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त असलेल्या 75 दशलक्ष व्यक्तींची तपासणी करणे आणि त्यांना मानक आरोग्य सेवा प्रदान करणे हे आहे. जागतिक स्तरावर प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये असंसर्गजन्य रोगांचा हा सर्वात व्यापक विस्तार आहे.
आपल्या नागरिकांच्या निरामयतेसाठी असंसर्गजन्य रोगांचा (एनसीडी) प्रसार आणि प्रभाव कमी करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकतेवर भारत दृढतापूर्वक भर देतो. याच्या उद्दिष्टात प्रतिबंधात्मक उपाय, प्रारंभिक चर्चा आणि कार्यक्षम व्यवस्थापन यांचा समावेश आहे." असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी नवी दिल्ली येथे जागतिक आरोग्य शिखर परिषद 2023 मध्ये "प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये असंसर्गजन्य रोगांच्या एकात्मीकरणात वृद्धी करणे" या विषयावरील उच्चस्तरीय पॅनेल चर्चेत सांगितले. त्या या परिषदेत आज आभासी माध्यमातून सहभागी झाल्या. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) भारतातील प्रतिनिधी डॉ. रॉडेरिको एच. ऑफ्रिन हेही यावेळी उपस्थित होते. या वर्षीच्या जागतिक आरोग्य शिखर परिषदेची संकल्पना "जागतिक आरोग्य कृतीसाठी निर्णायक वर्ष" ही आहे.
असंसर्गजन्य रोग कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना, डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या, "भारताने 75/25 उपक्रम सुरू केला आहे, ज्याचे उद्दिष्ट 2025 पर्यंत उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त 75 दशलक्ष व्यक्तींना तपासणे आणि त्यांना मानक आरोग्य सेवा प्रदान करणे हे आहे. जागतिक स्तरावर प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये असंसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठीचा हा सर्वात व्यापक उपक्रम आहे." त्या म्हणाल्या, "सरासरी आयुष्य, मातामृत्यू आणि असंसर्गजन्य रोग यासारख्या भारतातील सामाजिक समस्या निर्देशक सुधारण्याचे स्पष्ट प्रयत्न आहेत आणि हे या उद्दिष्टाच्या दिशेने केलेले प्रयत्न आहेत . 2023-2024 या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या फल निष्पत्ती अर्थसंकल्पीय दस्तऐवजात प्रथमच उच्च रक्तदाब आणि मधुमेहावरील उपचारांचा निर्देशांक म्हणून समावेश केला हे उल्लेखनीय आहे. हा समावेश उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी एकात्मिक सेवा वाढवण्याबद्दल सरकारचे समर्पण अधोरेखित करतो आणि या आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या वचनबद्धतेवर भर देतो.”
असंसर्गजन्य रोग हे एक महत्त्वपूर्ण जागतिक आरोग्य आव्हान बनले आहे ज्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे केंद्रीय मंत्र्यांनी यावर भर दिला आणि त्या म्हणाल्या “भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत 2010 मध्ये असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (एनपी-एनसीडी) सुरू केला. पायाभूत सुविधा मजबूत करणे, मनुष्यबळ विकास, आरोग्य प्रोत्साहन, लवकर निदान, व्यवस्थापन आणि संदर्भसेवा मजबूत करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांसाठी (यूएचसी) आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या अर्थसंकल्पीय वचनबद्धतेमध्ये आयुष्मान भारत उपक्रम धोरणात्मक हेतू स्पष्ट करत आहे, ज्याने 'कोणालाही मागे न ठेवण्याची' वचनबद्धता अधोरेखित केली आहे.
असंसर्गजन्य रोगांचा (एनसीडी) मुकाबला करण्यासाठी भारत सरकारने घेतलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकताना, डॉ.पवार म्हणाल्या, "केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत - आरोग्य आणि निरामयता केंद्रे (एबी-एचडब्ल्यूसी) यात सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) अंतर्गत लोकसंख्या-आधारित स्क्रीनिंग (पीबीएस) लागू करण्यात आली आहे." 30 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना सामान्य एनसीडी (उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) जोखीम मूल्यांकन आणि स्क्रीनिंगसाठी लक्ष्य केले जाते. प्रशिक्षित अशा आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सेवा पुरविल्या जात आहेत आणि संदर्भसेवेसाठी मदत आणि आरोग्य सेवा वितरण प्रणालीच्या सर्व स्तरांद्वारे काळजी घेण्याचे सातत्य सुनिश्चित केले जाते. त्या म्हणाल्या, "ई-संजीवनीच्या माध्यमातून, माहिती तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेचा फायदा घेऊन भौगोलिक अंतर, उपचाराचा खर्च अशा अडथळ्यांना मागे टाकून, असंसर्गजन्य रोगांसाठी (एनसीडी ) दूरस्थ पद्धतीने आरोग्य सेवा नागरिकांना पुरविल्या जातात."
सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या सहकार्याने आरोग्य सेवा वितरणाच्या सर्व स्तरांवर असंसर्गजन्य रोग (एनसीडी) प्रतिबंध आणि नियंत्रण तसेच निरोगी जीवनशैलीसाठी जनजागृती अभियान पातळीवर
राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या , “रोगाच्या व्यवस्थापनापलीकडे, आरोग्य आणि निरामयता केंद्रे समुदायाचे कल्याण आणि आनंदी जीवन सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करतात. याव्यतिरिक्त, आम्ही फिट इंडिया चळवळ आणि संबंधित मंत्रालयांद्वारे हाती घेतलेल्या योग-संबंधित क्रियाकलापांसाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि आयुष मंत्रालयासारख्या इतर केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी देखील सहकार्य केले आहे. "असंसर्गजन्य रोगांबद्दल (एनसीडी) जनजागृती वाढवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर उपक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आरोग्य दिवस पाळणे आणि सतत समुदाय जागरूकतेसाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाचा वापर समाविष्ट आहे."
देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करताना
केंद्रीय मंत्र्यांनी डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाच्या पुढाकारांवर भर दिला ज्याने असंसर्गजन्य रोग (एनसीडी) चे व्यवस्थापन आणि प्रतिबंध मध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. “राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग (एनसीडी) पोर्टलचा वापर सामान्य असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंध, नियंत्रण, तपासणी आणि व्यवस्थापनासाठी केला जात आहे. असंसर्गजन्य रोग (एनसीडी) साठी वैयक्तिक तपासणी आणि उपचारांच्या अनुपालनाचा अहवाल देण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये या पोर्टलद्वारे प्राथमिक स्तरावरील माहिती संकलित केली जाते. यात क्लाउडमधील प्रत्येक व्यक्तीसाठी एकल रेखांशाशी निगडीत आरोग्य माहिती देखील समाविष्ट आहे,जी एका विशेष आरोग्य आभा आयडी सेवे ( एबीएचए आईडी: आयुष्मान भारत आरोग्य खाते ओळख क्रमांक) द्वारे निश्चित केली जाते. यामुळे माहितीची उपलब्धता आणि उपचार सुविधा आणि सेवा यांच्यातील संबंध सुनिश्चित होतात .
डॉ. भारती प्रवीण पवार यांनी असंसर्गजन्य रोग (एनसीडी) प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी भारताच्या समर्पित वचनबद्धतेचा पुनरुच्चार करून आणि या महत्त्वाच्या क्षेत्रातील जागतिक प्रयत्नांबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करून या सत्राचा समारोप केला. "एक पृथ्वी, एक आरोग्य" च्या भावनेने, भारताने इतर राष्ट्रांना सहयोग आणि यश सामायिक करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. हे जागतिक आरोग्याची परस्परसंबंधितता अधोरेखित करते, एक सहयोगी दृष्टिकोनाचे समर्थन करते, जिथे देश एकत्रितपणे असंसर्गजन्य रोगांद्वारे (एनसीडी) उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात. "हा सहयोगी प्रयत्न आपल्या जागतिक समुदायाच्या कल्याणासाठी एकतेची व्यापक नीति आणि सामायिक जबाबदारी प्रतिबिंबित करतो." असे त्या म्हणाल्या.
* * *
Jaydevi PS/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1968241)
Visitor Counter : 206