कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने तिसऱ्या विशेष स्वच्छता मोहीमअंतर्गत कचऱ्याचे शिल्पांमध्ये केले रूपांतर


7 कोटी रुपयांच्या 1344 मेट्रिक टन भंगाराचा केला निपटारा

Posted On: 11 OCT 2023 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2023

कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी,साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स(SECL) तिसरी विशेष स्वच्छता मोहीम,सक्रियपणे राबवत, असून भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे आणि जागा मोकळी करणे हे काम करत आहे. याच मोहिमेत एक पाऊल पुढे टाकत, या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने (PSU) खाणकामातील भंगार सामुग्रीचे सुंदर शिल्पांमध्ये रूपांतर करत कचऱ्यापासून सर्वोत्तम निर्मिती करण्यासाठी संधी देखील घेतली आहे.

सरकारने या वर्षी 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम 3.0 राबविण्याची घोषणा केली आहे, ज्यात स्वच्छता आणि सरकारी कार्यालयांमधील प्रलंबितता कमी करण्यावर भर दिला आहे. या मोहिमेचा एक प्रमुख भाग म्हणजे निरुपयोगी भंगार साहित्याची  विल्हेवाट लावणे.

या तिसऱ्या विशेष स्वच्छता मोहीमेदरम्यान एसईसीएलच्या जमुना कोटमा एरियाने स्क्रॅप टू स्कल्पचर हा उपक्रम हाती घेतला आहे. कोळसा खाणीतील भंगार साहित्याचे विविध सर्जनशील शिल्पांमध्ये रूपांतर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील बंकिम विहार, जमुना कोटमा विभागात भंगारातून तयार केलेली ही शिल्पे प्रदर्शित करण्यासाठी कोळसा खाणीने  एका सार्वजनिक उद्यानाची स्थापना केली आहे. भंगारापासून बनवलेल्या या शिल्पांमध्ये कोळसा खाणीतील कामगार, सिंह, सारस पक्षी आणि फुले अशा  प्रमुख शिल्पांचा समावेश आहे.

कोळसा खाणीतील कामगाराचे शिल्प तुटके लोखंडाचे तुकडे, पोलादाचे कापलेले तुकडे, बेअरिंग हाल्व्हृज आणि कन्व्हेयर बेल्टच्या रोलर्सचे बनलेले आहे. या शिल्पाचे वजन अंदाजे 1.7 टन आहे.

सुमारे 1.5 टन वजनाचे, सिंहाचे शिल्प तुटके लोखंडाचे तुकडे, हलक्या पोलादाचे कापलेले तुकडे,, धातूचे पट्टे, बेअरिंग हाल्व्हृज, बेअरिंग बॉल आणि कन्व्हेयर बेल्टचे रोलर्स यांनी बनविलेले आहे.

सारस पक्षी आणि फुलांची शिल्पे तुटके लोखंडाचे तुकडे, हलक्या पोलादाचे कापलेले तुकडे, धातूचे पट्टे, बेअरिंग हाल्व्हृज आणि बेअरिंग बॉल, वेगवेगळ्या आकाराचे पाईपचे तुकडे आणि कन्व्हेयर बेल्टचे रोलर्सनी बनवलेली असून ते अनुक्रमे, सुमारे 2.3 टन आणि 1.2 टन वजनाचे तुकड्यांनी बनलेले आहेत.

कोळसा खाणींतून मोठ्या प्रमाणावर असलेले भंगार साहित्य,जे सहसा दीर्घकाळ वापराविना पडलेले असते आणि अखेरीस लिलावात जाते, त्यांचे रूपांतर सर्वसामान्यांच्या लाभासाठी उत्पादक वापरात केले जाऊ शकते,या पार्श्‍वभूमीवर या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती

ही शिल्पे प्रादेशिक कार्यशाळा, कोटमा कोलियरी येथे डिझाइन आणि तयार करण्यात आली होती आणि या शिल्पांच्या निर्मितीमध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.

सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या विशेष मोहिमेदरम्यान, कोळसा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी सुमारे 1344 मेट्रिक टन भंगाराची विल्हेवाट या आधीच लावली आहे; त्यातून 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. एसईसईएलचे मुख्यालय आणि त्याच्या सर्व कार्यक्षेत्रांमधील विविध ठिकाणे स्वच्छ आणि सुशोभित केली जात आहेत. याशिवाय कंपनीने CPGRAMS द्वारे (01.10.2022 - 30.09.2023)या  कालावधीत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा(1.10.2021 - 30.09.2022) या कालावधीतील 23 दिवसांपासून ते सरासरी 08 दिवसांपर्यंत निकालात काढत लक्षणीय घट देखील दर्शविली आहे.

दुसऱ्या विशेष स्वच्छता मोहीमेमध्येदेखील SECL ही सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कोळसा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक होती. कंपनीने एकूण 13 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या 45 जागांची साफसफाई केली होती आणि 1250 मेट्रिक टन पेक्षा जास्त भंगाराची विल्हेवाट लावली आणि सुमारे  5.97 कोटी रुपये महसूल मिळविला होता. दुसऱ्या मोहिमेदरम्यान देखील एसईसीएलद्वारे साफ केलेले क्षेत्र आणि भंगाराची विल्हेवाट लावलेले क्षेत्र कोल इंडियाच्या सर्व उपकंपन्यांमध्ये सर्वाधिक होते.

 

  N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1966598) Visitor Counter : 109