संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाने केले शिक्षण शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
09 OCT 2023 9:58AM by PIB Mumbai
भारतीय नौदलाने 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत शिक्षण शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वार्षिक उद्बोधन कार्यक्रम 2023 चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भारतीय नौदल अकादमीचे प्राचार्य रियर एडमिरल राजवीर सिंग, कमोडोर जी रामबाबू, कमोडोर (नौदल शिक्षण) आणि भारतीय नौदलाच्या शिक्षण शाखेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विद्या शाखेतील नवीन धोरणे आणि उपक्रमांविषयी तसेच समकालीन मुद्द्यांवर विचारमंथन करणे तसेच कार्यक्षमतेत वृद्धी करून समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणे आणि भारतीय नौदलाच्या विकासप्रक्रियेत हातभार लावणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उच्च शिक्षणासह एकूणच शिक्षण क्षेत्रातील अलीकडच्या घडामोडींवर व्याख्यान देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (NIEPA) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांमधील वक्त्यांना आमंत्रित केले होते. याशिवाय या क्षेत्राशी निगडित सेवा, इतर शैक्षणिक संस्था आणि नौदलाच्या मुख्यालयातील इतर संचालकांनी देखील संबंधित आणि समकालीन मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. नौदलातील कर्मचाऱ्यांसाठी नौदल शिक्षण संचालनालयाने नुकतेच सुरु केलेले नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि शिक्षण, प्रशिक्षण आणि त्यांच्या हितासंबंधीचे उपक्रम याविषयी कार्मिक आणि नियंत्रक कार्मिक सेवा प्रमुख, व्हाईस एडमिरल के स्वामीनाथन, यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात उपस्थितांना माहिती दिली. भारतीय नौदलाला अधिकाधिक सक्षम करण्याच्या अनुषंगाने शिक्षण शाखा तयार करावी आणि आपल्या प्रभावी नेतृत्वाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ निरंतर देत राहावा असे आवाहन त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना केले.
***
Jaydevi PS/Bhakti/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965845)
Visitor Counter : 123