संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

92 वाव्या भारतीय हवाई दल दिनानिमित्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी हवाई दल योद्धे, ज्येष्ठ सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 08 OCT 2023 10:22AM by PIB Mumbai

आज 92 वा भारतीय हवाई दल दिन आहे. या निमित्तची फ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस)जनरल  अनिल चौहान यांनी हवाई दलातील सर्व योद्धे, ज्येष्ठ, सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा ऐतिहासिक दिन, भारतीय हवाई दलाच्या जवळपास 100 वर्षांच्या कालखंडातील देशाप्रतीची अतुलनीय सेवा आणि समर्पण यांचे स्मरण करण्याचा, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज जेव्हा आपण हवाई दल दिन साजरा करतो आहोत, त्याच वेळी, आपण देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांनाही श्रद्धांजली वाहतो आहोत, त्यांचे धैर्य, शौर्य आणि समर्पण कायमच भारतातल्या सर्व पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

देशाने लढलेल्या प्रत्येक युद्धात, भारतीय हवाई दलाने अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. शत्रूच्या आगळिकीला प्रत्युत्तर देणारे आक्रमक हवाई हल्ले करणे, युद्धग्रस्त भूमीतून, परदेशस्थ भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणणे आणि सीमेलिकडे जाऊनही कोणत्याही संकटात मानवी सहाय्य आणि आपत्तीच्या काळात मदत करण्यात हवाई दलाने महत्वाचे कार्य केले आहे.  तसेच भारताच्या मित्र राष्ट्रांसोबत होणाऱ्या संयुक्त युद्ध सरावात भारतीय हवाई दलाने, नियमित आणि यशस्वी सहभाग नोंदवला आहे. जागतिक हवाई दलांसोबत अत्यंत उत्तम सहकार्य करण्याचा प्रत्यय भारताने नेहमीच दिला असून आपल्या शेजारी देशात किंवा त्या पलीकडे देखील, प्रभावीपणे कारवाई करण्याची आपली क्षमता हवाई दलाने सिद्ध केली आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाअंतर्गत, भारतीय हवाई दलाने स्वदेशी संरक्षण उत्पादनांच्या माध्यमातून आपला क्षमता विकास करण्यास प्रोत्साहन दिले आहे. भविष्यातील युद्धसज्जतेसाठी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, अवकाश आणि सायबर क्षमता वाढवणे अशा प्रयत्नातून हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निर्णय साधने आणि प्रणाल्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे जसे की, स्वॉर्म अनमानेड युद्ध प्रणाली ही भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या मेहर बाबा ड्रोन स्पर्धेद्वारेच या दलाला मिळाली आहे.

एकविसाव्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यास भारतीय हवाई दल सज्ज असून त्यासाठी, आधुनिककरण, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य घेण्यास भारत वचनबद्ध आहे. आपल्या 92 वा व्या हवाई दल दिनी, आपण सर्वांनी एकत्रित येऊन, भारतीय हवाई दलाचा सन्मान करूया. आपले आकाश आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या उंचीवर झेप घेणाऱ्या हवाई दलातील सर्वांप्रति   आपली कृतज्ञता व्यक्त करूया. देशाची ताकद आणि संकल्प यांचे प्रतीक म्हणून हे पुढेही कायम राहणार आहे. भारतीय हवाई दलाने भविष्यातही नवनवे सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवत राहावे, असे त्यांनी सांगितले. 

***

MI/Radhika/CY 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    


(Release ID: 1965714) Visitor Counter : 113