वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग मंत्रालयाने साजरा केला ‘जागतिक कापूस दिवस’ 2023
Posted On:
07 OCT 2023 6:45PM by PIB Mumbai
वस्त्रोद्योग मंत्रालयाने जागतिक कापूस दिन 2023 साजरा करण्यासाठी "धोरण, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान अद्ययावतीकरणद्वारे भारतीय कापसाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवणे" या संकल्पनेवर केंद्रित परिषदेचे आयोजन केले. हा कार्यक्रम भारतीय कापूस महामंडळ आणि GIZ चा युरोपिअन संघ -संसाधन कार्यक्षमता उपक्रमच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
जागतिक कापूस दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत, फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन अशा संपूर्ण कापूस मूल्य साखळीमधील सर्वोत्तम पद्धती आणि शाश्वत शेती पद्धती अधोरेखित करण्यात आल्या. विचारमंथन सत्रांमध्ये "कापूस मूल्य साखळीमध्ये शाश्वतता आणि चक्रीयतेला चालना देणे " आणि "गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कापूस मोहीम " यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर ऊहापोह झाला.
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी कापसाची गुणवत्ता, विविधता, मूळ आणि इतर प्रमुख मापदंडांची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय कापूस महामंडळाने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून "बेल आयडेंटिफिकेशन अँड ट्रेसेबिलिटी सिस्टम" (BITS) प्रणालीचे उदघाटन केले. प्रत्येक कापसाच्या गाठीवर आता एक क्यूआर कोड आहे ज्याद्वारे टाइमस्टँपसह त्याचा मूळ स्त्रोत, प्रक्रिया करणारा कारखाना, साठवणूक तपशील आणि संबंधित कापसाच्या गुणवत्तेच्या माहितीचा सहजपणे मागोवा घेता येतो.
त्याचबरोबर, वस्त्रोद्योग मंत्रालयाने मागोवा घेता येईल असा उच्च प्रमाणित दर्जाचा 'कस्तुरी कापूस कार्यक्रम' सुरु आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने भारतीय कापूस महामंडळ, सीएआय आणि सीआयटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 2 ते 5 डिसेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या 81 व्या पूर्ण बैठकीसाठी कार्यक्रम माहितीपत्रकाचे अनावरण केले. या कार्यक्रमाची संकल्पना "कापूस मूल्य साखळी : जागतिक प्राधान्यक्रमासाठी स्थानिक नवोन्मेष " अशी आहे, ज्यामध्ये 27 हून अधिक देशांमधील 400 हून अधिक प्रतिनिधी आणि निरीक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965601)
Visitor Counter : 139