विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भविष्यातील स्टार्ट अप प्रकल्प आणि नवीन तंत्रज्ञानसंबंधित उपक्रमांसाठी उद्योग हे प्रमुख संसाधन पुरवठादार बनण्याची अपेक्षा - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 05 OCT 2023 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

भविष्यातील स्टार्ट अप प्रकल्प आणि नवीन तंत्रज्ञानसंबंधित उपक्रमांसाठी उद्योग हे प्रमुख संसाधन पुरवठादार बनण्याची अपेक्षा आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

अगदी सुरुवातीपासूनच सर्वांनी समान हितधारक बनण्याची गरज आहे आणि यासाठी  उद्योगांनी देखील प्रत्येक गोष्टीसाठी  सरकारकडे बघण्याच्या  मानसिकतेत बदल केला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

ते आज नवी दिल्ली येथे असोचॅमने आयोजित केलेल्या तिसऱ्या इंडिया क्वांटम टेक्नॉलॉजी कॉन्क्लेव 2023 या कार्यक्रमात बोलत होते. उदयोन्मुख क्वांटम तंत्रज्ञानासह संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात देश मोठे टप्पे सर करत असताना आपले स्थान सर्वांच्या बरोबरीने राखण्यासाठी सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यात समानतापूर्ण संबंध प्रस्थापित करणे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक दृष्टीकोन, जागतिक धोरणे आणि जागतिक निकष आवश्यक आहेत, असे ते म्हणाले. जोखीम व्यवस्थापनासाठी उद्योगांना पुढाकार घ्यावाच लागेल, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF) मध्ये मोठ्या प्रमाणावर बिगर सरकारी संसाधने असतील, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. अगदी सुरुवातीपासूनच उद्योगांचा सहभाग असेल ज्यामुळे नवोन्मेषासाठी अगदी योग्य प्रकारची परिसंस्था निर्माण होईल. उद्योगांचा सक्रीय सहभाग आणि क्वांटम स्टार्टअप परिसंस्थेला रेटा देण्यासाठी भांडवल यांची या उद्योगाला चालना देण्यासाठी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वीच्या काळातल्या धोरण दुर्बलतेच्या तुलनेत मोदी सरकारने अतिशय सुस्पष्ट धोरणांचे नियोजन केले आहे, ज्यामध्ये डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाने एका भक्कम स्वदेशी बनावटीच्या उत्पादनाच्या वातावरणासाठी आवश्यक असलेल्या चौकटीसाठी मार्ग खुला केला आहे. परिणामी क्वांटम तंत्रज्ञान आपल्याकडे येण्यापूर्वीच आपण खूप मोठी मजल मारली.

क्वांटम तंत्रज्ञान असलेले आपण सातवे राष्ट्र आहोत. मात्र, आज आपण विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने वाटचाल करत आहोत आणि आघाडी देखील घेतली आहे. संपूर्ण जग आज आपल्याकडे पाहात आहे आणि त्यामुळे आपल्या जबाबदारीत वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मंजुरी दिलेले नॅशनल क्वांटम मिशन(एनक्यूएम) भारताला क्वांटम कंप्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सेन्सिंग, क्वांटम मटेरियल्स, मेट्रोल़ॉजी आणि डिव्हायसेस यांसारख्या क्षेत्रांमध्ये आघाडीच्या जागतिक नेतृत्वापैकी एक बनवणार आहे.

क्वांटम संशोधन आणि विकास, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सुटे भाग आणि उपकरणांचे उत्पादन यांसाठी एक आकर्षक केंद्र बनण्याची आणि त्यामुळे खूप मोठ्या संख्येने रोजगार संधी निर्माण करण्याची भारतामध्ये क्षमता आहे, असा विश्वास डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

भारताकडे सध्या जवळपास शंभर क्वांटम प्रकल्प आहेत ज्यापैकी 92 टक्के केंद्रांने पुरस्कृत केले आहेत. सुपरकंडक्टिंग आणि फोटॉनिक तंत्रज्ञान यांसारख्या विविध मंचांवर 8 वर्षात 50-1000 फिजिकल क्युबिट्स सह इंटरमिजिएट-स्केल क्वांटम कंप्युटर्स विकसित करण्याचे एनक्यूएमचे उद्दिष्ट आहे.

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964813) Visitor Counter : 98


Read this release in: English , Urdu , Hindi