पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 1ऑक्टोबर रोजी तेलंगणाला भेट देणार


पंतप्रधानांच्या हस्ते तेलंगणामधील 13,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर-विजयवाडा आर्थिक मार्गिकेशी संबंधित महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा कोनशीला समारंभ

भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित हैदराबाद-विशाखापट्टणम् मार्गिकेशी संबंधित रस्ते प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधान यावेळी महत्त्वाच्या तेल आणि वायू पाईपलाईन प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण करणार

हैदराबाद (काचीगुडा)–रायचूर रेल्वेसेवेला पंतप्रधानांच्या हस्ते झेंडा दाखवून होणार प्रारंभ

Posted On: 29 SEP 2023 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑक्टोबर 2023 रोजी तेलंगणा राज्याला भेट देणार आहेत.दुपारी सव्वादोनच्या सुमारास, ते महबूबनगर जिल्ह्यात पोहोचतील. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते, रेल्वे, रस्ते, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच उच्च शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी  तसेच लोकार्पण देखील होईल. याच कार्यक्रमादरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या हस्ते झेंडा दाखवून एका रेल्वे सेवेला देखील प्रारंभ करण्यात येईल.

देशभरामध्ये रस्तेविषयक आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले प्रोत्साहनात्मक पाऊल म्हणून या कार्यक्रमादरम्यान विविध रस्ते प्रकल्पांचा कोनशीला समारंभ तसेच लोकार्पण देखील करण्यात येणार आहे. नागपूर-विजयवाडा आर्थिक मार्गिकेचा भाग असलेल्या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची  कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते बसवली जाईल. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.163 जी चा भाग असलेला  वारंगल ते खम्मम हा 108 किलोमीटर लांबीचा चारपदरी, प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.163 जी चा भाग असलेला खम्मम ते विजयवाडा या टप्प्यातील 90 किलोमीटर लांबीचा  चारपदरी, प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्ग यांच्या उभारणीचा समावेश आहे. या रस्ते प्रकल्पांच्या कामाला सुमारे 6400 कोटी रुपयांचा एकूण खर्च येणार आहे. हा  प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वारंगल ते खम्मम या प्रवासाचे अंतर 14 किलोमीटरने आणि खम्मम  ते विजयवाडा या प्रवासाचे अंतर सुमारे 27 किलोमीटरने कमी होणार आहे.

या तेलंगणा भेटीदरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग क्र.365बीबी वरील सूर्यपेठ ते खम्मम या 59 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे झालेले चौपदरीकरण राष्ट्राला अर्पण करतील.अंदाजे 2,460 कोटी रुपये खर्चून पूर्ण होणारा हा  प्रकल्प हैदराबाद-विशाखापट्टणम मार्गिकेचा भाग असून तो भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खम्मम  जिल्हा तसेच आंध्रप्रदेशातील किनारपट्टीभागातील दळणवळण सेवा सुधारेल.

या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 37 किलोमीटर लांबीच्या जकलैर -कृष्णा या नव्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण होणार आहे.सुमारे 500 कोटी रुपयांच्या खर्चासह उभारलेल्या या नव्या रेल्वे मार्गामुळे, नारायणपेठ हा मागास जिल्हा प्रथमच रेल्वेने जोडला जाईल. पंतप्रधानांच्या हस्ते कुष्णा रेल्वे स्थानकावरुन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, झेंडा दाखवून हैदराबाद (काचीगुडा) -रायचूर- हैदराबाद (काचीगुडा) या रेल्वेसेवेची सुरुवात करण्यात येईल. या नवीन रेल्वे सेवेमुळे तेलंगणामधील हैदराबाद, रंगरेड्डी, महबूबनगर,नारायणपेट,हे जिल्हे कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्याला जोडले जाणार आहेत. 

ही सेवा महबूबनगर आणि नारायणपेट या मागास जिल्ह्यांतील अनेक नवीन भागांना प्रथमच रेल्वे संपर्क व्यवस्था प्रदान करेल. विद्यार्थी, दररोज प्रवास करणारे, मजूर आणि या भागातील स्थानिक हातमाग उद्योगांना याचा फायदा होईल.

देशातील दळणवळण कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, या कार्यक्रमादरम्यान महत्त्वपूर्ण अशा तेल आणि वायू वाहिनी प्रकल्पांची पायाभरणी तसेच  राष्ट्रार्पण केले जाईल. ‘हसन-चेर्लापल्ली एलपीजी वाहिनी प्रकल्प’ पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील.  सुमारे 2170 कोटी रुपये खर्चून बांधलेली, कर्नाटकातील हसन ते चेर्लापल्ली (हैदराबादमधील उपनगर) पर्यंतची एलपीजी वाहिनी, या प्रदेशात एलपीजी वाहतूक आणि वितरणासाठी सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल सेवा प्रदान करते. कृष्णपट्टणम ते हैदराबाद (मलकापूर) येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) बहु-उत्पादन पेट्रोलियम वाहिनीची पायाभरणीही ते करणार आहेत.  1940 कोटी रुपये खर्चून 425 किलोमीटरची वाहिनी बांधली जाणार आहे.  ही वहिनी, या प्रदेशात सुरक्षित, जलद, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक पेट्रोलियम उत्पादने उपलब्ध करेल.

‘हैदराबाद विद्यापीठाच्या पाच नवीन इमारतींचे’ उद्घाटनही पंतप्रधान करतील.स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स;स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स;स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज; लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स – III; आणि सरोजिनी नायडू स्कूल ऑफ आर्ट्स अँड कम्युनिकेशन यांचा यात समावेश आहे.हैदराबाद विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करणे हे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उत्तम सुविधा देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

 

N.Chitale/Sanjana/Vinayak/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962033) Visitor Counter : 193