वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पीएम गतिशक्ती अंतर्गत 56 व्या नेटवर्क नियोजन गटाच्या बैठकीत सहा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन

Posted On: 28 SEP 2023 10:37AM by PIB Mumbai

पीएम  गतिशक्ती अंतर्गत 56 व्या नेटवर्क नियोजन  गटाच्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे  चार प्रकल्प आणि रेल्वे मंत्रालयाच्या  दोन प्रकल्पांसह एकूण सुमारे 52,000 कोटी रुपये   प्रकल्प खर्चाच्या सहा प्रकल्प प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यात आले.   नवी दिल्लीतील यशोभूमी परिषद केंद्रामध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातील (डीपीआयआयटी ) लॉजिस्टिक्स विभागाच्या विशेष सचिव  सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली 56 व्या नेटवर्क नियोजन  गटाची बैठक काल झाली. यामुळे पीएम  गतिशक्ती योजना सुरु  झाल्यापासून नेटवर्क नियोजन  गटाने  मूल्यांकन केलेल्या एकूण प्रकल्पांची संख्या सुमारे 11.53 लाख कोटी रुपये खर्चाच्या  एकूण 112 प्रकलपांवर पोहोचली आहे.

गतिशक्ती तत्त्वांचे पालन करत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने नेटवर्क नियोजन गटाला  सुमारे 45,000 कोटी रुपये  खर्चाचे  चार रस्ते प्रकल्पाचे प्रस्ताव सादर केले . यातील पहिला प्रकल्प प्रस्ताव गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील ग्रीनफिल्ड मार्गाचा असून याचा फायदा नवसारी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतील औद्योगिक पट्ट्यालाच नाही तर त्या भागातील कृषी क्षेत्रालाही होईल. याशिवाय, या प्रकल्पाच्या माध्यमातून  नवसारी, वलसाड आणि नाशिक या आदिवासी जिल्ह्यांच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासाला सुलभ आणि सोयीची कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्याचा या भागातील पर्यटन क्षेत्रालाही फायदा होईल आणि उस्मानाबाद सारख्या आकांक्षी जिल्ह्यांनाही जोडले जाईल.
 
दुसरा ग्रीनफील्ड रस्ता  प्रकल्प गुजरात राज्यातच  बनासकांठा, पाटण, महेसाणा, गांधीनगर आणि अहमदाबाद जिल्ह्यांमधून जाणारा आहे.

प्रस्तावित तिसरा रस्ता प्रकल्प बिहार राज्यातील  आहे आणि त्यात भारतमाला परियोजना  अंतर्गत पटना-अर्रा-सासाराम मार्गिकेच्या चौपदरीकरणाच्या बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे आदिवासी भागांसह  नक्षलवाद प्रभावित जिल्ह्यांमध्ये सामाजिक-आर्थिक विकास अपेक्षित आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील आंतरराज्यीय कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या उद्देशाने या बैठकीत चर्चा करण्यात आलेला चौथा रस्ते प्रकल्प उत्तर प्रदेशमधील  आहे.

या बैठकीदरम्यान, सुमारे रु. 6700 कोटींच्या एकूण प्रकल्प खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्प प्रस्तावांचे मूल्यांकन  करण्यात आले.एक  ग्रीनफील्ड रेल्वे मार्गिका प्रकल्प ओदीशामधील आहे आणि गंजम, नयागड, खंडमाल, बौध, संबलपूर आणि अंगुल जिल्ह्यांमधून जातो.

दुसरा रेल्वे प्रकल्प प्रस्ताव केरळ राज्यातीळ  आहे आणि त्यात रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा समावेश आहे

या प्रकल्पांमुळे अनेक आकांक्षी  जिल्हे आणि आदिवासी जिल्ह्यांसाठी  औद्योगिक विकासाची दारे खुली होतील आणि याचा  फायदा होईल, असे या  बैठकीदरम्यान नेटवर्क नियोजन गटाने अधोरेखित केले.

या बैठकीत रस्ते  वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, दूरसंचार विभाग आणि नीती  आयोग या सदस्य विभाग आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला.

प्रकल्प नियोजनात पीएम  गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजना (एनएमपी ) पोर्टल वापरण्याचे फायदे आणि एनएमपी पोर्टल हे खर्चात तसेच प्रकल्प नियोजनात वेळेची बचत करताना कशाप्रकारे परिणामकारक आहे यांच्या  अनुभवासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

***

JPS/SBC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1961642) Visitor Counter : 120


Read this release in: English , Odia , Urdu , Hindi , Kannada