संरक्षण मंत्रालय

वायुदलाच्या हिंडन तळावर संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते 'भारत ड्रोन शक्ती 2023' या पहिल्यावहिल्या ड्रोन प्रदर्शनाचे उद्घाटन


सी-295 या पहिल्या वाहतूक विमानाचा भारतीय वायुदलात समावेश

सी-295 मुळे भारतीय वायुदलाच्या मध्यम वजन उचलू शकणाऱ्या विमानांच्या रणनैतिक क्षमतेत वाढ होईल- राजनाथ सिंह

Posted On: 25 SEP 2023 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2023

 

उत्तरप्रदेशात गाझियाबादमध्ये वायुदलाच्या हिंडन तळावर 25 सप्टेंबर 2023 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  यांच्या हस्ते 'भारत ड्रोन शक्ती 2023' या पहिल्यावहिल्या ड्रोन प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. भारतीय वायुदल (आयएएफ) आणि भारतीय ड्रोन महासंघ (डीएफआय) यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दि. 25 व 26 सप्टेंबर 2023 असे दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात, ड्रोनच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, देशातील 75 पेक्षा अधिक स्टार्टअप उद्योगांचा सहभाग आहे.

या प्रदर्शनात मांडलेले ड्रोन्स विविध लष्करी आणि मुलकी कामांसाठी वापरले जाऊ शकतात. त्यांच्या क्षमता सिद्ध करण्याच्या उद्देशाने अनेक हवाई तसेच स्थिर प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली आहेत. भारताला 2030 पर्यंत जगातील एक महत्त्वपूर्ण ड्रोन केंद्र म्हणून नावारूपाला आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून चालना देण्याचा आयएएफ आणि डीएफआय यांचा प्रयत्न आहे.

'भारत ड्रोन शक्ती 2023' या प्रदर्शनाच्या उद्घाटनापाठोपाठ सी-295 या पहिल्या वाहतूक विमानाचा भारतीय वायुदलात समावेश करून घेण्यात आला. या सोहळ्यात सर्वधर्मपूजा करण्यात आली. तसेच या विमानाच्या क्षमतांबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली. मध्यम वजन उचलू शकणारे हे विमान, उतरण्यासाठी तयार न केलेल्या भूभागांवरून उड्डाणही करू शकते व तेथे उतरूही शकते. ते आता HS-748 अवरो या विमानाऐवजी कार्यान्वित करण्यात येईल.

एक्स या समाजमाध्यमवरील (पूर्वीचे ट्विटर) एका संदेशाद्वारे संरक्षणमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की- सी-295 च्या समावेशामुळे भारतीय वायुदलाच्या मध्यम वजन उचलू शकणाऱ्या विमानांच्या रणनैतिक क्षमतेत वाढ होईल. आगामी काळात भारताला स्वयंसिद्ध करण्यासाठी संरक्षण आणि अंतराळ ही दोन क्षेत्रे म्हणजे बहुमोल आधारस्तंभ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

56 पैकी पहिली 16 विमाने उड्डाणासाठी सज्ज स्थितीत भारतीय वायुदलाला देण्यात येणार आहेत तर, उर्वरित 40 विमानांचे उत्पादन भारतात टाटा ऍडवान्सड सिस्टिम्स लिमिटेड मार्फत वडोदरा येथील कार्यशाळेत होणार आहे. या विमानाचा समावेश करून घेणारी पहिली तुकडी-  11 स्क्वाड्रन (द ऱ्हिनोज) हीदेखील वडोदरा येथेच स्थित आहे.

उद्घाटन कार्यक्रमात संरक्षणमंत्र्यांसह इतर मान्यवरांना भारतीय वायुदलाच्या काही अंतर्गत नवोन्मेषी उपक्रमांची एका प्रदर्शनाद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये संकरित ड्रोन तपास यंत्रणा, दोषनिदान करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित इंजिन, फ्लाय-बाय -वायर टेस्टर, स्थिर विद्युतपुरवठा या तत्त्वावर काम करणाऱ्या ट्रॉली, क्यूआर संकेतावर आधारित टूल क्रिब व्यवस्थापन प्रणाली आणि आधुनिक अध्यापन तंत्रांचा यामध्ये समावेश होता.

या कार्यक्रमासाठी नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही.के.सिंग (सेवानिवृत्त), वायुदल सेनाप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी, तिन्ही सैन्यांचे वरिष्ठ अधिकारी दूतावासाशी संबंधित संरक्षणतज्ज्ञ आणि मित्रराष्ट्रांचे अधिकारी, त्याचप्रमाणे भारतीय उद्योगक्षेत्राच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. 

 

* * *

S.Kane/J.Waishampayan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1960577) Visitor Counter : 126


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu