विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमधील एकात्मिक दृष्टीकोनामुळे भारत जगासाठी एक आदर्श बनला आहे, सर्व प्रथम कोविड प्रतिबंधक डीएनए लस बनवून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमध्ये भारताला जागतिक स्तरावर अग्रेसर बनवण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच : डॉ जितेंद्र सिंह
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                23 SEP 2023 8:31PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमधील एकात्मिक दृष्टीकोनामुळे भारत जगासाठी एक आदर्श बनला आहे आणि भारतीय शास्त्रज्ञांना कोविडच्या प्रतिबंधासाठीची पहिली डीएनए लस विकसित करण्यासाठी आणि ती इतर देशांना प्रदान करण्यास सक्षम करून भारताला प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर बनवण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. 
डॉ. जितेंद्र सिंग काश्मीर विद्यापीठात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - भारत मधुमेह आणि संयुक्त मधुमेह कार्यक्रम आणि ‘जेनोमिक्स टूवर्डस् बेटर हेल्थ’ कार्यक्रमाच्या समापन समारंभात आज बोलत होते.
जैवतंत्रज्ञान स्टार्ट-अप्स भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहेत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागृत केलेल्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे नेतृत्व करण्याची स्वतःची योग्यता आणि क्षमता आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह आपल्या भाषणादरम्यान म्हणाले. "भारताची जैव-अर्थव्यवस्था 2014 मध्ये फक्त 8 अब्ज डॉलर इतकी होती आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण जैवतंत्रज्ञान आणि जैव अर्थव्यवस्थेच्या गुणवत्तेबद्दल जागृत झालो आहोत आणि या क्षेत्राची अर्थव्यवस्था आता 

सुमारे 100 अब्ज डॉलर पर्यंत वाढली आहे. आपण ती 2025 पर्यंत 150 अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवत आहोत" असे डॉ. जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
संपूर्ण देश चांद्रयानच्या यशाने न्हाऊन निघत असताना हा कार्यक्रम होत असल्याचे डॉ. सिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विज्ञान आणि शास्त्रज्ञांना भारतात प्रचंड आदर आणि मान्यता मिळाली आहे. ही बाब देशातील सकारात्मक घडामोडी आणि प्रगती अधोरेखित करते, असेही ते म्हणाले.
स्टार्टअप धोरणाच्या यशाबद्दल बोलताना डॉ सिंह म्हणाले की, नवीन अनुकूल स्टार्टअप धोरणामुळे 8 ते 9 वर्षांत एकूण स्टार्टअपची संख्या 35400 वरून 125000 वर पोहोचली आहे. केवळ अंतराळ क्षेत्रात, 4 वर्षांच्या कालावधीत आपण 4 स्टार्ट अप्सवरून 150 स्टार्टअप्सपर्यंत पोहोचलो आहोत. यातून नवीन स्टार्टअप धोरणाने अधिकाधिक स्टार्टअप्सना पुढे येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भरपूर संधी दिल्या असल्याचे दिसून येते, असेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

 
आता जग एकात्मिक दृष्टिकोनासाठी तयार असल्याचे डॉ. सिंह यांनी अधोरेखित केले. भारताने जगाला पहिली डीएनए कोविड प्रतिबंधक लस दिली पण रोमांचक आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर फारसा विश्वास नसलेला हा देश आहे. हे जाणून घेणे आश्चर्यकारक आहे की, ज्या राष्ट्राकडे उपचारात्मक आरोग्यसेवेसाठीची योग्यता नव्हती तेच राष्ट्र प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेमध्ये अग्रेसर आणि संशोधनाच्या बाबतीत आघाडीवर असलेले राष्ट्र बनले आहे आणि जग आपल्याला सन्मान देत आहे, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.
सरकारने अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनची निर्मिती केली आहे, ज्याचा काश्मीर विद्यापीठ आणि इतर संस्था सर्वोत्तम वापर करू शकतात, यांचा उल्लेख त्यांनी केला.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी असंसर्गजन्य आजार, विशेषतः मधुमेहासाठी अशा प्रकारच्या आणखी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची आणि संस्थांची गरज अधोरेखित करून आपल्या भाषणाचा समारोप केला. सर्वांसाठी उत्तम आरोग्यसेवा आणि सर्वांच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या मधुमेहासंबंधी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी समर्पित संस्थांच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
****
Shilpa P/S. Mukhedkar/CYadav 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1960090)
                Visitor Counter : 145