संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्कर आणि युनायटेड स्टेट्स आर्मी संयुक्तपणे आयोजित करणार हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील 35 देशांचे लष्करप्रमुख आणि प्रतिनिधींची तीन दिवसीय परिषद

Posted On: 20 SEP 2023 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2023

 

नवी दिल्ली येथे 25 ते 27 सप्टेंबर 2023 या कालावधीत भारतीय लष्कर आणि युनायटेड स्टेट्स आर्मी संयुक्तपणे, 35 देशांचे लष्करप्रमुख आणि प्रतिनिधींची तीन दिवसीय परिषद आयोजित करण्‍यात येणार आहे. यामध्ये 13 व्या आयपीएसीसी, 47 व्‍या आयपीएएमएस आणि 9 व्या एसईएलएफ यांचाही समावेश असणार आहे.

“शांततेसाठी सहयोग: हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील शाश्वत शांतता आणि स्थैर्य”, ही या मंचाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही परिषद प्रामुख्याने हिंद प्रशांत महासागर प्रदेशातील देशांचे लष्कर प्रमुख आणि पायदळातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना, सुरक्षा आणि समकालीन मुद्द्यांवर विचार आणि दृष्टीकोन याची देवाणघेवाण करण्याची संधी देईल. तटीय भागीदारांमधील परस्पर सामंजस्य, संवाद आणि मैत्री याद्वारे हिंद प्रशांत महासागर प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे हा या मंचाचा प्रमुख प्रयत्न असेल.

या परिषदेच्या तीन टप्प्यांमध्ये पूर्ण सत्रे आणि अनौपचारिक बैठका होणार आहेत.

लष्कर प्रमुखांच्या परिषदेत प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सर्व लाभधारकांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी परस्पर हिताच्या आणि सहकार्याच्या क्षेत्रांवर चर्चा केली जाईल.

या कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत उपकरणांचे प्रदर्शनही आयोजित केले जाईल. परिषदेत सहभागी प्रतिनिधींना राजधानी दिल्ली मधील काही वारसा स्थळांना भेट देऊन भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेची झलक पाहायला मिळेल. –‘आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन’ ने राबविलेल्या विविध उपक्रमांचीही ते माहिती घेतील.

माणेकशॉ सेंटरमध्ये आज आयोजित ‘कर्टन रेझर’  कार्यक्रमादरम्यान, भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी कार्यक्रमाच्या आराखड्याबद्दल माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. ‘कर्टन रेझर’ कार्यक्रमादरम्यान, अमेरिका, फ्रान्स, जपान, मालदीव आणि सिंगापूरच्या परराष्ट्र सेवा खात्याशी संबंधित प्रतिनिधींनी गोलमेज चर्चा सत्रात भाग घेतला. "हिंद प्रशांत महासागर क्षेत्राच्या सुरक्षेपुढील अपारंपरिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सहयोगी दृष्टीकोन", हा या चर्चा सत्राचा विषय होता.

ही परिषद सहभागी देशांच्या सामायिक संकल्पाचा दाखला ठरेल, आणि फलदायी चर्चेचा मार्ग मोकळा करेल. तसेच विचारांची देवाणघेवाण आणि सर्वोत्कृष्ट पद्धतींचे आदान-प्रदान याद्वारे  सहभागी देशांमधील भागीदारी आणखी दृढ करेल.

 

* * *

S.Bedekar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959206) Visitor Counter : 145


Read this release in: English , Urdu , Hindi