सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने केले तीन सामंजस्य करार
डीडी न्यूज आणि डीडी इंटरनॅशनलवरील सुत्रसंचालक दिसणार खादीच्या पोशाखात
Posted On:
18 SEP 2023 7:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'लोकल फॉर व्होकल' आणि 'आत्मनिर्भर भारत' या मंत्राचा स्वीकार करत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC), स्वतंत्र भारताच्या अमृतकळात तीन स्वतंत्र सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आणि आज नवी दिल्ली येथे 'नव्या भारताची आधुनिक खादी' या उपक्रमाची पायाभरणी केली.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांच्या उपस्थितीत प्रसार भारती, एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्यासोबत हे सामंजस्य करार करण्यात आले. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे आधुनिकीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार तरुणांमध्ये खादीची उत्पादने लोकप्रिय करण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करणे हा या सामंजस्य करारांचा उद्देश आहे. यावेळी कुमार यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना 150 कोटी रुपयांच्या तारण अनुदानाचे वाटप केले.
प्रसार भारतीसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार, लवकरच डीडी न्यूज आणि डीडी इंटरनॅशनल वाहिनीवरील सुत्रसंचालक खादीच्या कपड्यांमध्ये दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, खादी आता आत्मनिर्भर भारताची ओळख बनली आहे, याचा पुनरुच्चार कुमार यांनी केला. अशा परिस्थितीत, प्रसार भारतीसोबतचा हा करार खादीला तरुणांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. यासोबतच एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड देशभरातील खादी आणि ग्रामोद्योग आयोगासाठी नवीन आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला अद्ययावत तंत्रज्ञानासह सुसज्ज ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनशी करार केला आहे.
या सामंजस्य करारांवर प्रसार भारतीचे उपमहासंचालक संजय प्रसाद व खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे प्रसिद्धी संचालक संजीव पोसवाल; एनबीसीसी (इंडिया)चे मुख्य महाव्यवस्थापक प्रदीप शर्मा व खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या इस्टेट आणि सेवा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन बाबू तसेच डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे मुख्य तांत्रिक अधिकारी देवव्रत नायक व खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन बाबू यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
कुमार यांनी यावेळी एका डॅशबोर्ड आणि एटीआर पोर्टलचाही प्रारंभ केला.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958628)
Visitor Counter : 152