गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज बिहार मधील अररिया येथे भारतीय भूमी बंदर प्राधिकरणच्या जोगबनी एकात्मिक तपासणी नाका परिसरात 27 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या निवासी इमारतींचे केले उद्घाटन
पूर्वीच्या सरकारांनी सीमेवरील पायाभूत सुविधांच्या विकासाचा कधीही विचार केला नाही, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्मितीचे मोठे काम झाले आहे आणि आज मोदीजींनी भारतातील शेवटच्या गावाला पहिले गाव बनवले आहे
मोदी सरकारने सीमावर्ती भागातील कनेक्टिव्हिटीच्या समस्या दूर करून कल्याणकारी योजना गावांपर्यंत पोहचवल्या आहेत.
Posted On:
16 SEP 2023 7:31PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज बिहार मधील अररिया येथे भारतीय भूमी बंदर प्राधिकरणच्या जोगबनी एकात्मिक तपासणी नाका परिसरात 27 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या निवासी इमारतींचे उद्घाटन केले.
अमित शहा यांनी बथनाहा येथे सशस्त्र सीमा दलाच्या 35 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या कार्यालयीन इमारतींचे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले.
बिहारमध्ये घुसखोरी, जमीन बळकावणे आणि अवैध व्यापार सारख्या सीमेशी संबंधित अनेक समस्या आहेत असे अमित शाह म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे आणि तुष्टीकरणाचे धोरण न अवलंबता कठोर पावले उचलून सीमावर्ती भागातील सर्व समस्या सोडवू शकतात असे गृहमंत्र्यांनी सांगितले. नजीकच्या काळात या सर्व समस्या सोडवल्या जातील असे ते म्हणाले.
शेजारी देशांबरोबर भारताची 15 हजार किलोमीटरहून अधिक लांबीची भू-सीमा आहे असे केंद्रीय गृह मंत्री म्हणाले . या भू - सीमेचा उपयोग केवळ व्यापार वाढवण्यासाठीच नाही तर शेजारी देशांशी सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी देखील होऊ शकतो. या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय भूमी बंदर प्राधिकरणाला अधिक सक्षम बनवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. असे शाह म्हणले. पुढील 5-6 वर्षात या प्राधिकरणाच्या सर्व संस्था भारताच्या शेजारी देशांच्या सीमेवर सांस्कृतिक आणि व्यावसायिक राजदूत म्हणूनही काम करतील.
आज भारतीय भूमी बंदर प्राधिकरणाने जोगबनी येथे सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी 27 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या घरांचे लोकार्पण करण्यात आल्याचे अमित शाह म्हणाले. याशिवाय एसएसबी, बथनाहा येथे 35 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या कार्यालयीन इमारतींचेही लोकार्पण करण्यात आले आहे. सशस्त्र सीमा दल नेपाळ आणि भूतान या आपल्या दोन मित्र राष्ट्रांच्या सीमेवर सुरक्षेबरोबरच सांस्कृतिक सुसंवाद वाढवण्याचे कामही करते असे शाह म्हणाले.
पूर्वी सीमाभागात कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीची चिंता केली जात नसे, असे अमित शहा म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सीमाभागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माणाचे काम करण्यात आले. आणि आज भारतातील सीमेवरील गावाला पहिले गाव बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारने संपर्क सुविधांमधील अडचणी दूर करुन कल्याणकारी योजनांना गावांपर्यंत पोहोचवले आहेत, असे ते म्हणाले. पूर्वी भू सीमेवरुन व्यापार जवळपास अशक्य होता आणि जो व्यापार व्हायचा तो मुख्यत्वे अवैध रूपाने चालत होता. मात्र, आज कायदेशीर रूपाने व्यापार वाढला आहे. यासोबतच लोकांचे लोकांबरोबरचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत, जे व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहे, असेही ते म्हणाले. आपल्या शेजारी देशांबरोबर आपला लोकां- लोकांमधील संबंध वाढणे अत्यंत गरजेचे आहे आणि या कामांमध्ये भूमी बंदर प्राधिकरण एक महत्त्वपूर्ण पर्याय आहे असे त्यांनी सांगितले. भूमी बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी या साऱ्या उद्देशांची पूर्तता होत आहे असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने आजवर 11 लँड पोर्टचा विकास केला असून इतर ठिकाणांचे काम प्रगतीपथावर आहे असे, अमित शहा यांनी सांगितले. भारत आणि नेपाळ दरम्यान 19 भू सीमा शुल्क केंद्रांची जागा निश्चित करण्यात आली असून यापैकी 10 सीमा शुल्क केंद्र बिहार सीमेवर असतील, ज्यांच्या मार्फत बिहारच्या लोकांचा व्यापार वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
***
N.Chitale/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958063)
Visitor Counter : 166