जलशक्ती मंत्रालय
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्वच्छता ही सेवा 2023 अभियानाचा संयुक्तपणे केला शुभारंभ
जलस्रोत कचरामुक्त करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे केंद्रीय मंत्री शेखावत यांचे जनतेला आवाहन
Posted On:
15 SEP 2023 7:29PM by PIB Mumbai
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राजस्थानमध्ये जयपूर येथे ,स्वच्छता पंधरवडा - स्वच्छता हीच सेवा (एसएचएस) 2023 या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ या दृष्टीकोनाला अनुसरून हे अभियान सुरु करण्यात आले असून, त्यांच्या स्वच्छतेच्या आवाहनाने संपूर्ण देशाला या उदात्त कार्यासाठी एकत्र आणले आहे. केंद्रीय पंचायती राज आणि ग्राम विकास मंत्री गिरीराज सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या सह दृकश्राव्य माध्यमातून आयोजित कार्यक्रमात हे अभियान सुरु करण्यात आले.
या अभियानात पंधरवडाभर स्वच्छतेला चालना देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले असून, यामध्ये ‘श्रमदान’द्वारे नागरिकांना प्रत्यक्ष कृतीसाठी एकत्र आणले जाईल आणि या अभियानाची संकल्पना असलेला ‘कचरामुक्त भारत’ निर्माण करण्याची वचनबद्धता दृढ केली जाईल.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या अभियाना अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या एसएचएस उपक्रमांची देखरेख आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष एसएचएस पोर्टलचा देखील शुभारंभ केला. या पोर्टलवर प्रथमच, ‘श्रमदाना’च्या प्रत्यक्ष मनुष्य तासांची गणना केली जाईल, तसेच उपक्रमांची आणि उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या नोंदवली जाईल. दुसऱ्या भारतीय स्वच्छता लीग चा देखील यावेळी शुभारंभ करण्यात आला.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपल्या भाषणात नागरिकांना कचऱ्याच्या निर्मिती स्थळी त्याचे वर्गीकरण करणे, साचलेला कचरा काढून टाकणे आणि स्वच्छतेबद्दल जागरुकता वाढवणे, यासाठी काम करण्याचे आवाहन केले. केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले की, हा पंधरवडा म्हणजे या दिशेने काम करण्याची तसेच देशाच्या विविध प्रदेशांमधील स्वच्छतेच्या पद्धती समजून घेऊन त्याचे अनुकरण करण्याची एक संधी आहे. ते पुढे म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनाची समस्या एकत्रितपणे हाताळता येईल कारण शहरांमध्ये क्षमता जास्त आहे पण जागा कमी आहे तर ग्रामीण भागात क्षमतेचा अभाव असला, तरी जागा मुबलक आहे.
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1957895)
Visitor Counter : 154