वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
अमृतकाळात अभूतपूर्व प्रमाणात विकास करण्याची भारताची आकांक्षा: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली येथे आयोजित झालेल्या जी-20 शिखर परिषदेचे महत्त्व अधोरेखित करून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील स्टार्टअप 20 संघटनेची केली प्रशंसा
Posted On:
11 SEP 2023 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2023
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सौदी अरेबियाचे गुंतवणूकविषयक मंत्री खालिद ए.अल-फलीह यांच्याशी चर्चा करताना सांगितले की वर्ष 2047 पर्यंतच्या अमृतकाळात अभूतपूर्व प्रमाणात विकास करण्याची भारताची आकांक्षा आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच आयोजित झालेल्या जी-20 शिखर परिषदेचे महत्त्व अधोरेखित करून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील स्टार्टअप 20 संघटनेची देखील प्रशंसा केली.
भारत आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश आजच्या काळात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले की व्यापार करण्यातील सुलभतेसंदर्भात जागतिक बँकेने जाहीर केलेल्या मानांकनात सौदी अरेबिया 62 व्या तर भारत 63 व्या क्रमांकावर होता. मात्र वर्ष 2020 पासून हे, मानांकन जाहीर करणे थांबले आहे.
या दोन्ही देशांदरम्यान सध्या 52 अब्ज डॉलर्सचा व्यापार होत असून तो दुपटीने कसा वाढवता येईल तसेच तो 200 अब्ज डॉलर्सपर्यंत कसा उंचावता येईल याविषयी देखील केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी चर्चा केली. यासंदर्भात, गुजरात आंतरराष्ट्रीय आर्थिक-तंत्रज्ञान सिटीला भेट देण्यासाठी आणि त्यानंतर भारतात गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी सौदीमधील गुंतवणूकदारांना आमंत्रित केले.
भारतातील नियामकीय यंत्रणा आता सुलभ करण्यात आली आहे याचे गुंतवणूकदारांना कौतुक वाटेल असे गोयल म्हणाले. तसेच सर्व नियमनांसाठी आता एकच नियामक आहे असे त्यांनी सांगितले.
दोन्ही देशांदरम्यान संतुलित व्यापार करण्यावर भर देत केंद्रीय मंत्री गोयल यांनी भारत सौदी अरेबियाला अन्न सुरक्षा पुरवू शकेल आणि उर्जा, तेल आणि खते यांचा पुरवठा भारताला होईल या दृष्टीने संधी शोधण्याबाबत देखील विचारविनिमय केला.
केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीत एनईओएम सिटी बाबत देखील चर्चा केली आणि ते म्हणाले की 0.5 ट्रिलीयन डॉलर्स खर्च करून सौदी अरेबिया सरकार हे शहर उभारत आहे. किनारपट्टीवरील प्रचंड भूभागाचा वापर करुन, संपूर्णपणे 100% स्वच्छ उर्जेवर चालणाऱ्या तसेच वापरकर्त्यांसाठी अत्यंत सोप्या सुविधा असणाऱ्या शहराची रचना करणे ही यामागील संकल्पना आहे असे त्यांनी सांगितले.
“मला वाटते, या क्षेत्रात भारत लक्षणीयरित्या योगदान देऊ शकेल,” केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले. रचना, बांधकाम, मनुष्यबळाचा पुरवठा आणि परिसरात व्यापाराची उभारणी यांसारख्या क्षेत्रात भारताची मदत होऊ शकते यावर त्यांनी भर दिला.
सौदी अरेबियाकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा वेग वाढवण्याची वेळ आली आहे असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितले.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956481)
Visitor Counter : 145