युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडास्पर्धा 2022 साठी भारतीय खेळाडूंचे पहिले पथक रवाना

Posted On: 07 SEP 2023 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 सप्‍टेंबर 2023

 

आगामी आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी काल, 6 सप्टेंबर रोजी भारतीय रोइंग पथक हांगझू साठी रवाना झाले. 

या संघामध्ये 43 सदस्य असून त्यात 20 पुरुष आणि 13 महिला खेळाडूंचा समावेश आहे. आशियाई स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारे क्रीडापटू या संघामध्ये प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले असून हे पदक विजेते माजी रोवर्स आपल्या क्रीडाप्रकारामध्ये कशा प्रकारे योगदान द्यावे याचे दर्शन घडवत आहेत. या पथकामध्ये 13 महिला रोवर्सचा समावेश असल्यामुळे आशियाई क्रीडास्पर्धेत सहभागी होणारे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे महिला रोवर्स पथक असेल. आशियाई क्रीडास्पर्धांच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी आठ विविध प्रकारच्या रोइंग स्पर्धा होणार आहेत आणि त्यात भारतीय संघ सहभागी होणार आहे ही बाब महत्त्वाची आहे.  

यावर्षीच्या स्पर्धेमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथमच सरकारी खर्चाने (1 कोटी रुपयांपर्यंत) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दिनांक16 सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या या स्पर्धांसाठी आशियाई क्रीडाग्रामात पोहोचण्याच्या आधी या सर्व खेळाडूंना हांगझू येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात एक आठवडा कालावधीचे प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून मुख्य स्पर्धेला उतरण्यापूर्वी हे खेळाडू तेथील वातावरणाशी जुळवून घेऊ शकतील.

चीनला पोहोचण्यासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रीडा पथकासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएआय) मुंबई अधिकाऱ्यांनी अत्यंत उत्साही वातावरणातील निरोपसमारंभ आयोजित केला होता. 

या आठवड्याच्या सुरुवातीला, भारतीय नौकानयनपटू तसेच मुष्टीयोद्ध्यांची पहिली तुकडी देखील विविध क्रीडाप्रकारांचा समावेश असणाऱ्या मुख्य स्पर्धेपूर्वीचे प्रशिक्षण घेण्यासाठी चीनला रवाना झाली. भारतीय मुष्टीयोद्ध्यांना वूयीशान येथे प्रशिक्षण देण्यात येत असून भारतीय नौकानयनपटू निन्गबो शियानशान नौकानयन केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत, याच केंद्रात आशियाई क्रीडास्पर्धांतील नौकानयन प्रकाराची स्पर्धा घेण्यात येणार आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1955500) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi