अंतराळ विभाग

अंतराळ संशोधन क्षेत्रातील भारताची मोठी झेप जगाने मान्य केली असून, भूतकाळाच्या बंधनातून अंतराळ संशोधन क्षेत्राला मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे या गोष्टीला मोठी चालना मिळाल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतकाळातील या क्षेत्राबाबत चुकीच्या संकल्पनांना छेद देत, अधिक निधी उपलब्ध करून दिल्यामुळे, खासगी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटले: डॉ. जितेंद्र सिंह

भारताची अंतराळ अर्थव्यवस्था 2040 पर्यंत 80 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल असा अंदाज: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 30 AUG 2023 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने घेतलेली मोठी झेप जगाने मान्य केली असून, या क्षेत्राला भूतकाळाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे या गोष्टीला मोठी चालना मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षेत्राबाबतच्या भूतकाळातील चुकीच्या संकल्पनांना छेद दिला असून, हे यापूर्वी का होऊ शकले नाही, याचे मला आश्चर्य वाटते, असे डॉ. सिंह म्हणाले. त्याच वेळी भौतिक पातळीवर या निर्णयामुळे अधिक निधी उपलब्ध झाला असून, या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्र आणि उद्योगांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अवघ्या 3-4 वर्षात आपल्याकडे 150 पेक्षा जास्त स्टार्टअप्स सुरु झाले आहेत,” असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, इस्रोने (ISRO) 380 पेक्षा जास्त परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करून 250 दशलक्ष युरो आणि 170 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

“एकंदरीत, भारताची अंतराळ अर्थव्यवस्था आज सुमारे 8 अब्ज डॉलर्स (जागतिक बाजारपेठेचा 2% वाटा) इतकी आहे, पण संपूर्ण जग त्याची वाढती गती ओळखत असल्यामुळे, जुन्या अंदाजानुसार 2040 पर्यंत ती सुमारे 40 अब्ज डॉलर्स इतकी असेल. मात्र, साधारण 2-3 दिवसांपूर्वी, जाहीर झालेल्या ADL (आर्थर डी लिटल) अहवालानुसार, 2040 पर्यंत आपली क्षमता सुमारे 100 अब्ज डॉलर्स इतकी असेल, जी एक प्रचंड मोठी झेप ठरेल. आणि जगाला आता भारताकडून हीच अपेक्षा आहे, कारण आपण खूप वेगाने पुढे जात आहोत, आपण उपग्रह प्रक्षेपणे देखील वारंवार करत आहोत.” ते म्हणाले.

इस्रोची सूर्यावरील पहिली मोहीम “आदित्य-एल1” 2 सप्टेंबर रोजी सुरू झाल्यानंतर, ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याचे गगनयान या अंतराळ अभियानाची चाचणी केली जाईल, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. त्यानंतर होणाऱ्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दुसऱ्या चाचणीत “व्योमित्र” नावाची एक महिला रोबो पहिल्या मानवी मोहिमेपूर्वी गगनयानसोबत जाईल, त्यानंतर तीन अंतराळ वीरांचा समावेश असलेले गगनयान अवकाशात जाऊ शकेल, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. 

अंतराळ संशोधनात भारताची इतर कोणत्याही राष्ट्राशी स्पर्धा नाही, असे सांगत भारताचे अंतराळ संशोधन,अणुऊर्जा कार्यक्रम निर्मिती करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या संकल्पनेनुसार होत असून पूर्णपणे विधायक कार्यासाठी आहेत,याचा डॉ जितेंद्र सिंग यांनी पुनरुच्चार केला. इस्रो (ISRO), आघाडीच्या अंतराळ संस्थांसोबत सहकार्य करत आहे तसेच खाजगी परदेशी संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे अनेक उपग्रह अंतराळ कक्षेत सोडले गेले असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

रेल्वे, महामार्ग, कृषी,जलसंवर्धन, स्मार्ट सिटीज, टेलीमेडिसिन आणि रोबोटिक सर्जरी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचे उपयोग होत असल्याचा संदर्भ देत, त्यामुळे सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर होण्यात मदत झाली असे सांगत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, की अंतराळ तंत्रज्ञानाने जणूकाही प्रत्येकाच्या  घराघराला स्पर्श केला आहे. 

 

* * *

R.Aghor/Rajshree/Sampada/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953563) Visitor Counter : 117