संरक्षण मंत्रालय

27 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर या कालावधीत युएईच्या नौदलातील एसएमई शिष्टमंडळाची भारतीय नौदलाच्या तळांना भेट

Posted On: 29 AUG 2023 12:17PM by PIB Mumbai

कर्नल डॉ.अली सैफ अली मेहराझी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) नौदलातील विषय तज्ञांचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ 27 ऑगस्टपासून भारतभेटीवर आले आहे. भारतीय नौदलाच्या (आयएन) कोची, गोवा आणि नवी दिल्ली येथील हवामान, सागरशास्त्र तसेच हवामानविषयक नमुने विषयक विशेष संस्थांना भेट देण्यासाठी हे शिष्टमंडळ देशात आले आहे. व्यावसायिक ज्ञान, पारंगतता, प्रशिक्षण यांचे आदानप्रदान आणि हवामानशास्त्र, सागरशास्त्र तसेच हवामान/सागरी नमुने या क्षेत्रांमध्ये सहयोगी संबंध स्थापन करण्याच्या उद्दिष्टासह या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान व्यावसायिक सहकार्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतीय नौदलाकडे हवामानशास्त्र तसेच सागरशास्त्र या क्षेत्रांमधील ज्ञान, तज्ञता आणि कौशल्ये यांचा मोठा साठा जमा झाला आहे. विविध समर्पित पथकांच्या माध्यमातून भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या परिसरातील अनेक देशांना या क्षेत्रातील प्रशिक्षण तसेच दैनंदिन हवामान अंदाजविषयक सेवांसह पाठबळ पुरवत आहे.

युएई नौदलाच्या शिष्टमंडळाने 28 ऑगस्टला कोचीमधील नौदल तळाला भेट देऊन तेथील नौदल परिचालन माहिती प्रोसेसिंग आणि विश्लेषण केंद्रात (एनओडीपीएसी) कार्यरत व्यावसायिक संवादासाठीच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांची भेट घेतली. हे केंद्र सागरशास्त्र, सागरी स्थितीचा अंदाज आणि सागरी मॉडेलिंग या विषयांच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे समर्पित केंद्र आहे. युएई नौदलाच्या शिष्टमंडळाने यावेळी हवामान अंदाज आणि वातावरणीय मॉडेलिंग या विषयांवर काम करणाऱ्या भारतीय नौदल हवामान विश्लेषण केंद्राला (आयएनएमएसी) देखील भेट दिली. तसेच त्यांनी, नौदल सागरशास्त्र आणि हवामान अंदाज विद्यालयाला देखील या शिष्टमंडळाने भेट दिली. ही संस्था, भारतीय नौदलाच्या हवामानविषयक, सागरशास्त्र आणि आकडेमोडीवर आधारित हवामान अंदाज (एनडब्ल्यूपी) यांच्या प्रशिक्षणाची गरज भगवते.

युएईचे शिष्टमंडळ गोवा येथील प्रमुख नौदल हवाई तळ म्हणून नावाजलेल्या आयएनएस हंसा या केंद्रातील एअर स्क्वाड्रन्स आणि हवामानविषयक कार्यालयाला भेट देणार असून त्यानंतर ते केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या नौदल आयएचक्यू येथील कोमोडोर (नौदल सागरशास्त्र आणि हवामानशास्त्र) यांची भेट घेणार आहेत.

परस्पर अध्ययन प्रक्रियेची जोपासना करणे तसेच हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र यांच्याशी संबंधित गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देण्याची सामुहिक क्षमता बळकट करणे हे या सहयोगी उपक्रमाचे उद्देश आहेत. यापुढील काळात सहकार्यात वाढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांची नौदले आपापल्या तज्ञता आणि विचार एकमेकांशी सामायिक करणार आहेत.

भारतीय तसेच युएईच्या नौदलांमधील तज्ञता, उत्साह आणि कटिबद्धता यामुळे दोन्ही नौदलांच्या परिचालनविषयक तसेच शास्त्रीय क्षमता समृध्द होतील यात शंका नाही. आणि  परस्पर स्वारस्याची पूर्तता करण्यासाठी व्यावसायिक आदानप्रदान करण्यासाठी दीर्घकाळपर्यंत हा उपक्रम उपयुक्त ठरेल.  

***

S.Thakur/S.Chitnis/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953171) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil