सांस्कृतिक मंत्रालय
भारताच्या अध्यक्षपदाखालील जी 20 सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक आज वाराणसी, उत्तर प्रदेश इथे संपन्न
Posted On:
26 AUG 2023 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2023
भारताच्या अध्यक्षपदाखाली जी 20 सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक आज वाराणसी इथे बोलावण्यात आली. सांस्कृतिक मंत्री आणि जी20 सदस्य देशांचे आणि निमंत्रित देशांचे मान्यवर यांच्यासह आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रातिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य भारत विकास मंत्री, जी किशन रेड्डी, कायदा आणि न्याय (स्वतंत्र कार्यभार), सांस्कृतिक आणि संसदीय कार्य मंत्री, अर्जुन राम मेघवाल, संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री मीनाक्षी लेखी, सचिव, सांस्कृतिक मंत्रालय गोविंद मोहन, यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलना नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मला विश्वास आहे की हे प्रयत्न लोकांमध्ये शाश्वत पद्धती आणि जीवनशैली रुजविण्यात यशस्वी होतील. आर्थिक विकास आणि वैविध्यीकरण यासाठी देशाचा वारसा ही मोलाची संपत्ती आहे. आणि हे आमच्या ‘विकासही वारसाही’ या मंत्राशी सुसंगत देखील आहे.
यानंतर केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य भारत विकास मंत्री, जी किशन रेड्डी यांचे स्वागतपर भाषण झाले. रेड्डी म्हणाले, “भारताच्या अध्यक्षतेखाली आम्ही आमच्या सामायिक दृष्टीकोन आणि विकासासाठीची कटीबद्धता ही भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सार्वजनिक धोरणांत संस्कृतीला अधिक महत्व आणि संस्कृतीकडे शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला गती देण्याचे साधन म्हणून बघितले, तर आपले एकत्रित प्रयत्न आणि जबादारीची वाटणी याच्या जोरावर आपण आपल्या समोर असलेली आव्हाने संधीत रुपांतरीत करू शकतो.”
हवामान बदल, वाढती असमानता आणि आजच्या काळातील विकासापुढची बहुआयामी आव्हाने आणि डिजिटल परिवर्तनाचा परिणाम यांचा सामना करण्यासाठी संस्कृतीच्या परिवर्तनशील शक्तीचा उपयोग करून घेण्यावर जी20 सांस्कृतिक मंत्र्यांचे एकमत झाले. वैविध्यपूर्ण संस्कृती आणि सर्व संस्कृतींना समान सन्मान देणारा अधिक समावेशक समाज निर्माण करण्याची गरज देखील या वेळी बोलून दाखवण्यात आली.
भारताच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीच्या निष्कर्ष आराखड्याला ‘काशी सांस्कृतिक मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. यात बैठकीत व्यक्त करण्यात आलेली कटीबद्धता आणि जी20 सांस्कृतिक मंत्र्यांचे, जी 20 सांस्कृतिक कार्य गटाने ठरविलेल्या प्रधाण्याक्रमांबाबत झालेले एकमत, यांचा आढावा घेण्यात आला आहे. ‘काशी सांस्कृतिक मार्ग’ हा निष्कर्ष आराखडा जी 20 सांस्कृतिक मंत्र्यांनी एकमताने स्वीकारला आहे.
जी 20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत ‘जी20 संस्कृती: सर्वसमावेशक विकासासाठी जगाची मानसिकता तयार करणे’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. यात, जागतिक संकल्पनावर आधारित वेबिनार्स, ज्यात भारताने निश्चित केलेल्या चार प्राधान्यक्रमांवर चर्चा मार्च आणि एप्रिल महिन्यांत करण्यात आली. ह्या जागतिक संकल्पनांवर आधारित वेबिनार्सचे आयोजन भारताने केले होते.
सांस्कृतिक मंत्र्यांनी आज, 26 ऑगस्ट 2023 रोजी वाराणसी इथे विशेष टपाल तिकीट जारी केले. 'कल्चर युनायटेड ऑल' या हॉलमार्क मोहिमेच्या स्मरणार्थ हे विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. भारताच्या G20 अध्यक्षांच्या अंतर्गत अंतर्गत कार्यरत सांस्कृतिक कार्यगटाचा एक उपक्रम आहे.
त्यानंतर, सांस्कृतिक कार्य मंत्री आणि उपलब्ध प्रतिनिधीनी जी-20 साठी विशेष आयोजित सांगीतिक कार्यक्रम- सूर वसुधा चा आनंद घेतला. जी-20 अध्यक्षपदाच्या अंतर्गत कार्यरत सांस्कृतिक कार्यगटाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘सूर वसुधा’ हा भारताच्या प्राचीन सूर आणि संगीत परंपरांची माहिती जी 20 मधल्या सर्व देशांना देण्याचा एक प्रयत्न होता.
‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्वावर आधारित या सांगीतिक कार्यक्रमात जी -20 च्या सदस्यांसाठी गायन आणि वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या सांगीतिक कार्यक्रमातून, भारतीय संस्कृतीतील एकत्व आणि वैविध्य या भावनांना प्रोत्साहन देणे तसेच संगीताच्या माध्यमातून विविध कल्पना तसेच आंतरराष्ट्रीय समन्वय साधण्याचा प्रयत्न होता.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
G20 Culture Ministers Meeting Outcome Document and Chairs summary
G20 Culture working group terms of reference
* * *
N.Joshi/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952929)
Visitor Counter : 164