वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जी 20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्‌घाटन सत्राला जयपूर इथे केले संबोधित


व्यापार आणि गुंतवणूक मंत्रीस्तरीय बैठक आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीतील अडथळे कमी करण्यावर लक्ष केंद्रित करेल तसेच उत्पादकता आणि उत्पादन वाढवणे आणि सर्वांच्या समृद्धीसाठी आर्थिक विकासाला देईल चालना - पीयूष गोयल

Posted On: 24 AUG 2023 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2023

जी 20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्रीस्तरीय बैठक आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीतील अडथळे कमी करण्यावर लक्ष केंद्रित करेल तसेच उत्पादकता आणि उत्पादन वाढवणे आणि सर्वांच्या समृद्धीसाठी  आर्थिक विकासाला चालना देण्यावर भर देईल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.ते आज राजस्थानमधील जयपूर शहरात आयोजित जी 20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्रीस्तरीय बैठकीच्या (टीआयएमएम) उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. यावेळी पीयूष गोयल यांनी जी 20 आणि इतर आमंत्रित देशांच्या मंत्र्यांना ठोस, निर्णायक आणि कृती-केंद्रित परिणाम साध्य करण्याच्या उद्देशाने एकत्रितपणे कार्य करण्यासाठी देखील प्रोत्साहित केले.

जी 20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्रीस्तरीय बैठक बहुपक्षीय व्यापार प्रणाली, समावेशक व्यापार तसेच व्यापार आणि व्यवसाय सुलभतेशी संबंधित मुद्द्यांवर सामायिक परिणाम साधण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली झालेल्या चार व्यापार आणि गुंतवणूक कार्यगट (TIWG) बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. या बैठकांचे उद्दिष्ट निष्पक्ष, समावेशक आणि शाश्वत व्यापार तसेच व्यापार संबंधित गुंतवणूक धोरण तयार करणे आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.

यावेळी गोयल यांनी अधोरेखित केले की, व्यापार आणि गुंतवणूक कार्यगट बैठकी दरम्यान जी 20 सदस्य/ निमंत्रित देशांमध्ये (i) विकास आणि समृद्धीसाठी व्यापार, (ii) लवचिक  व्यापार आणि जागतिक मूल्य साखळी (iii) जागतिक व्यापारात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे एकत्रीकरण, (iv) व्यापारासाठी लॉजिस्टिक आणि (v) जागतिक व्यापार संघटनेत सुधारणा - या पाच प्रमुख मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा केली गेली आहे. आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात, जागतिक मूल्य साखळीच्या संकल्पनेने राष्ट्रांच्या व्यापार आणि गुंतवणुकीत वापरल्या जाणाऱ्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे, असे गोयल यांनी नमूद केले. कोविड-19 महामारी आणि इतर संकटांमुळे जागतिक मूल्य साखळी विस्कळीत झाली आहे आणि त्यामुळेच सर्वसमावेशक तसेच शाश्वत जागतिक मूल्य साखळीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व आम्हाला जाणवले आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

जी 20 अध्यक्षतेच्या कार्यकाळात भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (MSMEs) बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका ओळखली आहे आणि त्यांना सतत पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले जात आहेत, असे मंत्र्यांनी सांगितले. वाढीचे नवीन मार्ग खुले करण्यासाठी जागतिक व्यापारात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना समान संधी आणि सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याची सामायिक वचनबद्धता आपल्या पारंपरिक प्रणालींच्या सीमांच्या पलीकडे जाणारी आहे, असे ते म्हणाले. याचा दाखला म्हणून गोयल यांनी प्रकल्पांची योजना आणि अंमलबजावणी करण्यासाठी GIS डेटाच्या स्तरांचा वापर करून पायाभूत सुविधा विकास आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेसाठी प्रधानमंत्री गतिशक्ती या उपक्रमाचे उदाहरण दिले.

जागतिक व्यापार संघटनेमध्ये सुधारणेसह  अधिक गतिमान आणि सर्वसमावेशक व्यापार वातावरण असणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. विकसित होत असलेल्या जागतिक आर्थिक परिदृश्याचे प्रतिबिंब या सुधारणांमध्ये दिसले पाहिजे, असेही ते म्हणाले. व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारत ग्लोबल साउथला नेतृत्व देऊ शकतो आणि जागतिक अर्थव्यवस्थेला अधिक समावेशक बनवू शकतो, असे ते म्हणाले. ज्या जी 20 चे निर्णय अर्थव्यवस्था, लोकांचे जीवनमान आणि जगाचे भविष्य घडवतात अशा जी 20 ला सहयोग आणि परस्पर सामंजस्याची भावना परिभाषित करते, असेही पीयूष गोयल म्हणाले.

 

 N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1951773) Visitor Counter : 79