ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
नवी दिल्ली येथे तांदळाचे पोषणमूल्य वर्धन या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
Posted On:
22 AUG 2023 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने आज नवी दिल्ली येथे तांदळाचे (धान) पोषणमूल्य वर्धन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला होता.
परिसंवादाला संबोधित करताना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा म्हणाले, “देशात आहारात तांदळाचा समावेश असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% पोषणमूल्य वर्धित तांदूळ वितरणाचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत.”
सरकारी अन्न सुरक्षा योजनां अंतर्गत, पोषणमूल्य वर्धित तांदूळ वितरणाद्वारे देशाची पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. या परिसंवादाने विविध भागधारकांना चर्चेचे व्यासपीठ उपलब्ध केले. सरकारी भागधारकांसह विविध संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांनी पुरावे, सुरक्षितता, कार्यान्वयनापुढील आव्हाने, गुणवत्तेची हमी आणि गुणवत्ता नियंत्रण यासारख्या तांदूळ पोषणमूल्य वर्धन कार्यक्रमाशी संबंधित विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण माहिती दिली. सध्याची आव्हाने आणि राज्यांच्या प्रश्नांना तज्ञांच्या गटाने संबोधित केले आणि पुढील काळासाठी कार्यक्रमाचा पथदर्शक आराखडा तयार करण्यावर यावेळी चर्चा झाली.
परिसंवादाची चार तांत्रिक सत्रांमध्ये विभागणी करण्यात आली होती, प्रत्येक सत्रामध्ये तांदूळ पोषणमूल्य वर्धनाच्या प्रमुख पैलूंवर लक्ष केंद्रित करत, कार्यगटाच्या यापूर्वी झालेल्या बैठकींमधील चर्चेवर विचार विनिमय झाला. परिसंवादादरम्यान, लाभार्थी स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागाने विकसित केलेल्या राष्ट्रीय आयईसी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, आणि तांदूळ मूल्यवर्धनाबाबत मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन झाले. ही पुस्तिका तांदूळ पोषणमूल्य वर्धनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वे, अधिसूचना आणि मागणी यासाठी रेडी रेकनर म्हणून काम करेल.
या कार्यक्रमाने तंत्रज्ञान विषयक तज्ञ, मंत्रालयांमधील प्रमुख व्यक्ती, संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना एकत्र आणले आणि अन्न सुरक्षा योजनांच्या माध्यमातून पोषणमूल्य वर्धित तांदळाच्या सार्वत्रिक पुरवठ्याबाबत समान जाणीव निर्माण करण्यासाठी फलदायी संवादाला चालना दिली.
देशातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील अन्न सचिवांसह या क्षेत्राचे तंत्रज्ञान विषयक तज्ञ आणि क्षेत्रीय विकास भागीदारांनी चर्चासत्रात भाग घेतला. देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षा परिसंस्थेमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी, आव्हाने आणि संधींचा एकत्रितपणे विचार करण्यावर त्यांनी आपले विचार मांडले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1951234)
Visitor Counter : 132