नौवहन मंत्रालय

बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील संशोधन संस्थांतर्फे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळांच्या माध्यमातून भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचे महत्व अधोरेखित

Posted On: 22 AUG 2023 8:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023

भारताचा चंद्रविषयक संशोधन कार्यक्रम ‘चांद्रयान’ हा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सुरु केलेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. चांद्रयान ही मोहीम चंद्राविषयीची अनेक गूढ उकलण्याप्रती तसेच चंद्राचे खगोलशास्त्र, वातावरण आणि चंद्रावरील स्त्रोत याविषयी जागतिक चांद्र समुदायाला असलेल्या ज्ञानात योगदान देण्याप्रती असलेल्या भारताच्या कटिबद्धतेचे प्रतिनिधित्व करते.  

भारताचे चांद्रयान यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे या  अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे भारताची चांद्रयान-3 मोहीम वाटचाल करत असताना, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या (एमओपीएसडब्ल्यू) अधिपत्याखाली आयआयटी मद्रास या संस्थेतील राष्ट्रीय बंदरे, जलमार्ग आणि किनारपट्टी तंत्रज्ञान केंद्र (एनटीसीपीडब्ल्यूसी) आणि आयआयटी खरगपूर येथील अंतर्गत आणि तटवर्ती सागरी तंत्रज्ञान केंद्र (सीआयसीएमटी)या संस्थांतर्फे राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.चांद्रयान-3 या मोहिमेविषयी जाणीव निर्माण करणे, या मोहिमेचे महत्त्व समजून घेणे आणि यातील गुंतागुंतीच्या प्रक्रियांची सखोल माहिती करून घेणे या उद्देशाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातील प्रगत शास्त्रीय ज्ञान तसेच तांत्रिक नवोन्मेष यांच्या संदर्भात भारताच्या चांद्र मोहिमेला असलेल्या सखोल महत्त्वावर प्रकाश टाकणे हे या कार्यशाळांच्या आयोजनाचे मुख्य उद्दिष्ट होते.

 डॉ.सईद मकबूल अहमद, श्री.लिओ, डॉ.मुथूकुमारन आणि डॉ. तपस कुमार नंदी यांच्यासह अनेक सुप्रसिद्ध वक्त्यांनी  या कार्यशाळांमध्ये, यापूर्वीच्या चांद्रयान मोहिमांमधून हाती आलेले ज्ञान आणि माहिती सामायिक केली. विद्यमान मोहिम तसेच प्रोपल्शन प्रणाली यांच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाबाबत या वक्त्यांनी चर्चा केली तसेच त्यांनी ग्रह विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभिनव संशोधन या संदर्भात भारताने मिळवलेले यश यावेळी अधोरेखित केले.

चांद्रयान-3 चे यशस्वी चंद्रावतरण ही घटना भारतासाठी केवळ आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नसेल तर ती घटना भविष्यातील चांद्र मोहिमांना आकार देणारे वैज्ञानिक शोध तसेच अन्वेषण यांचे नवे मार्ग देखील खुले करून देईल.

याप्रसंगी बोलताना, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, चांद्रयान मोहिमांमध्ये मिळालेली सफलता, मानवी ज्ञान आणि संशोधन यांच्या सीमा आणखी विस्तारित करण्याप्रती भारताची निष्ठा सोदाहरण सिध्द करते. नव्या शोधांचा हा प्रवास, चांद्रयान-3 च्या आगामी चंद्रावतरणासह असाच सुरु राहील आणि त्यातून विश्वाची रहस्ये उलगडत जातील. तसेच त्यातून भविष्यातील पिढ्यांसाठी ताऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला होईल.

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1951231) Visitor Counter : 134


Read this release in: English , Urdu , Hindi