वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
इंडोनेशियात सेमारंग इथे झालेल्या आसियान-भारत अर्थमंत्र्यांच्या 20 व्या बैठकीत भारत सहभागी
Posted On:
21 AUG 2023 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2023
इंडोनेशियात सेमारंग इथे 21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या झालेल्या असियान-भारत अर्थमंत्र्यांच्या 20 व्या बैठकीत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांचे अतिरिक्त सचिव, राजेश अग्रवाल सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे व्यापार मंत्री डॉ, जुल्खीफ्ली हसन यांच्यासोबत त्यांनी या बैठकीचे सहअध्यक्षपदही भूषवले. ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम अशा सर्व 10 आसियान देशांतील अर्थमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. तिमोर-लेस्टे (ईस्ट तिमोर) देशाचे प्रतिनिधी देखील सभेत निरीक्षक म्हणून सहभागी झाले.
यावेळी सर्व मंत्र्यांनी, भारत आणि असियान देशातील द्वीपक्षीय व्यापारी आणि गुंतवणूक विषयक संबंधांचा आढावा घेतला तसेच, भारत आणि आसियान देशांमधील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली. ही भागीदारी अधिक सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी व्हावी ज्यातून काही अर्थपूर्ण लाभ दोन्ही बाजूंना मिळावे, विशेषतः महामारीनंतर सर्व देशांना परस्परांची मदत मिळावी यावर या बैठकीत भर देण्यात आला.
भारत आणि आसियान यांच्यात 2022-23 मध्ये 131.5 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार झाला आहे. 2022-23 मध्ये भारताच्या एकूण जागतिक व्यापारात असियान सोबतचा व्यापार 11.3% इतका होता.
मंत्र्यांनी आसियान-भारत व्यापार परिषदे (AIBC) शी देखील संवाद साधला आणि क्वालालंपूर येथे 6 मार्च 2023 रोजी झालेल्या 5व्या असियान-इंडिया व्यापारी परिषदांसह 2023 मध्ये AIBC ने हाती घेतलेल्या उपक्रमांची नोंद घेतली.
कोविड-19 महामारीचा बहुआयामी प्रभाव, हवामान बदल, जागतिक आर्थिक बाजारपेठेतील वाढलेली अस्थिरता, महागाईचा वाढता दबाव आणि भू-राजकीय तणाव यासारख्या प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांवर यावेळी सर्व प्रतिनिधींनी विचारविनिमय केला. दोन्ही पक्षांमधील लवचिक पुरवठा साखळी, अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य यात प्राधान्याने सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले.
2009 मध्ये स्वाक्षरी झालेल्या आसियान-भारत वस्तू व्यापार कराराचा (AITIGA) वेळेवर आढावा घेणे हा या वर्षाच्या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. बैठकीतील विधायक चर्चेनंतर, सर्वमंत्र्यांनी आढावा घेण्यात आलेल्या मुद्यांशी संबंधित दस्तऐवजांना मान्यता दिली, ज्यामुळे परिभाषित पद्धतींसह वाटाघाटी औपचारिकपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. हा आढावा घ्यावा, अशी भारतीय व्यावसायिकांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. हा आढावा लवकर सुरू केल्याने मुक्त व्यापार कराराद्वारे व्यापार सुलभ आणि परस्पर फायदेशीर बनण्यास मदत होईल.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950929)
Visitor Counter : 178