पंचायती राज मंत्रालय
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते श्रीनगर येथे पंचायत स्तरावर शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2023 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2023
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते आज श्रीनगर येथे पंचायत स्तरावर शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण या विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले, यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील उपस्थित होते.
देशातील पंचायतींना आदर्श आणि तितकेच शाश्वत स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायतींच्या कार्यपद्धतीला एक नवीन दिशा दिली असून गेल्या कित्येक दशकांमध्ये हे घडले नव्हते असे सिंह यांनी आपल्या ई संदेशात सांगितले. भारताला समृद्ध करण्यासाठी पंचायतींनी नेतृत्वात आघाडी घेतली पाहिजे आणि प्रत्येक पातळीवर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांच्या योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी पारदर्शकपणे केली पाहिजे, असे ते म्हणाले.

भारताने 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे, मात्र देशाने निर्धारित केलेली ध्येयधोरणे पूर्ण करणे ही केवळ योजनकर्त्यांची जबाबदारी नाही तर 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यात जनतेने निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींची देखील एक महत्वाची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
या कार्यशाळेदरम्यान, गिरीराज सिंह यांनी पंचायत राज मंत्रालयाने विकसित केलेले ‘मेरी पंचायत मोबाइल अॅप’ आणि मेरी पंचायत मोबाइल अॅप - एन सी बी एफ ची कार्यान्वयन संबंधी मार्गदर्शक तत्त्वे, सेवा-स्तरीय बेंचमार्क, स्वयं-मूल्यांकन आणि आदर्श करार यांचे प्रकाशनही केले.

क्षमता निर्माण आणि प्रशिक्षणाच्या संदर्भात सर्वोत्तम धोरणे, दृष्टिकोन, समवर्ती क्रिया आणि नाविन्यपूर्ण मॉडेल यांचे सादरीकरण करणे, तसेच सर्वोत्कृष्ट पद्धती, ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये (जी पी डी पी ) शाश्वत विकास उद्दिष्टांची संकल्पना कशा प्रकारे रुजवली जाते त्यावर देखरेख ठेवणे , प्रोत्साहन देणे आणि ते कशाप्रकारे प्रतिबिंबित होते ते अधोरेखित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
3TSD.jpeg)
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी शाश्वत विकास उद्दिष्टांबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यावर भर दिला आणि 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्धारित केलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शासकीय विभाग आणि व्यक्तींसह सर्व संबंधितांनी पूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले. खेड्यापाड्यात प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही या पंतप्रधानांच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
अलीकडेच सुरू केलेला पंचायत विकास निर्देशांक देशभरातील पंचायतींच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामांचा आरसा म्हणून कार्य करेल, असे पाटील यांनी सांगितले.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1950926)
आगंतुक पटल : 184