अर्थ मंत्रालय
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली, गुजरातमध्ये गांधीनगर येथील गिफ्ट सीटीमध्ये गिफ्ट-आयएफएससी मधील वृद्धी आणि विकासविषयक आढावा बैठक
Posted On:
19 AUG 2023 6:41PM by PIB Mumbai
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली, आज गुजरातच्या गांधीनगर इथल्या गिफ्ट सीटी- ह्या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, गिफ्ट-आयएफएससी मधील वृद्धी आणि विकासाचा आढावा घेणारी बैठक झाली. या बैठकीला, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्रालयाचे सचिवही उपस्थित होते.
गिफ्ट सीएल यांनी, गुजरात सरकारच्या सहकार्याने आयोजित केलेल्या बैठकीत, गुजरातचे वित्त, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री कनुभाई देसाई यांच्यासह, गुजरात सरकारमधील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्याशिवाय, देशातील अर्थक्षेत्रातील सर्व नियामक संस्थांचे प्रतिनिधीही ह्या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी गिफ्ट सिटीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे (IFSCA) अध्यक्ष आणि गुजरात सरकारच्या अधिकऱ्यांनी, भारतातील ह्या पहिल्या आयएसएससी केंद्राच्या गेल्या काही वर्षातील प्रवसातील महत्वाची कामगिरी आणि मैलाचे टप्पे यांचा लेखाजोखा मांडणारे सादरीकरण केले. विशेषत: आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या स्थापनेपासून, या संस्थेला मिळालेला धोरणात्मक पाठिंबा आणि सरकारकडून वेळोवेळी मिळालेल्या सवलती यांच्याविषयी माहिती देण्यात आली.
या आढावा बैठकीत, निर्मला सीतारामन यांनी, गिफ्ट सिटी’ला देशातील प्रमुख वित्तीय केंद्र म्हणून उन्नत करण्यासाठी, सर्व भागधारकांनी आपली जबाबदारी ओळखून, निश्चित केलेल्या मार्गांसाठी पाठिंबा देण्याची गरज असल्यावर भर दिला, जेणेकरून, जागतिक स्तरावरील गिफ्ट सिटीच्या समकालीन संस्थांमधे ही संस्था सर्वोत्तम ठरू शकेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेली ही संस्था, केवळ एक चैतन्यमय आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून उदयास यायला नको, तर आज जगासमोर असलेली आर्थिक आव्हाने, विशेषतः आजच्या जागतिक विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजना करणारे नेतृत्व करणारी संस्था असावी, म्हणून प्रयत्न करण्याचे आवाहन वित्तमंत्र्यांनी केले.
आता गिफ्ट आयएफएससी संस्था, ही अत्यंत वेगाने कार्य करणारी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून ओळखली जाऊ लागली आहे, अशा वेळी अधिकाधिक व्यवसाय-व्यापार आकर्षित करण्याला आणि व्यापक गुंतवणूक आणण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
IFSCA आणि IRDAI या दोन्ही संस्थांनी विमा आणि पुनर्विम्यासाठी प्रमुख जागतिक केंद्र म्हणून गिफ्ट संस्थेची स्थापन करण्यासाठी आघाडीच्या जागतिक विमा कंपन्यांशी सक्रिय सहभाग वाढवावा, असे आवाहन सीतारामन यांनी केले.
केंद्रीय वित्तमंत्र्यांनी भारतीय इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज IFSC (IIBX) ची जास्तीत जास्त क्षमता वापरून विघटन आणि कार्यक्षम किंमत शोधण्यावर भर दिला. तसेच, संयुक्त अरब अमिरातीसोबत भारताने केलेल्या सीईपीए कराराअंतर्गत, रिझर्व बँकेने, TRQ सोन्याची आयात IIBX द्वारे प्रायोगिक तत्त्वावर करण्याचा सल्ला दिला. या प्रयोगामुळे, भारतीय बँकांसाठी IIBX प्लॅटफॉर्म वापरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असे त्या म्हणाल्या.
मौल्यवान धातू व्यवसायांना लॉजिस्टिक आधार, जागतिक विमा, विमान आणि जहाज भाड्याने देणे यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांना गिफ्ट सिटीमधून दिल्या जाणाऱ्या सेवांच्या व्याप्तीचा विस्तार केला पाहिजे, अशी सूचनाही सीतारामन यांनी केली.
2022 - 23 च्या अर्थसंकल्पातील घोषणांच्या अनुषंगाने, विशेषत: दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठांना मंजूरी देण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी तत्परतेने झालेल्या कामांचे कौतुक केले. यामुळे गिफ्ट -IFSC मध्ये अनेक जागतिक विद्यापीठांना आकर्षित करण्यात मदत झाली आहे, असे त्या म्हणाल्या.
सेंट्रल पार्क आणि फूड कोर्टसारख्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे गिफ्ट सिटीमध्ये वर्दळ वाढली आणि जास्तीत जास्त लोक इथे भेट देऊ लागले, सीतारमन म्हणाल्या.
केंद्र सरकारने भारतीय समभागांची आयएफएससी एक्स्चेंजवर थेट नोंदणी करण्यास आधीच परवानगी दिली असल्याच्या संबंधित हितसंबंधींमध्ये प्रचार केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
गिफ्ट सिटी लेखा आणि आर्थिक व्यवहारांचे जागतिक बॅक ऑफिस केंद्र बनविण्याच्या संदर्भाने सीतारामन म्हणाल्या की लेखा, लेखा परीक्षण आणि कर सल्लागार यांच्या गरजा पूर्ण करणारा सर्वंकष कायदेशीर आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, ज्याद्वारे त्यांना आपल्या सेवा जागतिक स्तरावर देता येतील. यासोबतच, आर्थिक क्षेत्रातील सर्व नियामकांनी एकत्र येऊन गिफ्ट सिटी आयएफएससी मध्ये व्यवसायाला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर सीतारामन यांनी गिफ्ट सिटी येथील आयएफएससीए मुख्यालयाला भेट दिली आणि अर्थमंत्रालय तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव तसेच आयएफएससी सदस्यांना संबोधित केले.
आयएफएससीच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीसाठी सीतारामन यांनी सर्व सदस्यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि गिफ्ट-आयएफएससी हे जागतिक आर्थिक प्रवेशद्वार म्हणून प्रस्थापित करण्यास अनुकूल वातावरण निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
***
M.Pange/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950524)
Visitor Counter : 121