विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लखनौच्या सीएसआयआर - राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेने विकसित केलेल्या कमळाच्या नव्या जातीचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते अनावरण; 108 पाकळ्या असलेल्या या फुलाला दिले “नमो 108” असे नाव

Posted On: 19 AUG 2023 6:09PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लखनौ इन्स्टिट्यूट सीएसआयआर-एनबीआरआय (नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) ने विकसित केलेल्या "कमळ" फुलाच्या 108 पाकळ्या असलेल्या नवीन जातीचे अनावरण केले. एनबीआरआय नमोह 108’ नावाचे कमळ सीएसआयआर या लखनौमधील वनस्पती विज्ञान संशोधन बहुविद्याशाखीय अत्याधुनिक अशा राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेने विकसित केले आहे.

ह्या नव्या जातीचे आणि एनबीआरआय च्या नव्या उत्पादनांचे राष्ट्रार्पण करतांना, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, कमळ फुलाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, ही नवी जाती, या फुलाला विशेष ओळख देणारी ठरली आहे.

नमोह 108 कमळ जातीची फुले मार्च ते डिसेंबर या महिन्यात फुलतात आणि यात खूप जास्त पोषक मूल्ये आहेत. हे कमळाचे पहिलेच असे वाण आहे, ज्याची संपूर्ण जनुक क्रम रचना, त्याच्या वैशिष्ट्यांसाठी करण्यात आली आहे.

डॉ जितेंद्र सिंह यांनी कमळाच्या तंतूपासून तयार केलेले वस्त्र आणि फुलांचा सुगंधी अर्क  काढून बनवलेले 'फ्रोटस' ह्या अत्तराचेही अनावरण केले. हे अत्तर एनबीआरआयने एफएफडीसी, कन्नौजच्या सहकार्याने कमळ संशोधन कार्यक्रमांतर्गत विकसित केले आहे.

ह्या नव्या वाणाला, ‘नमोह 108’ असे अभिनव नाव दिल्याबद्दल एनबीआरआयचे कौतुक करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळाच्या दहाव्या वर्षीही नरेंद्र मोदी यांचे अथक कार्य आणि त्यांच्या परिश्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही सुंदर सुगंधी भेट आहे.

यावेळी कमळ अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. हा प्रकल्प इतर प्राधान्य योजनांप्रमाणे मिशन मोडमध्ये हाती घेतला जात आहे - राष्ट्रीय मध आणि मधमाशी अभियान (NHBM), राष्ट्रीय बांबू अभियान (NBM), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM), राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF), राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA), गोकुळ अभियान, नील क्रांती, शक्ती अभियान - एकीकृत महिला सक्षमीकरण कार्यक्रम आणि आंतरशाखीय सायबर- प्रत्यक्ष व्यवस्थाविषयक राष्ट्रीय अभियान, अशा सर्व अभियांनाप्रमाणेच हे अभियानसुद्धा पूर्ण कार्यक्षमतेने राबवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकारने, आता अरोमा मिशनच्या यशानंतर, हे लोटस अभियान सुरू केले आहे. आपले सरकार केवळ अभियान, योजना किंवा प्रकल्प सुरू करत नाही, तर त्यांची निर्धारित वेळेत अंमलबजावणी पूर्ण होईल, हे ही सुनिश्चित करते, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला आहे, असे ही जितेंद्र सिंह म्हणाले.

यावेळी पुनर्वापराच्या दुसर्‍या अभिनव उपक्रमात, डॉ जितेंद्र सिंग यांनी विविध कामांसाठी लागणाऱ्या नैसर्गिक रंगांचेही अनावरण केले. मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या फुलांच्या निर्माल्यातून एनबीआरआयने हे नैसर्गिक रंग तयार केले आहेत. या हर्बल रंगांचा वापर रेशीम आणि सुती कापडासाठी देखील केला जाऊ शकतो.

डॉ. सिंह यांनी एनबीआरआय -निहारनावाच्या कोरफडीच्या नवीन जातीचेही अनावरण केले. ही कोरफड साधारण कोरफडीच्या तुलनेत अंदाजे अडीचपट जास्त जेलचे उत्पादन करते.  प्रात्यक्षिकानुसार 'एनबीआरआय-निहार' कोरफड जिवाणू आणि बुरशीजन्य रोगांवर सर्वात कमी प्रभावित असल्याचे आढळले आहे. सामान्य खोकला आणि सर्दी बरी करण्यासाठी हर्बल कोल्ड ड्रॉप्सआणि मार्क लॅबोरेटरीजने बनवलेले हर्बल अँटी डँड्रफ हेअर ऑइल या दोन हर्बल उत्पादनांचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.

त्याशिवाय, ह्या संस्थेने विकसित केलेल्या 500 कच्च्या औषध भांडारांच्या डेटाबेसचे देखील डॉ. सिंह यांनी उद्घाटन केले. भारतीय औषध निर्माण मानकांच्या अनुसार हा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. तसेच सीएसआयआर - एनबीआरआय उद्यानातील गुलाबांविषयीच्या पुस्तकाचेही त्यांनी प्रकाशन केले. यात या उद्यानात विकसित उच्च वाणाच्या गुलाबांची माहिती देण्यात आली आहे. तसेच, सीएसआयआर - एनबीआरआय आणि मेसर्स न्यूक्लोम इन्फॉरमॅटिक्स हैदराबाद यांच्यात यावेळी कापसावरील सहकार्य संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. लोकांमध्ये सहजतेने माहिती प्रसारित करण्यासाठी सीएसआयआर-एनबीआरआय डिजिटल  हर्बेरियम, भारतातील वनस्पतींच्या नमुन्यांचे राष्ट्रीय भांडार, आणि 'उत्तर प्रदेशातील वनस्पती संपदा' आणि 'उत्तर प्रदेशातील ई-फ्लोरा' वरील पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले. ई-फ्लोरा या पुस्तकात, उत्तर प्रदेशातील 5,000 पेक्षा जास्त वनस्पतींची यादी आणि माहिती आहे.

तसेच उंचावर थंड प्रदेशात तैनात लष्कराच्या जवानांसाठी एनबीआरआय गाऊट ह्या अस्थिरोगावरील औषध आणि पोषक आहारयुक्त उत्पादनांचेही उद्घाटन केले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी 14 ते 19 ऑगस्ट 2023 या कालावधीत एनबीआरआय द्वारे आयोजित केलेल्या सहा दिवसांच्या संकल्पना-आधारित कार्यक्रमाला देखील भेट दिली, ज्यामध्ये प्रयोगशाळेतील अत्याधुनिक संशोधन, उत्पादने आणि तंत्रज्ञान, विविध भागधारकांना कौशल्ये आणि सुविधा प्रदर्शित करण्यात आल्या.

डॉ जितेंद्र सिंग यांनी न्यूट्रा-सेंट्रल मूळ उप-उत्पादनांना समर्पित प्रदर्शनाचे उद्घाटनही केले आणि प्रत्येक स्टॉलवर फिरून उत्पादनांच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

***

M.Pange/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950485) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil