गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गांधीनगर इथे राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या विभागीय केंद्राचे भूमिपूजन तसंच गुजरात सरकारच्या विविध कामांचे उद्घाटन
“मुलांमध्ये अशा प्रकारची मूल्ये रुजवली पाहिजेत जेणेकरून त्यांना त्यांची भाषा, साहित्य, संस्कृती, गाव, राज्य आणि देशासाठी जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल”- अमित शाह
“आपल्या मुलांचा जर आपल्या पंधरा हजार वर्षांपेक्षा जुन्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी आपण परिचय करुन दिला नाही तर आपली संस्कृती नष्ट होण्यास आपणच जबाबदार असू” – गृहमंत्री
“राष्ट्रीय सुरक्षा दलाची मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता अशी चार विभागीय केंद्रे असून आता गुजरातमध्ये विभागीय केंद्र सुरू होत आहे ही आनंदाची बाब”- अमित शाह
दहशतवादाचा प्रभावी सामना करण्यात राष्ट्रीय सुरक्षा दल अग्रणी; या संस्थेने स्थापनेपासून 100 पेक्षा जास्त विशेष मोहिमा यशस्वी करत शेकडो दहशतवाद्यांना संपवत जनतेचे प्राण वाचवले
Posted On:
13 AUG 2023 7:40PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या विभागीय केंद्राच्या इमारतीची पायाभरणी तसेच गुजरात सरकारच्या विविध विकास कामांचा आरंभ झाला.

त्याआधी, अमित शहा यांनी GIHED-CREDAI ने 450 सोसायटींमध्ये आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहीमेत भाग घेतला. त्यांनी मन्सा-बल्वा या 40 कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी रस्त्याची पायाभरणीही केली, मन्सा येथे 2 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या उपनिबंधक कार्यालयाचे उद्घाटन,मन्साच्या चंद्रसार गावात विकसित होत असलेल्या तलावाला भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेअंतर्गत मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या वीरांच्या स्मृतीला आदर देण्यासाठी उभारलेल्या शिलाफलकाचे उद्घाटन आदी कार्यक्रमात सहभाग घेतला. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे महसंचालक एम ए. गणपती, यांच्या अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाचा समारोप 15 ऑगस्ट 2023 ला होईल, असे गृहमंत्री म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लोकांच्या मनात 1857 ते 1947 या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आपल्या प्राणांचे बलिदान देऊन सर्वोच्च त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती आदराची भावना आणि श्रद्धांजली या भावनांची पेरणी केली, असे अमित शाह म्हणाले. आम्ही जेव्हा मन्साजवळच्या गावात हुतात्म्याच्या स्मृतीस्थळावर भूमीपूजनासाछी गेलो होतो तेव्हा गावातील 90 टक्के लोकांना 1857 च्या युद्धात आपल्या गावातील पाच जण 1857च्या चळवळीत शहीद झाल्याचे माहिती देखिल नव्हते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्मृतीत गेलेली अनेक स्थाने आणि स्वातंत्र्य चळवळीमधील हुताम्यांचे स्मरण करून अमर केले आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी देशाचा युवा वर्ग, किशोरवयीन आणि बालकांमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत 17 वर्षांच्या खुदीराम बोस यांच्यापासून 80 वर्षांच्या कुंवर सिंहांपर्यंत प्रत्येक वयोगटातील स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. केवळ या स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागामुळेच आज 75 वर्षांनंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत अभिमानाने उभा आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपाबरोबरच स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचा प्रारंभ होत आहे, असे अमित शाह म्हणाले. 15 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2047 हा अमृत काळाचा कालखंड भारताला महान करण्याचा कालखंड आहे. आपल्या देशाची 15,000 वर्षे जुनी संस्कृती आणि इतिहास यांची ओळख जर आपण आपली बालके आणि युवा वर्गाला करून दिली नाही तर आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार असू, असा इशारा केंद्रीय गृह आणि सहकारमंत्र्यांनी दिला. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या प्रादेशिक केंद्राची आज पायाभरणी झाली आहे, असे गृहमंत्री म्हणाले. एनएसजीची मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथे चार प्रादेशिक केंद्रे आहेत आणि गुजरातमध्येही एनएसजीचे प्रादेशिक केंद्र स्थापन होणार आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. दहशतावादाला अतिशय प्रभावी पद्धतीने तोंड देणारी एनएसजी ही देशातील प्रमुख संघटना आहे. एनएसजीने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करून 100 पेक्षा जास्त यशस्वी कारवाया केल्या आहेत आणि सामान्य जनतेचे रक्षण केले आहे, असे शाह म्हणाले. मुंबई दहशतवादी हल्ल्यासह अनेक कारवायांमध्ये एनएसजीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक केंद्रासाठी 400 कोटी मंजूर केले असून लेकवदा येथील 60 एकर जागेवर 30 महिन्यांच्या आत त्याची उभारणी होईल, अशी माहिती शाह यांनी दिली.

***
R.Aghor/V.Sahajrao/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1948398)