पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
वन्य आशियाई हत्तींची सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत या प्रजातीच्या दीर्घकालीन संवर्धनाचा मुख्य आधार- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचें प्रतिपादन
Posted On:
12 AUG 2023 3:03PM by PIB Mumbai
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल तसेच कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी पर्यावरणीय कल्याण आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या आर्थिक विकासात जैवविविधता संवर्धनाला मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला आहे. ते आज भुवनेश्वर येथे जागतिक हत्ती दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला संबोधित करत होते. वन्य आशियाई हत्तींची सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत हा या प्रजातीच्या दीर्घकालीन संवर्धनाचा मुख्य आधार आहे, असे त्यांनी सांगितले. हत्तींच्या संवर्धनाला नवीन उंचीवर नेण्यासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मानव कल्याण आणि हत्ती संवर्धन यांचा मेळ साधण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय कटिबद्ध आहे, असेही यादव म्हणाले.
रेल्वेबरोबर हत्तींची होणारी धडक या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC), रेल्वे मंत्रालय, राज्य वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेसारख्या राष्ट्रीय संस्थांनी घेतलेल्या एकत्रित प्रयत्नांवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, देशातील रेल्वे मार्गावर हत्तींच्या अधिवासातून जाणारे सुमारे 110 महत्वपूर्ण भाग सुनिश्चित करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. या महत्वपूर्ण टप्प्यांमध्ये, रेल्वेशी हत्तींची टक्कर होण्याच्या घटना कमी करण्यासाठी बहुआयामी रणनीती आखण्यात आल्या आहेत, असे यादव यांनी सांगितले. हत्तींची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी मंत्रालयाने देशातील सर्व बंदिस्त हत्तींचे गुणसूत्रीय मॅपिंग तयार करण्यासाठी हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमावर यादव यांनी प्रकाश टाकला.
मंत्रालयाने प्रथमच देशभरातील हत्ती अभयारण्यांचे व्यवस्थापन परिणामकारकता आणि मूल्यांकन करणे सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.
यासाठी देशातील चार हत्ती बहुल प्रदेशांतील \चार हत्ती अभयारण्ये सुनिश्चित करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. हत्ती अभयारण्यांमधील सर्वोत्तम पद्धतींचे प्रमाणीकरण आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल ठरेल, असे ते म्हणाले. गेल्या 2 वर्षात देशातील हत्ती अभयारण्याचे जाळे 76,508 वर्ग किमी वरून 80,777 वर्ग किमी पर्यंत वाढले असून त्यात 33 हत्ती अभयारण्यांचा समावेश आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.
आपल्या मुख्य भाषणानंतर यादव यांनी गज साथी तसेच मानव-हत्ती संघर्ष व्यवस्थापित करण्यात आघाडीवर असलेल्या इतर आघाडीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
जागतिक हत्ती दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून, मंत्र्यांनी प्रोजेक्ट एलिफंटने तयार केलेल्या भारतातील हत्ती कॉरिडॉरवरील अहवालाचे प्रकाशन केले. स्थानिक लोकांचा हत्तींबाबत नकारात्मक दृष्टीकोन टाळण्यासाठी तसेच हत्तींच्या विना अडथळा हालचाली सुनिश्चित करण्यासाठी या कॉरिडॉरचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात हा अहवाल राज्य सरकारांना मदत करेल. हत्ती संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मंत्री महोदयांनी पुरस्कार विजेत्यांना गज गौरव पुरस्कार प्रदान केले.
पृथ्वीवरील सर्वात आगळ्या प्रजातींपैकी एक असणाऱ्या हत्तींचे संरक्षण करण्याच्या मानवजातीच्या सामूहिक प्रतिज्ञेबाबत कटीबद्धता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात, हत्तींना राष्ट्रीय वारसा प्राणी मानले जाते आणि हत्ती आपल्या संस्कृतीत खोलवर वसलेले आहेत.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1948160)
Visitor Counter : 151