वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सरस अजीविका स्टोअरमध्ये ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ओडीओपी वॉल) ची सुरुवात
भारतातील स्वदेशी हस्तकला आणि कारागिरांना प्रोत्साहन मिळावे याकरिता संयुक्त उपक्रम
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2023 10:52AM by PIB Mumbai
भारतातील स्वदेशी हस्तकला आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) कार्यक्रम, जो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन (DPIIT) विभागाच्या अंतर्गत येणारा एक उपक्रम आहे, त्याची सुरुवात ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे करण्यात आली. या धोरणात्मक भागीदारीची सुरुवात ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंग आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या( DPIIT) संचालिका सुप्रिया देवस्थळी यांच्या हस्ते काल सरस आजिविका स्टोअरमध्ये 'ओडीओपी वॉल' च्या उद्घाटनाने झाली. सरस आजीविका स्टोअरमध्ये उभारण्यात आलेली 'ओडीओपी वॉल' ही या दोन महत्त्वाच्या मंत्रालयांमधील सामंजस्यपूर्ण भागीदारीचे प्रतीक आहे.

सरस आजिविका हा भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दीनदयाल अंत्योदय (DAY-NRLM) उपक्रमाचा एक भाग आहे. सरस आजिविका उपक्रम महिला सक्षमीकरणाचा खंबीर समर्थक असून या माध्यमातून महिला कारागीर आणि स्वयं-सहायता गट (SHGs) च्या उन्नतीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. महिला कारागीर आणि स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांना एक विशेष बाजारपेठ उपलब्ध करून,सरस आजिविका उपक्रम या महिलांच्या कौशल्यांना आणि प्रतिभेला चालना देतो आणि त्यांना स्वतंत्र उद्योजक बनवण्यात मदत करतो.

या महत्वपूर्ण सहकार्यात, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) कार्यक्रमाने प्रॉडक्ट टॅगिंग आणि स्टोरी कार्ड यांसारख्या नाविन्यपूर्ण कलावैशिष्ट्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाशी हातमिळवणी केली आहे. या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांना आणि कलाप्रेमींना एम्पोरियम्सकडे आकर्षित करणे आणि त्या माध्यमातून, या उत्पादनांची विक्री वाढवणे तसेच भारतातील उत्कृष्ट उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देणे साध्य होणार आहे.
देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देऊन देश आणि देशातल्या नागरिकांना स्वावलंबी बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देणे हा या एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रमाच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अद्वितीय उत्पादन निवडले जाते, त्याचे ब्रँडिंग केले जाते आणि त्याच्या विक्रीला प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विविध प्रकारच्या उत्कृष्ट उत्पादनांना व्यासपीठ मिळवून दिले जाते, ज्यामध्ये हातमाग आणि हस्तकला यासह विविध क्षेत्रांचा समावेश असतो. आवाका आणि प्रभाव वाढवण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रम, देशातील सरकारी आणि खाजगी दोन्ही संस्थांसोबत मौल्यवान सहयोग तयार करत आहे. ज्यामाध्यमातून भारताला विशिष्ट कारागिरी आणि उद्योजकतेचे स्वयंपूर्ण केंद्र बनवण्याचे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल.
***
M.Iyengar/V/Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1948088)
आगंतुक पटल : 195