नागरी उड्डाण मंत्रालय
दिल्ली आणि मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना
येत्या काही महिन्यांत सुरक्षितता आणि इमिग्रेशन विषयक तपासणी करण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी सुमारे 10 मिनिटे असेल
Posted On:
10 AUG 2023 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2023
विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सध्या वाढ झाल्यामुळे नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (आयजीआय) प्रक्रियांसाठी विविध ठिकाणी प्रवाशांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या संदर्भात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून अविरत देखरेख आणि आयजीआय विमानतळाच्या क्षमतेत करण्यात आलेली वाढ यामुळे आता तेथील परिस्थितीत सुधारणा झाली आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवरील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, त्यांची माहिती पुढे दिली आहे:-
- वाहनांची गर्दी टाळण्यासाठी निर्गमन द्वाराजवळ अतिरिक्त प्रमाणात ट्रॅफिक मार्शल्स तैनात करण्यात आले आहेत.
- प्रवाशांना नियत वेळेआधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सोयीस्कर ठिकाणी प्रक्रियेसाठी लागणारा किमान प्रतीक्षा कालावधी तसेच प्रवेशद्वार क्रमांक असलेला फलक लावण्यात आला आहे.
- प्रवेशद्वारे, सुरक्षा तपासणी नाके या ठिकाणी फलक तसेच डिस्प्ले स्क्रीन लावून प्रवाशांना गेटपाशी प्रतीक्षा करताना लागणारा वास्तव वेळ कळवला जात आहे. समाज माध्यमांवर देखील प्रतीक्षा कालावधीची माहिती दिली जात आहे. विमान कंपन्यांना वास्तव प्रतीक्षा कालावधीची लिंक सामायिक करण्यात येत आहे.
- विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डिजीयात्रा या बायोमेट्रिकच्या आधारे संचालित आणि चेहेरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित सुरळीत प्रवास अनुभव देणाऱ्या मंचाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
- विमानतळावर टी2 आणि टी3 या ठिकाणी डिजीयात्रा संपूर्णपणे लागू करण्यात आले आहे. टी3 आणि टी2 येथे प्रवेशद्वारापाशी अनुक्रमे 15 आणि 10 मार्गिका आहेत. सुरक्षा तपासणी बिंदूपाशी टी3 आणि टी2 च्या अनुक्रमे सर्व 6 विभागांमध्ये आणि सर्व 3 विभागांमध्ये डिजीयात्रा उपलब्ध आहे.
- टी3 मध्ये अतिरिक्त प्रवेश द्वारे उभारण्यात आली आहेत.
- VII. टर्मिनल 3 च्या अंतर्भागात झोन 0 हा नवा सुरक्षा विभाग निर्माण करण्यात आला आहे.
- सीआयएसएफ तर्फे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याची सुनिश्चिती करण्यात आली आहे.
- सीसीटीव्ही तसेच कमांड केंद्राच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे..
- गर्दीच्या व्यवस्थापनासाठी काउंट मीटरचा वापर.
- सर्वाधिक गर्दीच्या वेळी अधिकाधिक विमानांचे परिचालन होण्यासाठी स्लॉटमध्ये बदल घडवून टर्मिनल्सच्या दरम्यान विमानांच्या रहदारीचे पुनर्संतुलन करण्याच्या सूचना विमानतळ चालकांना देण्यात आल्या आहेत.
- XII. सामानाचे चेक इन आणि ड्रॉप करणाऱ्या सर्व काउंटरपाशी पुरेसे मनुष्यबळ नेमण्याच्या सूचना विमान कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.
- विमानतळांवर केलेल्या उपाययोजनाविषयक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी विमानतळ चालक, विमानकंपन्या आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय अशा सर्व पातळ्यांवर दैनंदिन तत्वावर देखरेख करण्यात येत आहे.विमानतळांवरील सुरक्षा कायम ठेवण्यासाठी सर्वाधिक काळजी घेऊन या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत.;
जुलै 2023 मध्ये नोंदल्या गेलेला प्रतीक्षा कालावधी विचारात घेता अशी अपेक्षा व्यक्त होत आहे की, येत्या काही महिन्यांत सुरक्षितता आणि इमिग्रेशन विषयक तपासणी करण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी 10 मिनिटे असेल.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (डॉ.)व्ही.के.सिंग (निवृत्त) यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1947611)
Visitor Counter : 113