अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

9 व्या भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारीच्या अनुषंगाने झालेल्या अधिकृत स्तरावरील चर्चेसंबंधी संयुक्त निवेदन

Posted On: 07 AUG 2023 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्ट 2023

 

भारतीय अर्थमंत्रालय आणि अमेरिकेच्या कोषागार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुसरी उप-मंत्रालयीन बैठक 3 ऑगस्ट 2023 रोजी झाली  . नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या 9 व्या भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारीविषयक मंत्रीस्तरीय बैठकीच्या नंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व मुख्य आर्थिक सल्लागार डॉ.व्ही. अनंत नागेश्वरन यांनी तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय अर्थ विभागाचे सहाय्यक सचिव ब्रेंट नेइमन यांनी केले. रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी आणि वॉशिंग्टन येथील यु.एस. फेडरल रिझर्व्हचे प्रतिनिधी या बैठकीत आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.

या वेळी झालेली  चर्चा अत्यंत फलदायी ठरली  आणि त्यातून भविष्यात होणाऱ्या भारत-अमेरिका आर्थिक भागीदारीविषयक मंत्रीस्तरीय बैठकीच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

या बैठकीदरम्यान, भारतीय आणि अमेरिकी अधिकाऱ्यांनी अनेक आर्थिक आणि वित्तविषयक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये दोन्ही देशांचा आर्थिक दृष्टीकोन, जागतिक कर्जविषयक आव्हानांचा सामना करण्याच्या बाबतीत भारतीय आणि अमेरिकी प्राधान्यक्रम, स्वच्छ उर्जा स्थित्यंतराच्या बाबतीत प्रगती करण्यासाठी तसेच हवामानविषयक प्रयत्नांकरिता निधी जमवण्यासाठी दोन्ही देशांचे संयुक्त प्रयत्न, नवीकरणीय उर्जा प्रकल्पांच्या जलद कार्यान्वयनासाठी अभिनव प्रकारचे गुंतवणूकविषयक मंच निर्माण करण्याविषयीची प्रगती यांचा समावेश आहे. तसेच जी-20 सीमापार पेमेंटविषयक आराखडा, भारताचा एकात्मिक पेमेंट  मंच (युपीआय) आणि फेडरल रिझर्व्हच्या फेडनाऊ पेमेंट यंत्रणेची अंमलबजावणी यांसह सीमापार भरणा क्षेत्रातील नव्या घडामोडींबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.

दोन्ही देशांतील सहयोगी संबंध यापुढेही तसेच सुरु ठेवण्यावर दोन्ही बाजुंनी सहमती व्यक्त केली आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून 2023 मधील अमेरिका भेटीच्या काळात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील यशस्वी बैठकांच्या आधारावर हे संबंध आणखी पुढे नेण्याला मान्यता दिदेण्यात आली आहे. 

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946545) Visitor Counter : 138